Wednesday, August 6, 2014

'स्नेल डिश' !!

'स्नेल डिश' !! गावातील पावसाळा शेतामधील गोगलगायी शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. जमिनीवर किंवा गोड्या पाण्यात राहणाऱ्या बहुतेक गोगलगायी ह्या तशा संथ चालणाऱ्या अन गरीब जातीच्या प्राणी परंतु उपद्रवी असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. लहानपणी शाळेत 'गोगलगाय बारशाला निघते अन लग्नाला पोहचते' अशा आशयाचा धडा होता. सहज बाजूला गेले तर शरीर आकुंचित करणारी ही बया 'गोगलगाय अन पोटात पाय' म्हणून ओळखली जाते. मागच्या वर्षी फ्रान्स मधील एका निसर्गरम्य गावात पर्यटनासाठी गेलेलो असताना 'स्नेल डिश' खाण्याचा अनुभव आला. युरोपिअन लोक तिखट पदार्थ खाणे टाळत जरी असले तरी 'स्नेल डिश' बर्यापैकी झणझणीत होती. विशेष म्हणजे कवचाच्या आत असलेला मृदू भाग खाण्यासाठी दोन वेगवेगळे चमचे दिलेले होते. एक चमचा गोगलगाय पकडण्यासाठी उपयोगी होता अन एक दोन दाताचा वेगळ्याच प्रकारचा चमचा अलगतपणे तिच्या पोटातून मांसाहारी भाग बाहेर काढण्यासाठी होता. तस पाहिलं तर खेकड्याच्या हातातील (फान्गुडे) मांस काढताना आपल्याला खूप परिश्रम घ्यावे लागतात, प्रसंगी घरातील पाटा-वरवंटा घ्यावा लागतो. पण ह्या चमच्यामुळे तोडफोडीची गरज पडली नाही. आता राहिला चवीचा भाग, काही जणाला गोगलगाय खाणे विचित्र वाटेल, पण चवी बाबतीत गोगलगाय खेकडा अन झिंगा ह्यानाही मागे टाकेल अस मला वाटते. गोगलगाय खात असताना बेडकाच्या मागच्या पायाची आठवण झाली. पूर्वी आपल्याकडे बेडकाच्या पायाचा सूप शक्तिवर्धक समजला जाई पण आता ते दिवस मागे राहिले आहेत. सहज फ्रेंच मित्राशी ह्याविषयी विचारपूस केली असता ते ही बेडकाच्या मागच्या पायाचे चाहते असल्याचे कळाले. वसईत आलेले पोर्तुगीज लोक ही आवड बऱ्याच देशांना देऊन आले तर नाही ना अशी शंका वाटते. सहज जुने फोटो पाहत असताना हा फोटो सापडला अन दोन शब्द लिहावेसे वाटले. टिप: गोगलगायींच्या काही जाती विषारी असतात त्यामुळे आपल्या इथे ह्या गोगलगायींचा खाद्य म्हणून उपयोग करीत नसल्याचे समजते.

No comments: