Wednesday, August 6, 2014

'स्नेल डिश' !!

'स्नेल डिश' !! गावातील पावसाळा शेतामधील गोगलगायी शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. जमिनीवर किंवा गोड्या पाण्यात राहणाऱ्या बहुतेक गोगलगायी ह्या तशा संथ चालणाऱ्या अन गरीब जातीच्या प्राणी परंतु उपद्रवी असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. लहानपणी शाळेत 'गोगलगाय बारशाला निघते अन लग्नाला पोहचते' अशा आशयाचा धडा होता. सहज बाजूला गेले तर शरीर आकुंचित करणारी ही बया 'गोगलगाय अन पोटात पाय' म्हणून ओळखली जाते. मागच्या वर्षी फ्रान्स मधील एका निसर्गरम्य गावात पर्यटनासाठी गेलेलो असताना 'स्नेल डिश' खाण्याचा अनुभव आला. युरोपिअन लोक तिखट पदार्थ खाणे टाळत जरी असले तरी 'स्नेल डिश' बर्यापैकी झणझणीत होती. विशेष म्हणजे कवचाच्या आत असलेला मृदू भाग खाण्यासाठी दोन वेगवेगळे चमचे दिलेले होते. एक चमचा गोगलगाय पकडण्यासाठी उपयोगी होता अन एक दोन दाताचा वेगळ्याच प्रकारचा चमचा अलगतपणे तिच्या पोटातून मांसाहारी भाग बाहेर काढण्यासाठी होता. तस पाहिलं तर खेकड्याच्या हातातील (फान्गुडे) मांस काढताना आपल्याला खूप परिश्रम घ्यावे लागतात, प्रसंगी घरातील पाटा-वरवंटा घ्यावा लागतो. पण ह्या चमच्यामुळे तोडफोडीची गरज पडली नाही. आता राहिला चवीचा भाग, काही जणाला गोगलगाय खाणे विचित्र वाटेल, पण चवी बाबतीत गोगलगाय खेकडा अन झिंगा ह्यानाही मागे टाकेल अस मला वाटते. गोगलगाय खात असताना बेडकाच्या मागच्या पायाची आठवण झाली. पूर्वी आपल्याकडे बेडकाच्या पायाचा सूप शक्तिवर्धक समजला जाई पण आता ते दिवस मागे राहिले आहेत. सहज फ्रेंच मित्राशी ह्याविषयी विचारपूस केली असता ते ही बेडकाच्या मागच्या पायाचे चाहते असल्याचे कळाले. वसईत आलेले पोर्तुगीज लोक ही आवड बऱ्याच देशांना देऊन आले तर नाही ना अशी शंका वाटते. सहज जुने फोटो पाहत असताना हा फोटो सापडला अन दोन शब्द लिहावेसे वाटले. टिप: गोगलगायींच्या काही जाती विषारी असतात त्यामुळे आपल्या इथे ह्या गोगलगायींचा खाद्य म्हणून उपयोग करीत नसल्याचे समजते.

'माणूस' बनायचं राहून जाते !!

'माणूस' बनायचं राहून जाते !! गावात असतो तेव्हा मी 'बोळींजकर' असतो. आगाशी, उमराळे अन नंदाखाल करांनी माझ्या गावाविषयी बोलले, तर मी अस्वस्थ होतो, पेटून उठतो, जशास तसे उत्तर देतो !! गावाबाहेर पडतो तेव्हा मी 'कुपारी' बनतो. 'दारू-बिर्याणी पाजली कि कुपारी मत फिरवतो' असे ऐकले कि माझे टाळके फिरते. मी आगाशी, उमराळे अन नंदाखालकर मित्रांसमवेत निषेध व्यक्त करतो, प्रसंगी बोलणाऱ्या ब्राह्मण, आगरी, वाडवळ जातीचा उद्धार करतो !! समाजाबाहेर पडतो अन लोकल गाडीत चढतो तेव्हा मी 'विरारकर' होतो. डाऊन ला येणाऱ्या अन बोरीवली ला चढणाऱ्या प्रवाशाची 'आय-माय' एक करतो. विरारच्या हक्कासाठी लढा देतो, प्रसंगी टोळी बनवून कायदा हातात घेतो !! मी अजून पुढे जातो अन दिल्ली मुंबई विमानात बसतो. पुढे बसलेला अन मराठी पेपर वाचणारा प्रवासी माझे लक्ष वेधतो. भय्या, गुजराती अन मारवाडी प्रवाशापेक्षा तो आपलासा वाटतो. मी 'जय महाराष्ट्र' म्हणून त्यला मंद स्मित देतो !! मी अजून झेप घेतो अन जगाला गवसणी घालतो. गोऱ्या कातडीच्या 'जिनीवा' शहरात तो मला भारतीय वाटतो. माझे देशप्रेम उचंबळून येते अन 'कहा से हो भाई' म्हणत मी विचारपूस करतो. 'मैं कानपूर से, और आप कहा से' म्हणत ग्लासाला ग्लास भिडते. 'सारे जहा से अच्छा हिन्दुस्था हमारा' गीत मनोमनी वाजते !! मी असतो कधी बोळींजकर, कधी कुपारी, तर कधी विरारका छोकरा, बनतो मी मराठी, कधी बनतो मी इंडिअन, का कुणास ठाऊक 'माणूस' बनायचं राहून जाते, 'सारे विश्वची माझे घर' माझ्या पुस्तका पुरता उरते !!

दिमाग कि कमाई !!

दिमाग कि कमाई !! मागच्या आठवड्यात बांद्रा कुर्ला संकुल येथील अमेरिकी दुतावासात विजासाठी मुलाखतीला जाण्याचा योग आला. मुलाखतीसाठी कागदपत्रे अन मोबाईल इतका ऐवज घेवून मी तिथे पोहचलो. अमेरिकी दुतावासात सुरक्षा व्यवस्था कडक असल्याने मोबाईल इमारतीमध्ये नेण्यास मज्जाव होता पण तिथे बाहेर भाड्याने लॉकर मिळतील अशा आशेवर मी घरून सोबत मोबाईल घेऊन गेलो. (आजकाल मोबाईल घरी सोडून मुंबईत जाणे एखाद्या निर्जन बेटावर जाण्यासारखे वाटते). सकाळी ९ वा.ची मुलाखत होती अन मी तिथे ८.३० ला पोहचलो. मुसळधार पाऊस सुरु होता, इमारतीबाहेर उभे राहण्यासाठी काही व्यवस्था नसल्याने छत्री असूनही अर्धे शरीर भिजून गेले होते. बाहेर लॉकरविषयी चौकशी केली पण इथे लॉकर उपलब्ध नाही असे ऐकायला मिळाले. आता मोबाईल ठेवायचा कुठे असा प्रश्न निर्माण झाला. आतमध्ये मुलाखतीसाठी गेलेल्या लोकांचे काही नातेवाईक बाहेर उभे होते त्यांना मोबाईल ठेवण्याची विनंती केली पण त्यांना लागलीच निघायचे असल्याने त्यांनी नकार दिला. मुलाखतीसाठी आत जाण्याची वेळ जवळ येत होती अन मोबाईल ची व्यवस्था होत नव्हती त्यामुळे मनाची घालमेल होत होती. दूर सायकलवर चहा विकणाऱ्या एका फेरीवाल्याकडे माझी नजर गेली, त्याच्याकडे जाऊन मी मोबाईल ठेवण्याची विंनती केली पण त्याने नकार दिला परंतु लांब उभ्या असलेल्या एका मारुती ८०० कारकडे बोट दाखवून तिथे जाऊन विचारायला सांगितले. मी तिथे जाऊन चौकशी केली तर लक्षात आले कि ती कार एक फिरते लॉकर बनवले गेले होते. बाहेर त्याचा एक माणूस लोकांमध्ये फिरून माझ्यासारखे गिर्हाईक आणण्याचे काम करीत होता. प्रत्येकी २०० रुपये घेऊन त्यातील एक मनुष्य एका पिशवीत आपले सामान ठेऊन एका वहीत सामान ठेवणार्याचे नाव व मोबाईल क्रमांक लिहून घेत होता. मी माझा मोबाईल व गाडीची चावी पिशवीत घालून त्याच्याकडे दिली व नाव व मोबाईल क्रमांक त्याला सांगितला. त्याने मला एक टोकन दिले व सामान परत घेतेवेळी ते टोकन परत करावयास सांगितले. त्याच्या त्या छोट्याश्या कारमध्ये सकाळच्या २ तासात सामानाच्या जवळजवळ ५० पिशव्या ठेवलेल्या आढळल्या व अजून अख्खा दिवस मुलाखतीसाठी लोक येणे बाकी होते. मी मनातल्या मनात हिशोब केला कि दिवसाला ह्याच्या गाडीत जर कमीत कमी ५० पिशव्या सामान ठेवण्यासाठी येत असतील तर ५० पिशव्या गुणिले प्रत्येकी २०० रु. प्रमाणे दिवसाची कमाई रुपये १०००० होती तीही गाडी न चालवता. महिन्याचा हिशोब केला तर २६ दिवस गुणिले प्रतिदिन १०००० रुपये म्हणजे जवळपास अडीच लाखाच्या आसपास त्या गाडीची उलाढाल होती. ३ लाखाची मारुती ८०० गाडी महिन्याला कुणाला अडीच लाख कमावून देत असेल ह्यावर कुणाचा विश्वास बसणार नाही, पण ज्याच्याकडे डोके आहे अन जो लोकांच्या गरजेचे रुपांतर आपल्या व्यवसायात करू शकतो त्याला मुंबईत पैसे कमावणे कठीण नाही हे मला त्या अनुभवातून शिकायला मिळाले. माझा हा अनुभव आपल्यालाही काही शिकवून जाईल म्हणून हा प्रपंच. बाकी कुणाची मारुती ८०० गाडी निकालात काढायची असेल तर धंद्याचा विचार करायला हरकत नाही.

मी 'मोठ्या' आनंदाच्या शोधात मरत राहिलो !!

स्टेशन वर उभ्या असलेल्या त्या दोन तरुणांत संवाद चालू होता. मी बाजूलाच उभा असल्याने ऐकायला येत होते. एकाच्या पगारात घसघशीत महिना ५०० रुपयाची वाढ झाली होती. त्या ५०० रुपयाच्या वाढीने त्याच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावत नव्हता, तर दुसऱ्याने नालासोपारा पूर्वेला २०० चौरस फुटाची स्वतःची खोली घेतली होती. ती खोली किती ऐसपैस आहे, अन पाण्याचा सुद्धा कसा जास्त त्रास नाही, हे तो मोठ्या अभिमानाने दुसऱ्याला सांगत होता.

5०० रुपयाच्या पगार वाढीने सुखावणारी अन २०० चौरस फुटाच्या घरात आनंद घेणारी ही माणसे आपल्या सारख्या अनेक लोकांना बरेच काही शिकवून जातात. २००० चौरस फुटाचे बंगले, ऐसपैस अंगण, बटन दाबताच विहिरीतून २४ तास घरात येणारे पाणी अन आपल्याचं लोकांमध्ये जगण्याचं ऐश्वर्य अशा सुखसुविधा असणारी तशी आपण भाग्यवान परंतु 'अतृप्त' अन 'असमाधानी' माणसे, खंर म्हटलं तर स्टेशनवरील त्या दोन तरुणांपेक्षा मानसिक अन भावनिक दृष्ट्या आपण जास्त 'गरीब' म्हणून त्यांच्या बोलण्यातील श्रीमंती आपल्या वाट्याला येत नाही. अशी माणसे भेटतात म्हणून आयुष्यावर बघण्याचा दृष्टीकोन बदलत जातो. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घेणारी अन देणारी ही माणसे म्हणून हेवा वाटावा अशीच !! ते 'छोट्या' दुनियेत आनंद घेत, जगून गेले, मी 'मोठ्या' आनंदाच्या शोधात मरत राहिलो !!