Pages

Thursday, September 18, 2014

गुलमोहर !

गुलमोहर ..नुसते नाव समोर आले तरी मन मोहरून जाते. शाळेतल्या पटांगणातील गुलमोहराचे झाड हळूच आठवणीच्या खिडकीतून बाहेर डोकावते. ती भव्यता, ती सावली अन जोडीला लाल गर्द गुलमोहराच्या फुलांचा सडा मनाचे अंगण व्यापून टाकतो. कधी रस्त्यात, प्रवासात कुठे फुलांनी मोहरलेला गुलमोहर दिसला तर मन प्रसन्न होते. जगण्याला एक वेगळी उभारी मिळते. ऑफिस, संसार, धावपळ, तडजोडी ह्यांच्या पलीकडे जाऊन क्षणभर गुलमोहराच्या कुशीत विसावा घ्यावासा वाटतो. आठवणीचा गुलमोहर असा फुलतो की मग फुलतच राहतो.. आयुष्य मोहरून टाकतो अन नकळत चेहऱ्यावर गुलमोहरी गर्द केशरी छटा उमटून येते. पक्ष्यांचा किलबिलाट कानी वाजतो अन मनाच्या फांदीवर एक वेगळा ऋतू जन्म घेतो, पुन्हा गुलमोहर मनात रुजू लागतो अन हलकेच ओठी शब्द येतात ‘दूर असता तू ,क्षण वाटे प्रत्येक प्रखर ! तू येता अशी समीप ..मनी फुले मग गुलमोहर’!! सचिन मेंडीस

No comments:

Post a Comment