चित्रकार 'अर्नेस्ट रोड्रिग्ज' ह्यांच्या चित्रावर सुचलेले काव्य...कवितेला जिवंतपणा येण्यासाठी प्रमाण भाषेऐवजी बोली भाषेतील काही शब्द वापरले आहेत..
"किती सुंदर दिसते, सजलेले अस्सल चुलीपुढ
काय ऐट होती त्याची, न उलगडलेले एक गुढ …
फुंकर मारते बघ बय, होई ज्वालाचा नवा जन्म
येईल शेतातुनी धनी, त्याच्या ताटासाठी अन्न …
शेंगा वालाच्या पसरल्या त्या सारवलेल्या धरणी
काळ्या वांग्या संगे येईल, भाजीला चव अमृतावाणी …
कशा टांगल्या उंच वरती, कांदयाच्या माळी बांबूवरी
जशा चांदण्या चमकती, राती शांत नभामधी…
बघ 'उन्हाचा तिरा' डोकावती, उघडया खिडकीतुनी आत
बय, मिळेल का जेवावया, विचारतो देऊनी पोटी हात …
मोरली पहुडली धरणी, वाट पाहते काळ्या वांग्याची
पाप करते कापण्याचे, पण तोंडी नाही लागत भाजी …
तपेली कलंडूनी खाली, शांत ओतती पोटातली पेज
भातासंगे भाजी वालाची, उतावीळ झाले जेवावया हात …
पाणेरी ती लाकडी , पितळी हंड्याचा पाठी भार
तहानलेल्या जीवा देई, ती पाणी अखंड गार-गार …
सारवलेल्या चुलीपुढे, जडला-घडला कुपारी जीव
वेल-फर्निश किचनमध्ये, कुठे मिळेल आज 'सुलीपुड'?..
No comments:
Post a Comment