Wednesday, October 13, 2010

चतुर (मेंडो): एक हरवलेले खेळणे




चतुर (मेंडो): एक हरवलेले खेळणे

काल अंगणात उभा असताना एक चतुर (मेंडो) येऊन समोरच्या गवताच्या पातीवर बसला अन नकळत मन बालपणीच्या आठवणीत गेले. पावसाळा संपून ऑक्टोबर महिना येण्याच्या काळात चतुराची वर्दळ जास्त असायची. तसा ऑक्टोबर महिना हा शाळेत असताना दिवाळीच्या सुट्टीचा महिना म्हणून जास्त विद्यार्थीप्रिय होता. तेव्हा सद्या सारखी खेळणी आणि मनोरंजनाचे साधन नसल्याने चतुरासारखे सहज,स्वस्त अन नैसर्गिक खेळणी म्हणूनच जास्त प्रिय होती. सुट्टीच्या दिवसात संध्याकाळी चतुर पकडण्याचा एककलमी सार्वजनिक उपक्रम संपूर्ण गावातली बच्चे कंपनी खरोखरच एन्जॉय करीत असे. आपणही ह्या 'चतुराईत' सहभागी झाला असाल ह्याची मला खात्री आहे.

साधारणपणे सूर्यास्ताच्या वेळेला वाडीच्या आसपास ह्या चतुरांचा घोळका दिसायचा. त्यांचे आवडते बसण्याचे ठिकाण म्हणजे वांग्याच्या झाडाच्या सुकलेल्या फांद्या. चतुरांच्या आकारमानाप्रमाणे त्यांची नावेही विलक्षण व विचित्र अशी होती. नांगर मेंडो, पोलीस मेंडो, लाल मेंडो हि मला माहित असलेली खास नावे. त्याचबरोबर चतुरांची नवरी म्हणून फेमस असलेली ' सुईकाडी' हि सुद्धा तितकीच लक्षात राहणारी होती. आता फिटनेस च्या नावाखाली शिडशिडीत झालेल्या मोडेल्स बघितल्या कि त्या सुईकाडीची आठवण येते, असो. चतुर पकडायचा म्हंजे फार कौशल्याचा प्रकार. अतिशय शांतपणे चतुराला कळू न देता अलगदपणे त्याची शेपूट पकडणे म्हणजे तारेवरची कसरतच. पण सवयीने तेही जमून जायचं. एकाद्या नांगर मेंड्यामागे अख्खी संध्याकाळ कधी संपून जायची हे कळायचेही नाही. काही चतुर 'स्मार्ट ' असत, पकडणारा शेपटीच्या बाजूला पोहोचल्यास चतुर आपली शेपटी त्यांच्या विरुद्ध दिशेला नेऊन आपली मान ३६० अंशात फिरवून समोरच्याला ठेंगा दाखवत असे.

चतुर पकडल्यानंतर त्याच्या शेपटीला सुत बांधून "पतंग' उडवण्याचा खेळ म्हणजे काही न्याराच. आपला तेव्हाचा खेळ तेव्हा त्यांचा जीव घेत होता हि जाणीव आता थोडी अपराधीपणाची वाटते. मात्र काही उनाड मुलांना चतुराच्या शेपटीला सुत बांधण्यात काही 'थ्रिल' वाटत नसे, ते सरळ त्याच्या 'मानगुटीलाच' हात, माफ करा 'सुत' घालत असतं. कोणत्या दहशतवादी कृत्याची त्यांना ‘फाशी’ होत असे हे मात्र न उलगडणारे कोडं आहे. एक मात्र खर, कीटक असो व मनुष्यप्राणी, शून्य उपद्रवी जीवाचे येथे मोल नाही हेही वास्तव मोठे आहे. असो, शेपटाला सुत बांधणारे आमच्यासारखी मंडळी दहावीला चांगले मार्क मिळवून अभियंते बनली अन रोजची लोकलला टांगली, तर उनाड पोरांची जेमतेम दहावी पास झालेली टोळी 'बोटीला' लागली. चतुराच शेपूट आम्हाला ‘पावलं’ नाही मात्र चतुराच 'मानगुट' उनाड पोरासाठी आशीर्वाद देऊन गेलं असंच म्हणावे लागेल।
काही वेळेला फाशी दिलेल्या चतुरावर ताव मारण्यासाठी काळ्या मुंग्याची फौज लांबच लांब रांगा लावत असे, आणि एकाच वेळी अनेक छोट्या छोट्या मुंग्या त्या अजस्त्र चतुराला खांद्यावर घेवून जात असताना पाहून आश्चर्यही वाटत असे. एकास एक चिकटलेले उडणारे चतुर बघण्यात मजाही काही औरच होती. थकलेल्या आपल्या सहकारी चतुरला दुसरा ' खांदागुडी' घेत असावा असे तेव्हा वाटत असे, मात्र सज्ञान झाल्यावर हे प्रकरण ‘भलतेच’ आहे, हे समजलं आणि हसू आलं।

प्रत्येक गावांच्या समवयस्क मुलांमध्ये एखादा अबोल 'भोळा' मुलगा नेहमी सापडायचा, जो नेहमी उनाड मुलांचा टिंगल-टवाळी साठी हक्काचा 'ग्राहक' असायचा.असा प्राणी चतुर पकडण्यासाठी गेल्यानंतर इतर उनाड मुले आरडओरडा करून किवा वांग्याच्या दांडीवर दगड मारून त्याला अयशस्वी करायची अन त्याचे भोळेपण शाबूत ठेवायची. आता मोठे झालेले हे 'भोळे' आपल्या आईबापाच्या पोटात 'गोळे' आणताना पाहून त्यांच्या हातून 'सुटलेल्या' चतुराची आठवण येते. वाटते कि ह्या भोळे मंडळीनी लहानपणी चतुर 'पकडले' असते तर आज त्यांचे आईवडील 'सुटले' असते.

आज चतुर जास्त दिसत नसले तरीही त्यांचे अस्तित्व नष्ट झाले असे म्हणता येणार नाही.स्पर्धेच्या युगात उंच उडी घेण्यासाठी तूर्तास वांग्याच्या झाडाच्या काठी ऐवजी त्यांनी मोबाइल टोवेरचा आधार घेतला असावा अशी शंका येते. आताच्या धावपळीच्या जीवनात लहान मुले ही शाळा, क्लास व फावला वेळ असल्यास टीवी मध्ये अडकली आहेत. कशी समजणार त्यांना आपल्या काळातल्या बालपणाच्या खेळाची मजा? असो, अजून काही बालपणीचे विषय घेवून मी लवकरच येईल, तुम्हाल भूतकाळात नेऊन थोडेशे फ्रेश करण्यासाठी. विषय मात्र तुम्ही सुचवायचे बरे का.


सचिन मेंडिस

No comments: