Thursday, August 21, 2014

एक विचार, एक कृती, एक बदल, एक आदर्श !!

एक विचार, एक कृती, एक बदल, एक आदर्श !! मागच्या दशकात आपली आर्थिक भरभराट झाली अन सर्वांची क्रयशक्ती वाढली. पूर्वी वर्षातून होणारी खरेदी २-३ महिन्यात किव्हा वरच्या वर होऊ लागली. नवीन कपडे, शूज, चपला, घड्याळे, मोबाईल व अनेक बाजारपेठेकडून माथी मारलेल्या वस्तू घरात येऊ लागल्या. पण नवीन वस्तू कपाटात पडत असताना त्याच वेगाने घरातील जुनी वस्तू काही बाहेर निघायचे नाव घेत नाही. मग काय, फक्त ढिगारा. कपड्यांचा, चपलांचा, मुलांच्या खेळण्यांचा अन अलीकडेच आणलेल्या पण नवीन वस्तूच्या तुलनेत जुन्या झालेल्या सामानांचा. नवीन फ्रीज घरात आलं तर जुने फ्रीज बाहेर टाकायला आईचा विरोध मग टाक ते वरच्या खोलीत. एखादे शर्ट कोणाला द्यायचे म्हटले तरी ती अलीकडेच घेतल्याची खंत, किती वेळा कपडे वापरले, त्याची किंमत, ब्रांड असा विचार करून मग अशे शर्ट कपाटात एका खाली एक लपत जातात. ना धड ते कुणाला दिले जातात ना धड वापरले जातात. वर्षाकाठी मोबाईल बदलत राहतात, नवीन घड्याळे येत राहतात पण जुना मोबाईल, घड्याळ घरातून बाहेर काढायला मन तयार होत नाही. मग येतो वस्तूंचा महापूर. जिकडे तिकडे ह्या अलीकडे घेतलेल्या अन वापरात नसलेल्या वस्तू साचत राहतात अन घरात जागा कमी पडू लागते. लहान मुलांसाठी आणलेल्या औषधांच्या बाटल्यांची पण तीच कथा. अर्धवट संपलेल्या बाटल्या शोकेस मध्ये किव्हा भिंतीच्या कोनाड्यात महिनोन महिने पहुडलेल्या असतात. पुन्हा कधी लागतील असा विचार करून ठेवलेली हि औषधे एकमेकांत हरवून जातात किव्हा लहान मुलांच्या बाबतीत जास्त हळवेपणा असल्याने आपण सरळ नवीन बाटलीच विकत घेतो अन घरात मेडिकल स्टोर तयार होते. तीच गोष्ट चपलांची. घरात ४-५ माणसे असतील तर प्रत्येकाचे २-3 बूट, चपला, लहान मुलांचे ५-६ जोड अन मग पावसाळ्यासाठी वेगळी पादत्राणे असा हा भला मोठा व्याप एका Stand पाशी जमतो, नवीन पादत्राणे येत राहतात पण जुनी जागची हलत नाही अन चुकून हललीच तर एका पिशवीत बंदिस्त होऊन वरच्या खोलीत भूमिगत होतात. सुरवातीला मला वाटायचं हे फक्त माझ्या बाबतीत घडते अन माझ्याच घरापुरता मर्यादित आहे पण घरोघरी मातीच्याच चुली असे हे चित्र आहे (काही अपवाद असू शकतात). तात्पर्य हेच कि नव्या वस्तूंचे इनकमिंग चालू असताना जुन्या वस्तूंचे आउटगोइंग चालू राहिले पाहिजे अथवा वस्तूंचे इनकमिंग मर्यादित असावे. आपल्या घरातील वापरात नसलेल्या चांगल्या वस्तू एकत्र करून गरीब गरजूंना दान देण्याची कल्पना कशी वाटते? बर्याच स्वयंसेवी संस्था अशा वस्तूंच्या शोधात असतात, जे ते दुर्गम भागात किव्हा गरीब वस्ती मध्ये वाटत असतात. आपल्या घरात पलंगाच्या कपाटात अनेक वर्ष दडून राहिलेले एखादे पांघरून रस्त्यावर झोपणाऱ्या कुणा निराश्रित व्यक्तीच्या कामी आले तर आपल्याला नक्कीच समाधान लाभेल, नाही का?

No comments: