Wednesday, August 6, 2014

'माणूस' बनायचं राहून जाते !!

'माणूस' बनायचं राहून जाते !! गावात असतो तेव्हा मी 'बोळींजकर' असतो. आगाशी, उमराळे अन नंदाखाल करांनी माझ्या गावाविषयी बोलले, तर मी अस्वस्थ होतो, पेटून उठतो, जशास तसे उत्तर देतो !! गावाबाहेर पडतो तेव्हा मी 'कुपारी' बनतो. 'दारू-बिर्याणी पाजली कि कुपारी मत फिरवतो' असे ऐकले कि माझे टाळके फिरते. मी आगाशी, उमराळे अन नंदाखालकर मित्रांसमवेत निषेध व्यक्त करतो, प्रसंगी बोलणाऱ्या ब्राह्मण, आगरी, वाडवळ जातीचा उद्धार करतो !! समाजाबाहेर पडतो अन लोकल गाडीत चढतो तेव्हा मी 'विरारकर' होतो. डाऊन ला येणाऱ्या अन बोरीवली ला चढणाऱ्या प्रवाशाची 'आय-माय' एक करतो. विरारच्या हक्कासाठी लढा देतो, प्रसंगी टोळी बनवून कायदा हातात घेतो !! मी अजून पुढे जातो अन दिल्ली मुंबई विमानात बसतो. पुढे बसलेला अन मराठी पेपर वाचणारा प्रवासी माझे लक्ष वेधतो. भय्या, गुजराती अन मारवाडी प्रवाशापेक्षा तो आपलासा वाटतो. मी 'जय महाराष्ट्र' म्हणून त्यला मंद स्मित देतो !! मी अजून झेप घेतो अन जगाला गवसणी घालतो. गोऱ्या कातडीच्या 'जिनीवा' शहरात तो मला भारतीय वाटतो. माझे देशप्रेम उचंबळून येते अन 'कहा से हो भाई' म्हणत मी विचारपूस करतो. 'मैं कानपूर से, और आप कहा से' म्हणत ग्लासाला ग्लास भिडते. 'सारे जहा से अच्छा हिन्दुस्था हमारा' गीत मनोमनी वाजते !! मी असतो कधी बोळींजकर, कधी कुपारी, तर कधी विरारका छोकरा, बनतो मी मराठी, कधी बनतो मी इंडिअन, का कुणास ठाऊक 'माणूस' बनायचं राहून जाते, 'सारे विश्वची माझे घर' माझ्या पुस्तका पुरता उरते !!

No comments: