Pages

Thursday, January 1, 2015

एका लग्नाची मजेशीर गोष्ट !!

एका लग्नाची मजेशीर गोष्ट !!
-----------------------------------------------------------------------
सचिन मेंडिस

आपल्या इकडे लग्न म्हटलं कि तयारी खूप आधीपासून सुरु होते, पण कितीही केले तरी बारीक सारीक गोष्टी राहून जातात अन ऐन वेळेला गोंधळ होतो. प्रसंगी काही गोष्टी सांभाळता येतात तरी काही अडचण करतात. अलीकडेच एका लग्नातील गोष्ट. रविवारी सकाळी नवरा मुलगा घरून मुलीच्या धर्मग्रामातील चर्चकडे लग्न लावायला जाण्यासाठी तयार झाला. साधारण आपल्याकडे निघताना बाज्यांच्या तालमीत गावाच्या वेशीपर्यंत चालत जाण्याची पद्धत आहे अन मग पुढे सजवलेल्या कारने चर्चचा प्रवास. ह्या छोट्याशा प्रवासात जितके बाजेवाले महत्वाचे आहेत, तितकीच नवरयाच्या डोक्यावर फिरणारी छत्री अन ती छत्री धरणारा अन गोल गोल फिरवणारा अनोळखी चेहरा. तसा तो दुर्लक्षित माणूस पण वेळ आली तर खूप महत्वाचा. तर झालं काय नवरा मुलगा घरून निघण्यासाठी तयार, बाजेवले तयार, घरची मंडळी तयार अन छत्री पण तयार पण छत्री फिरवणारा नाही तर करायचे काय? ज्या वारली मुलाला छत्री फिरवण्याचे कंत्राट दिले होते त्याने आदल्या रात्री यथेच्च दारू प्याल्याने सकाळी त्याची छत्री मोडली होती. त्याला बोलवायला अन उठवायला ३ वेळा घरातील माणसे जाऊन आली पण त्याचा मांडव असा मोडलेला कि उभा करणे अशक्य. अन इकडे लग्नाच्या मिस्साची वेळ होत आलेली. मग कुणीतरी मनाचा मोठेपणा दाखवून तात्पुरती छत्री नवरोबाच्या डोक्यावर धरली अन नवरा कारपर्यंत पोहचवला. पुढे तात्पुरती छत्री धरणाऱ्या महामानवाने इथे लग्नाचे मिस्सा संपेपर्यंत धावाधाव करून छत्री धरण्याचा कंत्राटदार बदलला. नाहीतर ते कंत्राट त्याच्या गळ्यात पडायचे.

हा किस्सा पहा. वरच्या घटनेत छत्रीवाला नव्हता म्हणून घोळ झाला होता, अन ह्या घटनेत छत्रीवाल्यामुळे घोळ झाला. तर घडले असे कि लग्न लावण्यासाठी नवरा मुलगा घरून निघाला. चर्च जवळ असल्याने लवाजमा पायीच निघाला होता. नवऱ्याच्या मागे छत्री फिरवणारा छत्रीवाला आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे तोंडात माणिकचंद गुठका कोंबून रवंथ करीत होता. नवरा मुलगा जेव्हा नंदाखाल चर्चच्या पायरीजवळ पोहचला तेव्हा अनपेक्षित घडले. त्या छत्रीवाल्या व्यक्तीला जोराची शिंक आली अन नवऱ्या मुलाचा सूट पाठीमागून माणिकचंद गुठ्क्याने रंगून गेला. त्या छत्रीवाल्या व्यक्तीने आपली 'ऊंची पसंद' माझ्या मित्राच्या पाठीवर फुलवून ठेवली होती. मग काय सगळे घरचे अन पाहुणेमंडळी आपापले रुमाल काढून त्या छत्रीवाल्याचा आशीर्वाद आपापल्या रुमालात जमा करू लागले. तब्बल १० मिनिटे मित्राची पाठ थोपटून काढल्यावर त्याचा सूट माणसात आला अन सगळी मंडळी चर्चमध्ये पळाले. नंतर पूर्ण दिवस छत्रीवाल्या व्यक्तीने माणिकचंद गुठ्क्याचा उपवास करून माझ्या मित्राचे सांत्वन केले.

दुसरा किस्सा, लग्नाचा केक कापण्यासाठी स्टेजवर प्रार्थना सुरु होती. मंडप पाहुण्यांनी फुलून गेला होता. सूत्रसंचालन करणारा माणूस नवरा नवरीची मनोसोक्त स्तुती करत होता. ती स्तुती ऐकून उगाच नवरा नवरीला मनोमन ह्यापेक्षा अधिक चांगला जोडीदार मिळाला असता, असे क्षणभर वाटले असावे. अन वराच्या मात्यापित्याला एवढे गुणी रत्न इतके वर्षे आपल्या घरात असून आपल्याला त्याची जान नसल्याचे शल्य टोचले असावे. तर तिकडे मंडपात भुकेने व्याकूळ झालेले लोक केक कापतो कधी अन कधी आपण जेवणाच्या रांगेत घुसतो ह्या स्थितीपर्यंत आलेले होते. शेवटी लोकांच्या संयमाची परीक्षा घेऊन झाल्यावर त्या सूत्रसंचालकाने नवरा नवरीला केक कापून आपला आनंद द्विगुणीत करण्याची आज्ञा केली. नवरा नवरी खुर्ची सोडून केकच्या टेबलजवळ आले. डीजेने Congratulations चे गाणे रेडी केले. बेस्टमन सुद्धा टेबलाच्या डोक्यावरील कबुतराच्या पोटातील दोरी खेचून थर्माकोलच्या दाण्याने नवरा नवरीला आशीर्वाद देण्यासाठी सज्ज झाला. पण हाय रे देवा !! केक कापायला सुरी होती कुठे तिथे? नवरा सूत्रसंचालकाच्या तोंडाकडे पाहत होता अन सूत्रसंचालक खाली. मग धावाधाव झाली अन दोन तीन लोक सुरी आणण्यासाठी घरात पळाले. पण लग्नाच्या घरी एखादी वस्तू जागेवर मिळेल तर ते लग्नाचे घर कसे. लग्नात घर जितके बाहेरून सुंदर दिसते त्यापेक्षा जास्त ते घरातील खोलीत अन किचन मध्ये विस्कटलेले असते. शेवटी एकाला बुद्धी सुचली अन त्याने मंडपाच्या मागे काकडी कापायला घेतलेली सुरी उचलून आणली अन तमाशा संपला.

आता हा किस्सा जुन्या काळातला. तेव्हा एकूणच गरिबीची परिस्थिती असल्याने प्रत्येकाला लग्नासाठी नवीन सूट शिवणे शक्य नव्हते, म्हणून मंडळी दुसऱ्याकडून सूट घालायला आणायची. तर किस्सा असा की एका नवरयामुलाने असाच दुसऱ्या कडून लग्नासाठी सूट आणला होता पण ट्राय करून पाहिला नव्हता. कारण तेव्हा तितके चोईस ही नव्हते. सूट विना भाड्याने मिळणे हेच मोठे होते. तर झालं असं कि ह्या नवरया मुलाने चर्चला जाण्यासाठी तयारी सुरु केली. ह्याची कंबर ३० ची अन ज्याची pant मागून आणली होती त्याची कंबर ३६ ची. झाले ना वांदे. आता शेवटच्या क्षणाला काय करायचे? पण शेवटी कुपारी तो कुपारी. एकाने शक्कल लढवली. नवऱ्याच्या कमरेला टॉवेल गुंडाळला अन त्यावर pant चढवली अन छान पैकी पट्ट्या ऐवजी 'हुम्बडी' वापरून नवऱ्याचे माप pant वापरण्यायोग्य केले. अन मग कमरेचे झाकण्यासाठी वरून सूट अंगावर आला. प्रश्न सुटला जरी नसला तरी झाकला गेला होता. बिचाऱ्या नवऱ्याला नावळ आणताना एक हात नवरीच्या हातात अन दुसरा pant सांभाळण्यात वापरावा लागला. 'सूट नको पण टॉवेल आवर' असे बिचाऱ्याला वाटले असावे.

आता हा किस्सा माझ्या परमप्रिय मित्राचा. त्याला बहुतेक लग्नात स्टेजवर सूत्रसंचालन करण्यासाठी बोलावले जाते. तर झाले असे कि केक कापण्या अगोदर त्याने सुखाला प्रार्थना घेतली अन बिचारा तिथेच फसला. 'आमच्या स्वर्गीय बापा, ........... सुरुवात झाली अन मध्ये गाडी अडकली. पुढचे काही आठवेना अन लोकही त्याला साथ देईना. २ मिनटे स्तब्धता. बिचारा काकुळतीला आला. पण शेवटी साहस करून त्याने डायरेक्ट 'नमो मारिया' वर उडी घेतली अन प्प्रार्थनेची गाडी केक पर्यंत पोहचली. प्रश सोडून दिल्याने सुटतात असे जे म्हटले जाते त्याचा हा अनुभव. ह्या धड्याने त्या मित्राने कानाला पीळ घेतला अन नंतर केक कापताना प्रार्थना कायमची टाकून दिली. कुमसारा अगोदर 'धोत्रीन' ला दांडी मारली कि काय होते त्याची शिक्षा त्याला अशी मिळाली होती.

एकदा असाच जवळच्या मित्राच्या लग्नाला थोडा उशिरा पोहोचलो. केक वैगरे कापून झाला होता. मंडप लोकांनी भरलेला पण स्टेज रिकामे होते. च्या आयला, नवरा नवरी गेले कुठे गेले? मंडपात गेल्यावर कळाले कि, केक कापताना दुर्दैवाने स्टेजच्या मागील मधमाशीच्या पोळ्यातील मधमाश्यांनी विना आमंत्रण स्टेजवर एन्ट्री केली होती. अन त्यांना माझ्या मित्राचे चुंबन घेऊन शुभेच्छा देण्याची अपर इच्छा झाली होती. पण नशीब चांगले कि कुणाच्या तरी ते उडणारे पाहुणे लक्षात आले अन स्टेजवरची नावळ खाली उतरली. असाच दुर्दैवी प्रसंग एका दुसऱ्या परिचित असलेल्या नवरयाच्या वाट्याला आला होता. केक कापताना कुणा वात्रट मुलाचा नेम चुकून स्टेजवर उडवण्यात येणारा कागदी फटाका नवऱ्याच्या नाकावर बसला होता अन त्यामुळे त्याचे तोंड अन फोटो बर्यापैकी बिघडले होते. एकदा तर आमच्या गावात एक बाका प्रसंग आला होता. नावळ गावात पोहचली अन मंडपातील जनरेटर बंद पडले. मंडप वाल्याला सांगितले तर तो म्हणाला 'जनरेटर बंद झाले हा काय माझा दोष आहे का?' शेवटी ठाकठोक करून ते जनरेटर चालू झाले, पण उजेड एवढा कमी होता कि भाजी संपली अन चिकन उरले. हा मंडपवाला आपण नक्कीच ओळखला असेल, अशी त्याच्या कामाची कीर्ती अन कम्पलेटची महती आहे.

मित्रानो, अशा अनेक गमती जमती, कडू गोड प्रसंग आपण पहिले असतील किव्हा ऐकले असतील तर इथे शेर करा. सीजन लग्नाचा आहे. 'पुढच्यास ठेच मागचा शहाणा' ह्या म्हणीप्रमाणे लोक केप कापण्याची सुरी, सूटची pant , छत्रीवाला, जनरेटर तसेच फटाके फोडणारे मुलगे अशा गोष्टीची पुढे योग्य काळजी घेतील. मंडपात मधमाशाचा पोळा असल्यास त्याचा बंदोबस्त करतील अन विशेष म्हणजे पूर्ण प्रार्थना येणारा सूत्रसंचालक शोधून काढतील.

No comments:

Post a Comment