Wednesday, August 25, 2010

मदर तेरेसा जन्मशताब्दी

इवलेसे रोप लावियले दारी त्याचा वेलू गेला गगनावरी,' या वचनाप्रमाणे गेल्या अर्ध शतकात मदर तेरेसा यांच्या कार्याचा विस्तार पंचखंडात झाला आहे। तरीही मदर तेरेसा स्वत:ला समाजसेविका न समजता आपण ध्यानयोगिनी आहोत, असे आग्रहाने प्रतिपादन करत। एका मुलाखतीमध्ये त्या म्हणाल्या होत्या, ''आम्ही केवळ समाजसेविका नाही; तर मानवतेच्या अंत:करणातील ध्यानयोगिनी आहोत.'' मदर तेरेसा यांचे बालपणीचे नाव 'अॅग्नेस बोजायू' होते. त्यांचा जन्म २६ ऑगस्ट १९१० साली, अल्बेनियातील स्कोप्जे या खेडेगावात झाला. त्या क्रोएशियात माध्यमिक शाळेत शिकत होत्या. तेथील मिशनरी, फादर अँथनी विझजॅक, हे बंगालमध्ये मिशनरी होते. आपले काम आणि बंगाली समाज, याची वार्तापत्रे ते मायदेशी पाठवत. छोटी अॅग्नेस मोठ्या आवडीने ती पत्रे वाचीत असे. बालवयातच अॅग्नेसच्या मनात भारत आणि विशेषत: कोलकता शहराविषयी, कमालीची उत्सुकता निर्माण झाली. अठराव्या वषीर्, 'नन' होण्यासाठी अॅग्नेसने २६ सप्टेंबर १९२८ रोजी घराला रामराम केला आणि आयर्लंडच्या डब्लिन शहरात, लॉरेटो या कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश केला. तिथे इंग्रजीचे धडे घेऊन अॅग्नेस ६ जानेवारी १९२९ ला कोलकात्याला आली. दोन वषेर् आध्यात्मिक प्रशिक्षण घेऊन अॅग्नेसने १९३१ मध्ये उभे आयुष्य सेवेसाठी समपिर्त केले. त्या कोलकत्यात सेंट मेरी हायस्कूलमध्ये, प्रथम भूगोलशिक्षिका आणि त्यानंतर मुख्याध्यापिका झाल्या. गोरगरीब, उपेक्षित, वंचित यांची सेवा करण्यासाठी त्या भारतात आल्या होत्या. प्रत्यक्षात, उच्चभ्रू वस्तीतील, धनवानांच्या मुलांना शिकवण्यात गुंतल्या होत्या. त्यांचं मन अध्यापनात रमेना; त्या अंतरी अस्वस्थ होत्या. कॉन्व्हेंटच्या खिडकीतून त्या बाहेर डोकावत; तेव्हा त्यांना दैन्याचे विदारक दर्शन होई आणि हृदय विदीर्ण होई. उपेक्षितांची वेदना पाहून त्या हळहळत. त्यांच्यासाठी काहीतरी करावे; असे त्यांना सारखे वाटे. १० सप्टेंबर १९४६. सिस्टर तेरेसा आगगाडीने ध्यानसाधनेसाठी दाजिर्लिंगला निघाल्या होत्या. गाडीत प्रवाशांची तुडुंब गदीर् होती, कोलाहल होता. कानठळ्या बसविणारी शिटी फुंकत गाडी धावत होती; अॅग्नेस खिडकीजवळ बसून बाहेरील दृश्ये न्याहाळीत होत्या. अंतर्मुख होत होत्या. त्या गजबजलेल्या डब्यात सिस्टरला साक्षात्कार झाला. क्रूसावर खिळलेल्या, वेदनाव्याकूळ प्रभू ख्रिस्ताचे दर्शन त्यांना झाले. त्या त्याच्याकडे अनिमिष पाहात राहिल्या. त्यांना जाणवले, येशूचे ओठ हलले आणि त्या ओठांतून क्षीणसे उद्गार निघाले. 'मला तहान लागली आहे!' मृत्युपूवीर् प्रभूने उच्चारलेले ते शब्द होते. त्या खूप वेळ ध्यानस्थ राहिल्या. भानावर आल्यावर 'आनंदाचे डोही, आनंद तरंग' अशी अवस्था झाली. अस्वस्थतेचे वादळ शमले, चित्तवृत्ती शांत शांत झाल्या. सतावणाऱ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले, दिशा दिसली. साधना संपवून त्या कोलकत्याला परतल्या. साक्षात्कार सांगितला. त्या म्हणाल्या, 'आगगाडीच्या डब्यात मला येशूचा आवाज ऐकू आला.' फादर हेन्री म्हणाले, 'त्या खडखडाटात कसा काय तुला देवाचा आवाज ऐकू आला? तो केवळ भास असेल.' स्मित हास्य करीत, सिस्टर अॅग्नेसने निर्धाराने उत्तर दिले, 'तो देवाचा आवाज होता, याची मला बालंबाल खात्री आहे. येशू मला त्याच्या सेवेसाठी बोलावत आहे. दीनदरिदी, अनाथ, उपेक्षित, अपंग, विकलांग, शोषित, पीडित, कुष्ठरुग्ण यांच्या रूपात ख्रिस्त तहानलेला आहे. त्याची तहान शमविण्यासाठी तो मला बोलावत आहे. लॉरेटो कॉन्व्हेंटचा धोपट मार्ग सोडून, मला एकटीला, सेवेची ही नवी वाट चोखाळावी लागणार आहे.' कवी रॉबर्ट फ्रॉस्ट म्हणतो-जंगलात दोन वाटा वेगळ्या झाल्या आणि मी कमी तुडवलेली वाट पकडली, त्यामुळेच सर्व बदल झाला. टू रोड्स डायव्हर्जड् इन वूड, अँड आय, आय टुक द वन लेस टॅव्हल्ड बाय, अँड दॅट हॅज मेड ऑल द डिफरन्स 'एकला चलो रे' या मंत्राचा घोष करत मदर तेरेसांनी बिकट वाट पकडली व तो सेवेचा राजमार्ग बनला. दष्ट्यांची नजर क्षितिजाच्या पार जाते म्हणून त्यांचे जीवन दीपस्तंभासारखे होऊन, मानवतेला प्रकाश दाखवते. स्वातंत्र्य मिळताना बंगालची फाळणी झाली. तेथे प्रचंड रक्तपात झाला. हिंसेचा आगडोंब उसळला. प्रेतांचा खच पडला. ही दृश्ये पाहून, सिस्टर अॅग्नेस दु:खी झाल्या. तिला वेदनाग्रस्त येशूची सारखी हाक ऐकूयेत होती. अखेर आठ ऑगस्ट १९४८ रोजी, सिस्टर कॉन्व्हेंटमधून बाहेर पडल्या. त्यांनी 'तेरेसा' हे नाव घेतले आणि नव्या कामाला सुरुवात केली. त्या दिवसापासून अध्यात्मसाधना आणि सेवा हा मदर तेरेसांच्या जीवनाचा दुहेरी कार्यक्रम झाला. त्या रोज पहाटे चारला उठून, एकान्तात येशूची दोन-तीन तास साधना करत. क्रूसावर टांगलेला येशू हे त्यांचे शक्तिपीठ होते. संघातील सर्व सिस्टरसमवेत त्या सामुदायिक प्रार्थना करत आणि पवित्र भाकरीचा (युखरिस्ट) स्वीकारत. त्यानंतर दिवसभर रुग्णसेवा. मदरनी जीवनात अध्यात्म आणि सेवा यांचा सांधा जुळवला. हेच त्यांच्या जीवनाचे वेगळेपण होते. केवळ अध्यात्म माणसाला गुंगी आणू शकते, मग हटातटाने जटा रंगवून मठाची उठाठेव करण्याचा मोह आवरत नाही. पु. ल. देशपांडे यांनी म्हटल्याप्रमाणे, 'जिथे केवळ आ वासण्याचे श्रम करावे लागतात तो आश्ाम', अशी कधी कधी आश्रमांची अवस्था होते. एकदा, मदर तेरेसांची एक शिष्या महिनाभर तपोसाधना करून परतल्या. आध्यात्मिक अनुभवांमुळे त्या आनंदी दिसत होत्या. त्या मदरना म्हणाल्या, 'मी पवित्र भाकरीचा स्वीकार केला, तेव्हा मला येशूचा स्पर्श जाणवला,' मदरनी त्यांचे अभिनंदन केले. त्या म्हणाल्या, 'सिस्टर, उद्यापासून मी तुम्हाला कुष्ठरोग्यांच्या आश्ामात सेवेस पाठवणार आहे. त्यांच्या जखमांमध्ये तुला येशूचे दर्शन झाले, म्हणजे मला भेट॥' जगात दु:खभोग, असाध्य आजार का आहेत? निष्पाप व्यक्तींना दुदैर्वाच्या दशावतारांना का सामोरे जावे लागते? हे मानवापुढील सनातन प्रश्न आहेत. या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे काही तत्त्वज्ञ नास्तिक बनले. मात्र, मदरना वेदना दिसली तेव्हा त्या कमालीच्या आस्तिक झाल्या. ती दूर करण्यासाठी त्यांच्या संवेदना जाग्या झाल्या आणि त्यांना सेवायोग दिसला. भक्ती ही सुळावरची पोळी आहे. असे म्हणतात. तसेच सेवेचे आहे. सेवा म्हणजे फावल्या वेळचे काम नाही. तो कुणावरचा उपकारही नाही; तर वेदनाग्रस्तांमधल्या देवाची ती पूजा आहे. त्यासाठी परक्यातल्या परमेश्वराचा साक्षात्कार घडावा लागतो. तसा साक्षात्कार मदरना घडला. हे त्यांचे वैशिष्ट्य होते. अशी ही सेवेची अखंड सरिता ५ सप्टेंबर १९९७ रोजी ख्रिस्तचरणी विलीन झाली.

फादर फ्रान्सिस दिब्रिटो


महाराष्ट्र टाइम्स 21 Aug 2010




Saturday, August 14, 2010

वसई-विरार महापालिका आणि राज्य सरकारकडून उच्च न्यायालयाच्या निकालाचा अवमान?


वसई विरार महापालिकेच्या हद्दीतील ५३ गावांपैकी ३५ गावे वगळण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची घोषणा नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी दि.५ एप्रिल २०१० रोजी विधानसभेमध्ये निवेदनाद्वारे जाहीर केली होती. त्या अगोदर माननीय उच्च न्यायालय, मुंबई ह्यांनी दिलेल्या दि. १ एप्रिल २०१० च्या निकालात असे स्पष्ट नमूद केले होते कि " The learned A.G.P. states that preliminary Notification indicating the proposal to exclude 35 Gram Sabha areas from the Corporation limitsand inviting suggestions and objections in that behalf will be issued on 5th April 2010. The final date of inviting such objections will be one month from the date of issuance of the preliminary Notification. Thereafter, the objections will be duly considered by the Appropriate Authority and decision thereon will be taken not later than four weeks from the last date of submission of suggestions and objections. Recommendation of the Appropriate Authority will be then placed before the Registrar General of Census of India and also forwarded to the Corporation to comply with the process of consultation.We hope and trust that as soon as the recommendation of the Appropriate Authority is received by the Registrar General of Census of India, he may consider the same and his decision shall be communicated to the Appropriate Authority of the State Government preferably four weeks from the date of receipt of such proposal.

वरील निकालावरून हे स्पष्ट होते कि ३५ गावातील जनतेकडून मागवलेल्या हरकतीनुसार राज्य शासन आपला अहवाल ४ आठवड्यात केंद्रीय जनगणना आयोगाकडे पाठवील व जनगणना आयोगाकडून योग्य तो निर्णय ४ आठवड्यात अपेक्षित असेल. तदनंतर सदर निर्णय महापालिकेकडे चर्चेसाठी पाठविला जाईल. परंतु वस्तुस्थिती अशी आहे कि आज तो पावेतो सरकारने आपला अहवाल केंद्रीय जनगणना आयोगाकडे योग्य तो निर्णय घेण्यासाठी पाठविलेला नाही असे ऐकिवात आहे तसेच शासनाने जून महिन्यात वरील विषयासंबंधित महापालिकेला पाठविलेल्या पत्रावर सुद्धा महापालिकेत कोणतीही चर्चा किवा निर्णय झालेला नाही.सदर बाबी अतिशय गंभीर असून माननीय उच्च न्यायालयाच्या निकालाचा अवमान करणाऱ्या आहेत हे सत्कृतीदर्शनी दिसते.

मुळात ५३ पैकी ४९ ग्रामसभांचा विरोध डावलून सरकारने जनमताविरुद्ध गावे महापालिकेत समविष्ट करण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे आज सरकारने महापालिकेच्या ठरावाची किव्हा निर्णयाची वाट न पाहता आपला अहवाल केंद्रीय जनगणना आयोगाकडे त्वरित पाठवून द्यावा. त्याकरिता वसईतून सिडको गुंडाळून तो कारभार महापालिकेकडे देणाऱ्या तत्पर अधिकाऱ्याची मदत घेता येईल. कितीही झाले तरी महापालिकेपेक्षा राज्य सरकार हे श्रेष्ठ आहे आणि राज्य सरकारापेक्षा माननीय उच्च न्यायालय श्रेष्ठ आहे. काल स्वतंत्रता दिवस साजरा केलेला असताना लोकशाहीचा केंद्रबिंदू असलेल्या (वसईच्या) सामान्य माणसाकडे महापालिका प्रशासनाला आणि त्याची पाठराखण करणाऱ्या राज्य सरकारला जास्त काळ दुर्लक्ष करून चालणार नाही, अन्यथा पुन्हा उच्च न्यायालयाचे दरवाजे वसईच्या ग्रामस्थांना ठोठवावे लागतील.

सचिन मेंडिस,
प्रवक्ते, स्वाभिमानी वसईकर संघटना, वसई