Thursday, August 21, 2014

ग्रेट भेट अन चेकमेट !

ग्रेट भेट अन चेकमेट ! अलीकडेच 'पिके' च्या सेटवर आमिरची भेट झाली. तसा तो २० वर्षापूर्वी रंगीलाच्या शुटींगच्या वेळी वांद्र्याला कोलेजसमोर भेटला होता. त्याने लांबून पाहून हलकेच स्मित केले. मी त्याच्या जवळ गेलो अन हस्तांदोलन केले अन विषय काढला. 'आमीरजी, 'सत्यमेव जयते' खूप आवडलं लोकांना, खूप अपेक्षा आहेत तुमच्या कडून आम्हाला, पण असे व्यवस्थेच्या बाहेर राहून व्यवस्था कशी बदलणार. तुम्ही नेतृत्व घ्या, युवा पिढी तुमच्या पाठीशी उभी राहील. किती प्रश्न आहेत देशापुढे'. आमिर हलकेच हसला अन म्हणाला, 'सचिन, बहोत आसान है, बहोत आसान है, सिम्पल फंडा है, आंख बंद करनेका और दिल पे हाथ रखकर बोलनेका, 'आल एज वेल, आल एज वेल', बस हो गया काम'. त्याच्या ह्या उत्तराने मी निराश झालो अन म्हटलं 'और जब आंख खुलेगी तो दिखाई देगा अपना देश, तुम्हारे पिके के पोस्टर जैसा 'नंगा' ! त्याने रागाने माझ्याकडे पाहिले, तसेच जसा अमिताभ केबीसीच्या सेटवर रागावला होता माझ्यावर. तशी अमिताभशी माझी भेट दुसऱ्यांदा, पहिल्यांदा कॅडबरीच्या जाहिरातीवेळी भेटला होता. तेव्हाच त्याला प्रश्न विचारणार होतो पण त्यांनी माझ्या हातात कॅडबरी दिले अन म्हटले, सचिनजी, कुछ मिठा हो जाये'. मग मी विचार केला उगाच गोड वातावरणात मिठयाचा खडा नको. पण मागे पुन्हा केबीसीच्या सेटवर संधी साधून आली होती. चाहत्यांच्या गरड्यात असूनही त्यांची नजर माझ्याकडे गेली अन त्यांनीच समोरून हाक दिली, 'सचिनजी, आजकल मिलते नही आप, हमसे कोई गुस्ताकी तो नही हुई', मी सरळ विषयालाच हात घातला. मी म्हटले आता लोकांना प्रश्न विचारणे पुरे झाले, आता देशासमोरील प्रश्न सोडवण्याची वेळ आली आहे, लोकांनी तुम्हाला भरभरून दिले आहे, आता तुम्हाला व्यवस्थेला प्रश्न विचारण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, तुमच्या पदाचा, तुमच्या वजनाचा, तुमच्या प्रतिष्ठेचा लोकहितासाठी वापर केला पाहिजे'. त्यांनी माझ्याकडे मिश्किलपणे हास्य केले अन म्हटले, ''सचिनजी, कौन साला उस कीचड में हात दालेगा दोबारा. उफ तुम्हारे ये उसूल, ये आदर्श, इस सारे उसुलो को मिलाके एक वक्त कि रोटी भी नही बन सकती, आज मेरे पास बंगला है, गाडी है, बँक बलेंस है, क्या है तुम्हारे पास?', मी त्यांच्या अशा उत्तराने थोडावेळ चाट पडलो अन उत्तरलो, 'मेरे पास, मेरे पास 'भारतमाता' है, जो आज मदत के लिये पुकार राही है आपको! अमिताभ खजील झाला होता, त्या संवादाने आमच्यात एक अदृश्य 'दीवार' उभी राहिली होती, अगदी तशीच जेव्हा मी दीदीच्या घरून निराश मानाने परतलो होतो. गेल्या महिन्यात कामानिमिताने ऑफिसच्या कारने चर्चगेटला निघालो होतो, पेडर रोड वर अचानक गाडी बंद झाली. मी बाहेर येऊन गाडी नीट होण्याची वाट पाहू लागलो तर अचानक कानावर मंजुळ हाक ऐकू आली, 'सचिन भाऊ, सचिन भाऊ', मी मागे वळून पाहिले तर जवळच्या बिल्डींगच्या खिडकीत साक्षात गानकोकिळा उभी. मला म्हणाली, 'सचिनभाऊ, गाडी ठीक होईपर्यंत चहा घेऊन जा', मी ड्रायवरला सांगून इमारतीकडे वळालो. दीदीच्या घरात पाऊल टाकेपर्यंत चहा तयार झाला होता, घरात मंद आवाजात 'ये मेरे वतन के लोगो' हे दीदीने गायलेले गीत वाजत होते. चहात साखर नव्हती, पण दीदीच्या मंजुळ आवाजाने चहा गोड भासत होता. आता आयतीच संधी आली आहे हे पाहून मी सरळ विषयालाच हात घातला. 'दीदी, आज पर्यंत तुम्ही चित्रपटासाठी गळा वापरला, आता लोकांच्या प्रश्नांसाठी थोडा गळा काढा, खराब रस्ते, अपुरा पाणीपुरवठा, भ्रष्टाचार ह्याबद्दल थोडे बोला, प्रशासन नक्कीच हलेल, तुम्ही 'भारतरत्न' आहात, सरकार नक्कीच दखल घेईल अन जनतेला फायदा होईल,' माझे बोलणे शांतपणे ऐकून दीदी जागेवरून उठल्या अन खिडकीकडे वळल्या. मी सकारात्मक उत्तराची अपेक्षा बाळगून होतो, दीदी थोडा वेळ शांत होत्या अन मग मला म्हणाल्या,' सचिनभाऊ, तुमची कार ठीक झाली आहे, ड्रायवर शोधतोय तुम्हाला, तुम्हाला निघाले पाहिजे,'. मी समजायचे ते समजून गेलो अन जागेवरून उठलो. दरवाजात पोहचल्यावर क्षणभर थांबलो अन दीदीला म्हणालो, दीदी, जमलं तर ते 'ये मेरे वतन के लोगो' गाणे तितके बंद करा, शोभत नाही ते इथे'. दीदीने धाड्कन दरवाजा बंद केला. मला सल्लूने दरवाज्यावर मारलेल्या लाथेची आठवण झाली. वांद्र्याला एका अनाथाश्रमामध्ये जाण्याचा योग आला होता. मिशनरी सिस्टर्स तो अनाथाश्रम चालवीत होत्या. मी मुलांच्या खोलीकडे वळालो तर मुलांच्या घोळक्यात सलमान खेळत होता. मी पाहून न पाहिल्या सारखे केले. तर सलमानने जोरात हाक दिली, 'क्या मेंडीसभाई, कम से कम हात तो मिला'. मी म्हटले 'सल्लू, तू रस्त्यात दारू पिऊन लोकांच्या अंगावरून गाडी नेतोस अन येथे अनाथ मुलांच्या खांद्यावरून हात फिरवतोस, मला नक्की समजत नाही तुझ हे वागण'. सलमान माझ्याकडे पाहून गालात हसला, बहुतेक माझ्या अशा प्रश्नाने त्याला 'किक' लागली असावी. म्हणाला,' मेरे बारे में इतना मत सोचना, दिल में आता हू, समझमे नही', असं बोलून वेडेवाकडे चाळे करू लागला. मी शांतपणे त्याच्या कडे पहिले अन उलट उत्तर दिले, 'देश पे एक एहसान करना, कि देश पे कोई एहसान न करना', माझा हा डायलॉग त्याच्या जिव्हारी लागला, त्याने उद्वेगाने धाड्कन दरवाजावर लाथ मारली जी मला क्षणभर तेंडूलकरने शेन वार्नला हूकचा फटका मारल्यासारखी वाटली. आज तसा संध्याकाळी सचिन भेटणार आहे वानखेडेला, त्यालाही फैलावर घ्यायचं आहे थोडं. मोठ्या आशेने राज्यसभेवर पाठवलं आहे त्याला, सांगतोच त्याला दोन युक्तीच्या गोष्टी, म्हणतो त्याला 'लोकांच्या प्रश्नावर तिथे चौफेर फलंदाजी कर अन त्या गेंड्याच्या कातडीच्या राजकारण्यांची विकेट काढ, मग बघ कसे हिट विकेट होतील ते', उगाच गैरहजर राहून राज्यसभेची जागा कुजवू नकोस ती !!

No comments: