Wednesday, October 22, 2014

अंधारया वाटेवर लावलेली समई !

अंधारया वाटेवर लावलेली समई !

त्या मुलाचं नाव मला माहित नाही पण कधी कधी जाता येत रस्त्यात भेटतो. आमच्या गावात आदिवासी (वारली) लोकांची वस्ती आहे तिथेच त्याच घर. नुकताच दहावी होऊन कॉलेजमध्ये प्रवेश केलेला. तसं आदिवासी म्हटलं तर ते कुटुंब फक्त जातीच्या दाखल्यापुरतच, बाकी त्या कुटुंबाची राहणी अनेकांना लाजवणारी. वडील निर्व्यसनी, सगळे टापटीप, चांगले पत्र्याचे घर, मुलं शिकावी ह्याबाबतीत आईची दक्षता. सगळ काही चांगल्या कुटुंबाला शोभून दिसणार! ह्या मुलाला माझं खूप कुतूहल, 'सचिन मेंडिस' ह्या माझ्या नावात काही विशेष नसेल, पण बहुतेक मी इंजिनिअर असल्याचं त्याला खूप अप्रूप असावं. रस्त्यात कुठे दिसला तर मला न चुकता नेहमी हलकेच स्मित करायचा. मला त्याच्या डोळ्यात भविष्याची स्वप्ने दिसायची, खूप शिकण्याची, मोठे बनण्याची. तो दहावीत असताना त्याला एकदा बोलावून त्याच्या अभ्यासाची मी चौकशी केली होती. बापासारख अर्ध्यावर शिक्षण त्याने सोडू नये म्हणून मला चिंता वाटायची. आदिवाशी मुलाचं असंच नेहमी, ८-९ पर्यंत शिक्षण झाले कि मग कुठेतरी छोटी नोकरी बघून शिक्षणाला कायमचा रामराम. त्यात त्यांचाही दोष नाही, घरातील कुणी शिकलेले नसल्याने मार्गदर्शन करणारे अन दोन युक्तीच्या गोष्टी सांगणारे लोक दुर्मिळ. त्यात आपण गरीब अन स्पर्धेत न टिकणारे म्हणून एक वेगळाच न्यूनगंड. तोच खरा मोठा प्रॉब्लेम. काही दिवसा अगोदर हा पोरगा घराकडे येताना रस्त्यात दिसला म्हणून मी त्याकरिता कार थांबवली अन त्याला माझ्या शेजारी सीटवर बसवले. त्याला कारचा दरवाजा नीट लावता आला नाही ह्यावरून तो थोडा बावरल्यासारखा वाटला. बहुतेक कारमध्ये पहिल्यांदाच बसला असावा. मी दार लावून घेतले अन अभ्यासाचा विषय काढला. तो क्लास वरून येत होता अन कॉलेज व्यवस्थित चालू होते. बोलता बोलता त्याने मला माझ्या कारचे नाव विचारले. त्याला कारच्या नावाची उत्सुकता अन कुतुहूल वाटत होते. अन मी त्याच्यासाठी कार थांबवून त्याला लिफ्ट दिली ह्याचेही नवल वाटले असावे. मी त्याला कारचे नाव सांगितले अन सहज म्हटले 'तू मोठा झाला कि तू सुद्धा अशी कार घेऊ शकतोस, फक्त अभ्यास करावा लागेल'. त्या निरागस गरीब मनाला ते सुखावणारे होते. त्याला प्रेरणा मिळावी म्हणून मी पुढे बोलू लागलो. त्याला म्हटले, ' मी तुझ्या एवढा होतो तेव्हा आमचेही घर शेणाने सारवलेले अन कौलारू होते, मी सुद्धा लांब पायपीट करीत शाळेत जात होतो, पण शिकण्याची अन कुणीतरी बनण्याची जिद्द होती, आज तुझ्यात अन माझ्यात फक्त काळाचे अंतर आहे पण परिस्थितीचे अंतर बिलकुल नाही, तू ठरवलस तर तुला इंजिनिअर होण्याचे स्वप्न कुणीच थांबवू शकत नाही'. माझ्या बोलण्याने त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली. मला त्याच्या मनातील न्यूनगंड काढायचा होता. त्यादिशेने पहिली समई मी त्याच्या पराभूत मानसिकतेच्या वाटेवर लावली होती.काही वेळानंतर आम्ही आमच्या गावात पोहोचलो. त्याने माझे आभार मानून तो गाडीतून उतरला. निघताना मी त्याला हाक मारली अन सांगितले, 'मित्रा, एक दिवस येईल जेव्हा तू मला तुझ्या कार मधून लिफ्ट देशील अन मी तुला तुझ्या कारचे नाव विचारेन'. तो मोठ्याने हसला, स्वच्छ तलावात सूर्याचे किरणे पडून तलावाचा पृष्ठभाग जसा उजळून निघावा तसा त्याचा चेहरा उजळला. मला त्याच्या पाठीशी उभे राहिल्याचे समाधान वाटले. अशी अनेक चुणचुणीत पण गरीब मुले न्यूनगंड बाळगल्याने आज मागे पडत आहेत ह्याची नेहमी खंत वाटत होती. एका आदिवाशी पिढीने आपल्या आईवडिलांच्या काळात वाडीत मोलमजुरी केली, त्याच्या पुढच्या पिढीने आपल्या सुशिक्षित पिढीसाठी मोलमजुरी करावी ह्याच्या सारखे मोठे पाप नाही. आपण शिकणे हे सुशिक्षित असणे झाले पण अशा लोकांना हात देवून पुढे आणणे हे सुसंकृताचे लक्षण आहे. आता जेव्हा हा मुलगा मला रस्त्यात दिसतो तेव्हा त्याच्या हसण्यात मला एक भावी इंजिनिअर दिसतो. मला त्याच्यावर येणाऱ्या काळात लक्ष द्यावे लागणार आहे, माझाही स्वार्थ आहे त्यात, भविष्यात त्याच्या कारमध्ये मला फेरफटका मारायचा आहे. सचिन मेंडिस

बंद खोली !!

प्रत्येक माणूस असमाधानी असतो. कोणतेतरी दुखणे घेऊन तो जगत असतो. मग ते नात्याचे असो, करिअरचे असो, पैशाचे असो, स्पर्धेत मागे पडल्याचे असो की मानसन्मानाचे असो. प्रत्येकाचे प्राक्तन जगायला त्याची बंद खोली त्याला साथ देत असते, जी खोली बाहेरील गर्दीपासून त्याचे अस्तित्व वेगळे करून त्याला त्याचं खंर आयुष्य जगायला अन शोधायला मदत करते. दिवसाच्या आभासी प्रकाशात हरवेलेला प्रत्येकाचा चेहरा, त्याला त्याच्या बंद खोलीतील काळोखात अलगद गवसतो. ह्या खोलीत गर्दीतले मुखवटे नसतात. खोटे हास्य नसते, असतो तो स्वतःचा आरसा, स्वतःला आणि दुनियेला न फसवणारा. प्रत्येकाच्या बंद खोलीची ही सताड उघडी कविता !!

बंद खोली !!

बंद खोलीत भयाण एक,
दुखः गुपचूप लपलेलं असतं.
 दार उघडताच खोलीबाहेर,
चेहऱ्यावरून ते सरलेलं असतं.

सजवलेले चेहरे कृत्रिम,
मनात काळोख घेऊन जगतात.
दोन आयुष्याच्या अभिनयात,
स्वतःला ओढून ताणून थकतात.

डोळे असतात फुललेले,
हृदय मात्र कोमेजलेलं असतं.
बंद खोलीत भयाण एक,
दुखः गुपचूप लपलेलं असतं.

उंची वस्त्रे, सुगंधी अत्तरे,
गर्दीला सुखी भासवत असतात.
काळजाचे दुखणे मात्र,
रात्री झोपेला जागवत असतात.

गुलाबी पाकळ्यात गुंडाळलेलं,
प्रेत जणू ते सजलेलं असतं.
बंद खोलीत भयाण एक,
दुखः गुपचूप लपलेलं असतं.

दुखः जगण्या प्रत्येकाला,
बंद खोली हवी असते.
लांबी रुंदी प्रत्येकाच्या,
दुखा:ची ती नवी असते.

आतबाहेर खोलीच्या सीमेवर,
लढता आयुष्य संपलेलं असतं.
बंद खोलीत भयाण एक,
दुखः कायमचं लपलेलं असतं.

सचिन मेंडिस

मोगरा फुलला !! मोगरा फुलला !!

मोगरा फुलला !! मोगरा फुलला !!

मोगरा ह्या विषयवार बऱ्याच दिवसापासून लिहावेसे वाटत होते, पण वेळेअभावी लेखणीत मोगरा फुलत नव्हता. अलीकडेच फेसबुकवर मोगरयाचे दर्शन झाले अन अलगद मोगऱ्याचा स्पर्श हाताला अन सुगंध मनाला गंधाळून गेला. आज जरी परिसरातून मोगऱ्याचे फुलणे कमी झाले असले, तरी मोगऱ्याच्या बागा आठवणीच्या हिंदोळ्यावरती फुलायच्या थांबत नाही. आपली एक पिढी मोगरयाने वाढवली, मोगरा वाडीत फुलत गेला अन घरात संसार फुलला. सकाळच्या प्रहरी खुडलेला मोगरा गाडीने दादरच्या बाजारात बहरत गेला अन महिन्याकाठी येणाऱ्या मोगऱ्याच्या पैशातून घरात किराणा सामान आणि मुलांच्या शिक्षणाकरिता पैसे फुलू लागले. म्हणून मोगरयाचं अस्तित्व अन फुलंण हे माझ्या लेखी 'एक सफेद फुलं' ह्या जाणीवेच्या पलीकडचेचे आहे. ज्या कुटुंबाकडे त्या काळी १० गुंठेच्या आसपास मोगऱ्याची लागवड व्हायची त्यांची तेव्हा सामाजिक अन आर्थिक प्रतिष्ठा खूप मोठी होती. अशी कुटुंबे मोगऱ्याच्या जीवावर आर्थिक दृष्टीने खूप फुलेलेली असायची.

आमचा गाव एकेकाळी मोगऱ्याची राजधानी होती. लोकसंख्येच्या तुलनेत प्रती कुटुंब वाडीची जागा अधिक असल्याने प्रत्येक कुटुंबाकडे तुलनेने चांगल्या जागा मोगऱ्याच्या लागवडीसाठी मिळत होत्या. आमच्या आजोबाने दूरदृष्टी ठेवून मोठ्या प्रमाणात जागा विकत घेतल्याने आमच्या मेंडिस कुटुंबाकडे बऱ्यापैकी वाडी होती (अजूनही आहे). सर्व भावंडामध्ये जागा जरी वाटलेली असली तरी मोगऱ्याच्या बागा एकमेकांना लागलेल्या होत्या. त्यामुळे फार मोठी जागा मोगऱ्याच्या बागेने फुललेली असायची. दूरवर नजर टाकली तर मोगऱ्याचे ताटवे एकत्र कुटुंब पद्धतीची आठवण करून देत असतं. माणसांच्या गरजेकरिता जरी मोगऱ्याची वाटणी झाली असली तरी मोगऱ्याच्या फुलण्यात अन दरवळण्यात कुठे आल्या वाटण्या अन भेदाभेद? 'पातेराती' हा शब्द मला मोगऱ्यापासून समजू लागला. दादर हि मोगऱ्याची बाजारपेठ. देवाला फुले वाहण्यासाठी अन सहज मोकळ्या केसांवर गजरे फुलण्यासाठी हा मोगरा आपल्या भागातून सकाळी लवकर दादरला पोहचावा लागे, कारण उशीर झाल्यास मोगरा फुलण्याची अन त्याचे विक्रीमूल्य घसरण्याची भीती असे. त्यामुळे मोगरा खुडण्यासाठी सकाळी खूप लवकर उठावे लागे. माझ्या माहितीप्रमाणे खूप जागा असलेली मंडळी सकाळी ३ ते ४ वाजता मोगऱ्याच्या बागेत पोहोचत असतं. ह्या वेळेला अंधार असल्याने मोठ्या प्रमाणात लोक घासलेटचे दिवे वापरत असतं. ते दिवे बांबूच्या एक काठीला बांधून मोगऱ्याच्या ताटव्यात ज्या रांगेतला मोगरा तोडायचा आहे, त्या रांगेत उभा करीत असतं. मोगऱ्याच्या सुगंधात घासलेटचा दुर्गंध मिसळत असताना माझे बालमन गुदमरून जात असे. आता ह्या गोष्टीकडे तात्विक नजरेने पहिले तर असे वाटते कि कुणाला तरी फुलून त्याचा गंध दुसऱ्याकडे पोहचवण्यासाठी कुणाला जरी जळावे लागते. मुंबई मध्ये घरातील देवासमोर सुगंधी मोगऱ्याची फुले वाहणाऱ्या भाविकाला, वसईत त्या जळलेल्या घासलेटच्या दिव्याचे महत्व कधी कलेले असेल काय?

मी लहानपणी तसा आळशी होतो. सुट्टीच्या दिवशी मलाही मोगरा तोडण्यासाठी वाडीत जावे लागत असे. सकाळी उठून वाडीत जाणे ही माझ्या दृष्टीने तसी 'सुगंधी शिक्षा' होती. पण ह्या बाबतीत माझी प्रेमळ ताई मला सांभाळून घेत असे. त्यातल्या त्यात कमीत कमी लांबीची रांग माझ्या वाट्याला ती देत असे. ही बहिणीची माया त्या मोगऱ्याच्या सुगंधापेक्षा काही कमी नव्हती. ह्या रांगा बहुतेक वेळा बागेच्या परीघावरच्या असायच्या ( आजकालच्या Nx दुकानासारख्या). मोगरा तोडत असताना बऱ्याच गप्पा रंगायच्या. कधी सुखाच्या तर कधी दुख्खाच्या. सुखाचे विषय बहरत ठेवत असताना, हा मोगरा अलगदपणे दुखःचे कटू विषय आपल्या सुगंधी पोटात घेत असे. मोगरा तोडत असताना अख्खे कुटुंब मोगऱ्याच्या ताटव्यात उभे राहून एक प्रकारे बहरत असायचे. माझा मोगरा तोडण्याचा वेग तसा कमी असायचा त्यामुळे मी रांगेच्या मध्यावर पोहचलेलो असताना बाकी लोक त्यांची रांग संपवून दुसऱ्या रांगेकडे वळायचे. माझ्या आळशीपणावर माझ्या आईचा खूप विश्वास होता, त्यामुळे माझा मोगरा तोडून झाल्यावर आई माझ्या रांगेवर पुन्हा फेरी मारून माझ्या नजरेतून राहिलेल्या मोगऱ्याची वेगळी पिशवी भरायची. मागे राहिलेला मोगरा अन मागे उरलेली नाती ह्या मध्ये आईपेक्षा जास्त साथ देणारे कोणी मिळेल का? मोगऱ्याच्या हंगामामध्ये बांबूच्या मोठ्या टोपल्या (झाप) बागेच्या कोपरयात ठेवलेल्या असायच्या. कमरेला बांधलेली पिशवी भरली कि मग ती नेऊन त्या मोठ्या टोपलीत ओतली जायची. कमरेला भरलेली पिशवी बांधलेली व्यक्ती चालताना गरोदर बाईसारखी चालायची, जे पाहताना मजेशीर होते. तसं म्हटलं तर त्या काळात पिशवीतला मोगरा पोटच्या पोरांसारखाच होता. मुलांसारखीच त्याची काळजी घेतली जात असे. दुर्दैवाने पूर्ण पिशवी भरून गरोदरपण अनुभवण्याच भाग्य मला माझ्या आळशीपणामुळे वाट्याला आले नाही.

थंडीच्या दिवसात दव पडत असल्याने मोगऱ्याचा ताटवा भिजून जायचा अन मोगरा तोडणे थोडे जिकरीचे व्हायचे. तसेच दवामुळे पिशवी ओली होऊन तिचे वजन वाढायचे ज्यामुळे पिशवी हाताळणे कंटाळवाणे व्हायचे (आळशी माणसाला कारणे शोधावी लागत नाहीत). तोच प्रकार औषध फवारणीनंतर मोगरा तोडण्यावेळी व्हायचा. मोगऱ्याच्या पानावर साचलेला औषधाचा पांढरा थर हाताला लागायचा अन मग मधेच नाकाला खाज सुटल्यास अडचण व्हायची. सकाळी उरलेला व थोडा फुललेला मोगरा सायंकाळी तोडून नाक्यावर गजरा बनवणाऱ्या बायकांना विकला जाई, ज्याचे ५-१० रुपये मिळत असतं. त्या पैशाने माझी ताई आम्हासाठी वडा-पाव आणत असे, तो वडापाव त्या काळी अप्रत्यक्षरित्या माझ्या मोगरा तोडण्याच्या आळशीपणाच्या भावना मारण्यासाठी मला उत्तेजना देत असे. आज नोकरीत मिळणारे Incentives हे त्या वादापावाचे आधुनिक स्वरूप आहे, हे नक्की. त्याकाळी आगाशीतले मिनेज कुटुंबीय आमच्या गावात येऊन मोगरा घेऊन जायचे. साधारण ७ च्या दरम्यान आमच्या चर्चच्या मागे त्यांचे वाहन यायचे. कुणाच्यातरी ओटीवर सगळा मोगरा येऊन पडायचा. मग काट्यावर मोगऱ्याचे वजन व्हायचे अन मग एखाद्या वहीत 'सायमन मेंडिस - २ किलो ३०० ग्रॅम' अशी नोंद व्हायची. काही वेळेला लिहिता वाचता न येणारी मंडळी मोगरा तोलायला यायची आणि आमची मदत घ्यायची. मग त्यांचा मोगरा तोलून तो वहीत नीट लिहिण्याची समाजसेवा मला पार पाडावी लागे. बहुदा मला जडलेला समाजसकार्याचा नाद अन लिहिण्याची प्रेरणा ह्या मोगरा तोलणे-लिहिणे घटनेतून मिळाली असावी.

मोगरा देऊन घरी परत येत असताना मोगऱ्याची रिकामी पिशवी उलटी करून त्यातला राहिलेला कचरा-पाने काढणारी अन 'आज तुवो मोगरो कोडो जालो' अशी विचारपूस करणारी मंडळी हमखास भेटायची. बहुतेक मंडळी घरतल्या वहीत किव्हा बँकेच्या कॅलेंडरवर प्रत्येक दिवसाचा मोगरा लिहून ठेवायची अन दुसऱ्या दिवशी कालचा बाजारभाव विचारून घ्यायची. महिन्याच्या आखरीला प्रत्येकाकडे महिन्याचा हिशोब अन पैसे पडायचे. त्या दिवशी प्रत्येकाचे चेहरे फुललेले असायचे, नवी खरेदी व्हायची. आज जरी जास्त आठवत नसले तरी त्या पावतीवर खाली 'चूक भूल देणे घेणे' असे लिहलेले असायचे असे आठवते. अनेक ग्राहकांचा बोटावर आकडेमोड करून हिशोब ठेवत असतांना असे एरर होणे साहजिकच होते. लोकही मोठ्या समजुतीने चूक भूल देत घेत असतं अन म्हणूनच आपल्याकडे मोगरा अन माणसामाणसातील विश्वास जुन्या काळात फुलत राहिला. आजही आमचे मिनेजकडील जॉन भावजी फुलांचा, प्रामुख्याने मोगऱ्याचा व्यवसाय करतात. त्यांच्या यामाहा बाईकवर दोन हातामध्ये आडवी ठेवलेली मोठी काळी पिशवी आज त्यांची ओळख झालेली आहे. फुलाच्या व्यवसायातून जेव्हा त्यांनी आपला बंगला बांधला तेव्हा बंगल्यासाठी 'फुलराणी' पेक्षा जास्त समर्पक नाव त्यांना शोधून सापडले नाही. त्यांनी आजही रेल्वेच्या डब्यात ठेवलेली मोगऱ्याची पिशवी कोणत्याही माणसाची सोबत न घेता सहजपणे दादर स्टेशन गाठते अन हमाल ती पिशवी बरोबर ओळखून ती उतरवून दादरला मार्केटमध्ये त्यांच्या गाळ्यात पोहचवतात.

अशा ह्या मोगरयाने एक काळ आपली फार मोठी सेवा केली. कुटुंबे फुलवली. तो बहरत राहिला अन आपण शिकत राहिलो. कमरेला मोगऱ्याची पिशवी होती म्हणून आज पाठीला laptop ची Bag आली. आज ते दिवस स्मरत असताना अलगदपणे तो सायंकाळचा फुललेला मोगरा आठवणीच्या पिशवीतून ओसंडून वाहतो. मन फुलते, शरीर बहरते अन काळाच्या वेगात मोगऱ्याची ताटातूट झाल्याची एक अनामिक सल काळजाला छेदून जाते. माणसांच्या अंतरंगाला सुगंधी करणारा मोगरा डोळ्यांच्या पापण्याही तितक्याच अलगदपणे ओल्या करतो. मोगऱ्याच्या बागेत बालपणी सुगंधी मोगरा तोडणारा 'सचिन', ते जगातल्या सर्वात मोठ्या सुगंध बनवणाऱ्या कंपनीत काम करणारा 'मेंडिस', हा प्रवास म्हणूनच मला मोगऱ्या इतकाच सुगंधी अन टवटवीत वाटतो. आजही अनेकांचे संसार मोगऱ्याच्या फुलाबरोबर बहरत आहेत. माझ्या आठवणीतला मोगरा, पुढे माझ्या लेखणीत आला. 'मोगरा फुलला' तशी माझी 'कविता' फुलत गेली. मोगऱ्याचे गीत कवितेतून फुलू लागले. मोगरयाने माझे घर भरले, मला उभे केले, समाजाची रिकामी ओंजळ समृद्धीने भरली. हा ओंजळीतला मोगरा सदा फुलू दे, बहरू दे. आजच्या धावपळीच्या ग्लोबल जीवनात त्याला ओंजळीत घेणे जरी शक्य नसले तरी त्याला आठवणीत फुलवणे आपल्याला सहज शक्य आहे, फक्त त्याचे ऋण मान्य करायला सुगंधी अन टवटवीत मन हवे !!

डरना मना है: एक गूढ कथा

डरना मना है: एक गूढ कथा

ही कसली विचित्र पैज. ती सुद्धा गावात सर्वात डेअरिंगबाज मुलगा म्हणून पहिला येण्याची. अन पैज पण कोणाबरोबर? तर अगदी जवळचा मित्र सीझर बरोबर. तसा रोशन डेअरिंगबाज मुलगा, भीती त्याला माहित नाही. पण अशी विचित्र पैज. रात्री १ वाजता गावापासून दूर निर्जन वाडीत जाऊन तिथे विहिरीच्या बाजूला बसून 'हॉरर मूवी' पाहायची, ती पण एकट्याने. अन पिक्चर कोणता ते पण सीझर ठरवणार. वर पिक्चर laptop मध्ये लोड न करता पेन ड्राईव मध्ये. अन तो पेन ड्राईव रोशन च्या हातात न देता सीझरने संध्याकाळी जाऊन त्या विहिरीच्या बाजूला असलेल्या त्या निर्मनुष्य मोडक्या झोपडीच्या दाराला लावून ठेवायचा अन सोबत त्या laptop चा लॉगइन आणि पासवर्ड तिथेच कागदावर लिहून ठेवायचा. म्हणजे रोशन त्या जागेवर पोह्चाल्याशिवाय पिक्चर पाहूच शकणार नाही. रोशनने पैज मान्य केली. आज रात्री तो त्या निर्जन वाडीत जाऊन तिथे विहिरीच्या बाजूला एकांतात 'हॉरर मूवी' पाहणार होता. त्याला गावातील सर्वात 'डेअरिंगबाज' असल्याचे सिद्ध आज करायचे होते.

आज हवेत गारवा होता. साधारण रात्री १२.३० च्या सुमारास सीझर आणि रोशन गावातल्या क्रॉस जवळ एकत्र आले. सीझरने त्याची laptop ची bag रोशन कडे सुपूर्द केली आणि त्याला निघण्याचा इशारा केला. रोशनची पाऊले वाडीच्या दिशेने गावाबाहेर पडू लागली. गावात ठार काळोख होता, रातकिड्याचा कर्णकर्कश आवाज रात्रीला कापत होता. ढगाळलेल्या आकाशात चंद्र गायब झाला होता. तसा क्रिकेट खेळण्यासाठी रोशन त्या रस्त्याने गावातील वाडीत येत होता, परंतु तो नेहमी दिवसा. आजची परिस्थिती वेगळी होती. मध्यरात्री एकट्याने ह्या अंधारात वाट शोधणे त्याला कठीण जात होते. अंगात सफेद टीशर्ट, ब्लू जीन्स, पायात स्पोर्ट शूज आणि पाठीला काळी laptop bag अशी त्याची आकृती काळोखात पुढे जात होती. गावातल्या अतुकाकाने अलीकडेच त्यांचे नवीन घर वाडीतल्या केळीच्या बागेत बांधले होते. त्यांच्या घरामागील बल्बचा थोडा उजेड त्याला जाताना दिसत होता. गावातल्या कुत्र्यांचे रडणे त्याचे कान भेदत होते. किती विचित्र रडतात ना हे कुत्रे, रोशन स्वतःशीच बोलून गेला. रोशन उजवीकडे वळला, पुढे चढण होती अन मग नारळाची बाग. त्याने नारळाच्या बागेत प्रवेश केला अन झपाझप चालू लागला. अचानक जोरात आवाज झाला तो जागीच थांबला. नारळाची एक झावळी समोरच्या माडावरून कोसळून त्याच्या पुढ्यात येऊन पडली होती. क्षणभर रोशनला काही समजले नाही, त्याने ती झावळी बाजूला करून पुढचा मार्ग पकडला. आता तो मोकळ्या अशा उजाड जागेवर आला होता. कधी कधी गावातील मुले क्रिकेट खेळण्यासाठी ह्या भागात येत असत. चंद्राच्या मंद प्रकाशात क्रिकेटचे पीच अस्पष्ट दिसत होते. रोशन चालत राहिला. डाव्या बाजूला थोडे पुढे गेले कि तिथे आंब्याचे एक झाड होते अन मागे एक मोठे बावखल. रोशनने चालता चालता बावखलाच्या दिशेने नजर टाकली, आकाशातील चंद्राचे प्रतिबिंब बावखालातील पाण्यावर पडलेले होते. रोशनने आकाशात पाहीले अन पुन्हा तो झपाझप चालू लागला. गावापासून आता तो खूप दूर आला होता. अजून ५ मिनिटे चालले कि डावीकडे वळून मोगऱ्याच्या बागा, त्या पार केल्या कि ती विहीर. ४-५ वर्षाअगोदर एक बाई तिथे राहत होती पण ती कुठे गायब झाली ते कुणालाच माहित नव्हते.

हवेत थंडी वाढली होती. रोशनला थकवा जाणवत होता पण लक्ष्य समोर दिसत होते. त्याने मोगऱ्याची बाग पार केली अन तो पुढे आला. चंद्र ढगाआड केल्याने अंधार वाढला होता. आता त्याला मोडकी झोपडी दिसू लागली, अन बाजूला ती विहीर. बहुतेक तो कोल्ह्याचा आवाज असावा. वाडीत रात्री कोल्हे रडतात हे त्याने ऐकले होते पण आज तो अनुभव घेत होता. तो झोपडीच्या बाजूला आला. त्याला आता झोपडीचे दार गाठून पेन ड्राईव व लॉगइन आणि पासवर्डसाठी कागद घ्यायचा होता. थोडा आडोश्याला तो दरवाजा होता. त्याच्या एका टोकाला खिळ्याला पेन ड्राईव व एक कागद बांधून ठेवला होता. रोशनने दोन्ही वस्तू हातात घेतल्या अन तो विहिरीच्या बाजूला असलेल्या लाकडाच्या ओंडक्यावर बसला. laptop च्या स्क्रीनवरील उजेडाने विहिरीबाजूचा अंधार थोडा दूर झाला होता. रात्रीचा साधारण एक वाजला होता. रोशनने पाठीवरचा laptop काढला अन ऑन केला. हातातील कागद उघडून त्यातील लॉगइन आणि पासवर्ड त्याला घ्यायचा होता. त्याने कागद उघडला. सीझरने त्यावर लॉगइन आणि पासवर्ड लिहिला होता. लॉगइन: 'अननोन' आणि पासवर्ड: 'इमेज'. काय विचित्र लॉगइन आणि पासवर्ड. रोशनने मनातल्या मनात म्हटले. आता laptop सुरु झाला होता. रोशनने हलकेच पेन ड्राईव laptop ला लावला आणि फोल्डर ओपन केले. 'अननोन इमेज' म्हणून एक विडीयो फ़ाइल त्यात सेव केलेली होती. रोशनने मूवी सुरु केली. कोणता पिक्चर असेल बरे? रोशनने विचार केला. पिक्चर सुरु झाला. ना सुरवातीचे नाव ना काही. कसला पिक्चर असेल बरा. त्याला फक्त काळोखी रात्र दिसत होती, त्या पिक्चरमध्ये. सर्वत्र अंधार अन कुठली तरी नारळाची वाडी. अचानक एक व्यक्ती त्या बागेत चालताना दिसू लागली. पाठमोरी आकृती होती ती. हळूहळू आकृती स्पष्ट होत गेली. सफेद टीशर्ट, ब्लू जीन्स, पायात स्पोर्ट शूज आणि पाठीला काळी laptop bag. अशी ती आकृती पिक्चरमधील काळोखात पुढे जात होती. अरे बापरे, काय हे विचित्र? ही आकृती तर माझ्या सारखीच अन ती नारळाची बाग, आताच मी चालून आलो. कोण असेल तो तरुण त्या पिक्चरमध्ये? अन तो अचानक थांबला का त्या नारळाच्या बागेत? रोशन उत्कंठतेने पाहू लागला. पिक्चरमधील त्या तरुणाने त्याच्या समोर पडलेली नारळाची झावळी उचलून बाजूला केली अन तो पुढे चालू लागला. काय हे विचित्र, नुकताच मी ती झावळी उचलली तसेच दृश्य. पिक्चर पुढे सरकत होता अन तो तरुणही झपाझप पुढे चालत होता. बापरे, हे काय पुन्हा. तेच बावखल अन तीच चंद्राची सावली त्या पाण्यात. क्षणभर रोशनला काही कळेनासे झाले. आपल्या चालण्याची कोणीतरी शूटिंग करून तीच मूवी आपल्याला laptop वर दाखवत आहे, असे त्याला त्या क्षणी वाटू लागले. (हि कथा 'सचिन मेंडिस' ह्यांची असून पूर्व परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित किव्हा पोस्ट करू नये.)

पिक्चरमधील तरुण आता एका निर्जन ठिकाणी आला होता. समोर एक विहीर होती अन त्याच्या बाजूला एक मोडकी झोपडी. रोशनच्या समोर असलेल्या झोपडीच्या हुबेहूब ती झोपडी होती. तो तरुण झोपडीच्या दाराजवळ गेला अन त्याने झोपडीच्या दरवाजाजवळून काही वस्तू हातात घेतली अन तो विहिरीबाजुच्या ओंडक्यावर येऊन बसला. त्याने पाठीवरचा laptop काढला अन ऑन केला. हातातील कागद उघडून त्यातील काही पाहून त्याने laptop वर टाईप केले. लॉगइन आणि पासवर्ड असावा का? काय असेल त्याचा लॉगइन आणि पासवर्ड? अननोन इमेज असेल काय? रोशन विचारात गुंग झाला. अचानक पिक्चरमधील कोल्हयाचे रडणे त्याला ऐकू आले अन तो भानावर आला. पिक्चरमधील तरुण laptop मध्ये गढून गेला होता, अचानक त्या तरुणाने हातात्तील घडाळ्याकडे पाहीले. त्याच्या घडाळ्यात रात्रीचा १.३० वाजला होता. रोशनने ताबडतोब स्वतःच्या घडाळ्याकडे पाहीले. 'ओह माय गॉड', घडाळ्यात रात्रीचा १.३० वाजला होता. काय हा विचित्र योगायोग. दोन्ही ठिकाणी सारखीच वेळ. रोशन पुढे पिक्चर पाहू लागला अन आलेल्या दृश्याने त्याची बोबडी वळाली. भर थंडीत त्याला घाम फुटला. पिक्चरमधील त्या तरुणाच्या पाठीमागे साधारण १० फुट लांब एक अनोळखी आकृती उभी होती. केस मोकळे सोडलेली बाई असावी बहुतेक. हळूहळू ती आकृती त्या तरुणाकडे सरकू लागली. जोरात ओरडून त्या तरुणाला सावध करावे असे रोशनला वाटत होते पण शेवटी तो एक पिक्चर होता. आता ती केस मोकळे सोडलेली अनोळखी आकृती त्या तरुणाच्या अगदी मागे हात लागेल इतक्या जवळ आली होती. रोशनच्या मनात एक वेगळीच धाकधूक निर्माण झाली होती. अचानक त्या अनोळख्या आकृतीने आपला हात त्या तरुणाच्या अंगावर ठेवण्यासाठी पुढे केला अन पुढे पाहणार तोच laptop बंद झाला. बहुतेक battery ऑफ झाली असावी. पुन्हा एकदा तो विहिरी बाजूचा परिसर काळोखात बुडून गेला. आता फक्त चंद्राचा अंधुक प्रकाश रोशनच्या सोबतीला होता. रोशन गार पडला होता. त्याने जे समोर पाहीले त्या दृश्याने त्याचे हातपाय लटपटू लागले. संपूर्ण अंगावर काटे उभे राहिले. कानामागून घामाची एक धार वाहून खाली अंगावर सरकली. त्याच्या पुढ्यात एक गूढ सावली पडली होती. तशीच हुबेहूब, तीच ती पिक्चरमधील केस मोकळे सोडलेली अनोळखी आकृती. रोशन त्या आकृतीकडे भीतीने पाहू लागला अन अचानक त्याच्या खांद्यावर एक थंडगार हात पडला, त्याने मागे वळून पाहीले अन.........

सकाळी विहिरीभोवती गाव जमा झाला होता. रोशन बेशुद्ध अवस्थेत खाली पडला होता. त्याच्या तोंडातून फेस येत होता व हातात एक कागद होता. त्यावरील अक्षरे सहज दिसत होती. लॉगइन: सीझर आणि पासवर्ड: हॉरर. रोशनला डॉक्टरकडे नेण्याची धावपळ सुरु झाली. गावातील तरुण मंडळी सीझरवर तुटून पडली होती. त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार होत होता. कोणता पिक्चर टाकला होता रे मुर्खा त्या laptop मध्ये?' एका मित्राने सीझरला झापत विचारले. सीझर शून्यात बसला होता. सीझरच्या तोंडातून हलकेच उत्तर आले, 'तोच पिक्चर, रोशनचा फेव्हरीट, रामगोपाल वर्माचा, 'डरना मना है'.

माझ्याच सारख्या तरुणांसाठी उगाच सुचलेली कविता !!

माझ्याच सारख्या तरुणांसाठी उगाच सुचलेली कविता !!
 -----सचिन मेंडिस------

निकाल लागला, पण तसं काही विशेष वाटत नाही.
कोण जिंकले कोण हरले, पण डोळ्यात पूर्वीसारखे अश्रू साठत नाही.
ठाकूर निवडून आल्याचा द्वेष नाही
पंडित, फुर्ट्याडो, तुस्कानो पडल्याचा क्लेश नाही.
सगळ कसं सरळ रेषेत चालू आहे, ना द्वंद ना खंत
आता लढणे नाही, पडणे नाही कि कुणाला पाडणे नाही.


पंडित निवडून आले होते, म्हणून फुकटात काही घरात आले नाही,
 अन ठाकूर निवडून आले म्हणून, घरातून कोणी काही नेणार नाही,
म्हणून खंर सांगू, निकाल लागला, पण तसं काही विशेष वाटत नाही,
 कोण जिंकले कोण हरले, पण डोळ्यात पूर्वीसारखे अश्रू साठत नाही.

अंदाज चुकले, आकडे फिरले,
 ज्याचा आकडा जास्त, तो राज्यकर्ता.
 सगळा आकड्यांचा खेळ,
ज्यांचे जास्त आकडे, तोच प्रजेचा कर्ताधर्ता,

आपल्याला आकड्यांसाठी
 ७.१४ ची अंधेरी लोकल रोज पकडायलाच हवी,
बाकी आपली तिचं हरित वसई
 अन तिचं संघर्ष कहाणी.
सगळ कसं सरळ रेषेत चालू आहे, ना द्वंद ना खंत
 आता लढणे नाही, पडणे नाही कि कुणाला पाडणे नाही.

 जिथून सुरु केलं होत २००८ साली,
 त्याच रस्त्यावर येऊन पोहोचलंय,
एक वर्तुळ पूर्ण फिरून,
आज त्याच पूर्वीच्या जागेवर थांबलोय,
 तसं हाती काही लागलं नाही
 अन हाती काही लागणारही नव्हत.
 हात कधी आपण पसरले नाहीत,
अन कधी पाठीत वाकणारही नव्हतो.
 मिरवावं असं भरीव काही, आज मागे सुरलं नाही
 पोलिस केसेस अन कोर्टाच्या तारखा,
त्याचही दुख: उरलं नाही.
ज्यांच्यासाठी लढायचं, तेच आज असे परके झालेत,
 ज्यांच्याविरुद्ध लढायचं, तेच समाजाचे आश्रयदाते झालेत,
 म्हणून सगळ कसं सरळ रेषेत चालू आहे, ना द्वंद ना खंत
 आता लढणे नाही, पडणे नाही कि कुणाला पाडणे नाही.

 जमेपेक्षा खर्च जास्त येईल, ह्याची भीती धरली नाही, ख
रंतर जमा खर्च मांडायची, आज इच्छाच उरली नाही,
ना नाउमेद झालो मी, ना सोडले रणांगण मी
फक्त लढण्याचा भ्रम, समाज परिवर्तनाची खाज, पोरा आता आवरायला हवी.
डोळ्यातील धग, अंगातली रग, पोरा आता सावरायला हवी.

आता शेजारया सारखं शांत बसायचं, त्यांच्यासारखी टोपी फिरवायची,
 हिरव्या वसईची 'सुवार्ता', आता बिलकुल नाही मिरवायची,
कुणी लाठी उगारली तर मनोसोक्त हसायचं, कुणी दुकान लुटलं तर चुपचाप बसायचं
 सगळ कसं सरळ रेषेत चालू आहे, चालू राहील, ना द्वंद ना खंत
आता लढणे नाही, पडणे नाही कि कुणाला पाडणे नाही.

 -----सचिन मेंडिस------