बा-बयशी भेट !!
वसईतील कुपारी समाजाला फार मोठा इतिहास आहे, परंतु दुर्दैवाने तो दृक्श्राव्य स्वरुपात जतन झालेला नाही. आपल्या जुन्या चालीरीती, गाणी, जुने संदर्भ, समाजाला कलाटणी देणाऱ्या घटना ह्या फक्त मौखिक स्वरुपात जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे हस्तांतरित झालेल्या आहेत. मागच्या एक दशकाचा आढावा घेतल्यास इंटरनेट तंत्रज्ञानाने जग जवळ आणले आहे, परंतु त्या स्वरुपात जुन्या पिढीचे नव्या पिढीकडे होणारे ऐतिहासिक संदर्भाचे हस्तांतर कमी झालेले आहे. आपल्या कडे अनेक वडीलधारी मंडळी आहेत, ही मंडळी जो पर्यंत हयात आहेत, तोपर्यंतच जुना इतिहास त्यांच्याबरोबर राहील. पण पुढे काय?. ह्या वडीलधारी मंडळीकडून बरीच माहिती आपण जमवून येणाऱ्या पिढीसाठी लिखित किव्हा ध्वनीमुद्रित स्वरुपात साठवून ठेऊ शकतो. स्वातंत्र्यपूर्व काळातील वातावरण, तेव्हाची शेती, राहणीमान, लग्नसोहळे, दुष्काळ, रोगराई, भुताखेताच्या गोष्टी असा अनेक माहितीचा खजाना आपण त्यांच्याकडून मिळवू शकतो. सदर गोष्टीचा विचार करता सचिन मेंडीस व रॉजर रोड्रिग्ज ह्याने पुढाकार घेऊन आपल्या विविध गावातील 'बय-बाबा' च्या मुलाखती घेण्याचे ठरविले आहे. सदर मुलाखत विडीओ रेकोर्डिंग करून सोशल मिडियाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. ह्या कामी ‘स्वाभिमानी वसईकर संघटना' आर्थिक सहाय्य करणार आहे. दुर्दैवाने ह्या कुपारी समाजातून शेवटचे 'बय-बाबा' जेव्हा हे जग सोडून जाईल, तेव्हा एक मायेच पर्व संपलेलं असेल. अन मग एक न पचवता येणार अस्वस्थ सत्य अन एक प्रचंड पोकळी कधीही न भरून येणारी....!!
स्वाभिमानी वसईकर संघटना प्रायोजित 'बा-बयशी भेट' ह्या कार्यक्रमाचा पहिला भाग अलीकडेच शूट झाला. सकाळच्या रम्य प्रहरी केळीच्या बागांमध्ये बयच्या बरोबर गप्पा रंगल्या अन जुन्या अनुभवातून मन श्रीमंत होत गेले. कार्यक्रमाचा सूत्रसंचालक ह्या नात्याने बयला बोलते करणे, हे आयोजाकापुढे एक आव्हान होते, पण बयची उमेद अन बोलण्यातील सहजता कार्यक्रमाला एक वेगळ्या उंचीवर घेऊन गेली. 'मी शिकली असती तर एक शिक्षिका बनून आज पेन्शन घेत असती', हे त्या नव्वदीतल्या बयचे उद्गार थक्क करणारे. बोळींज-जापके येथील 'अनीबाई लोपीस' ह्या 'बा-बयशी भेट'च्या पहिल्या भागाच्या पाहुण्या. लवकरच येत आहे 'बा-बयशी भेट'चा पहिला विडीयो आपल्या भेटीला, आपल जीवन अन अनुभव समृद्ध करण्यासाठी. आपल्या गावातील बाबा किव्हा बयला येणाऱ्या कार्यक्रमात सामील करावयाचे असल्यास कृपया आमच्याशी संपर्क करावा.
स्वाभिमानी वसईकर संघटना |
No comments:
Post a Comment