Tuesday, August 27, 2013

सेलेब्रिटी व्यक्तीचे सामाजिक उत्तरदायीत्व !!

सेलेब्रिटी व्यक्तीचे सामाजिक उत्तरदायीत्व !!



भारतासारख्या खंडप्राय देशात चित्रपट कलाकार आणि क्रिकेटपटू हे देवासमान पूजले जातात. चाहत्यांचे प्रचंड प्रेम लाभल्याने दीर्घकाळ त्यांच्या नांवा भोवती एक वलय लागून राहते हे आपण पाहिलेलेच आहे. ऐन उमेदीच्या काळात अशा सेलेब्रिटीचा वापर बाजारपेठेकडून व्यवस्थित केला जातो अन देवसमान चित्रपट कलाकार आणि क्रिकेटपटू ह्यांनी केलेल्या जाहिरातीच्या जोरावर बड्या कंपनीचा माल हि सहज खपला जातो अन सेलेब्रिटीसुद्धा मालामाल होतात.



प्रस्तुत लिखाणाचा उददेश हा कि, ज्या जनतेच्या प्रेमाने हि सेलेब्रिटी मंडळी करोडपती होतात त्या मंडळीचे काहीच सामाजिक उत्तरदायीत्व नाही का? अशा मंडळीनी नागरी समस्येबद्दल कधी जाहीर विधाने केल्याचे आठवत नाही, अपवाद फक्त नाना पाटेकर सारख्या कलाकारांचा आणि शीतपेयाची जाहिरात नाकारणाऱ्या गोपीचंदचा.



माझ्या सारख्या तरुणाला नेहमी वाटते कि देवत्व प्राप्त झालेल्या सेलेब्रिटी व्यक्तीनी जर जाहिरपणे सामाजिक अव्य्वस्थे बद्दल मते मांडली तर त्यांचे विधान फार मोठी बातमी ठरू शकेल व त्याचा उपयोग प्रशासन गतिमान होऊन तो प्रश्न मार्गी लागण्यात होऊ शकेल. आपल्या वयक्तिक कारणासाठी मागे लता मंगेशकर ह्यांनी पेडर रोड पुलाबाबत भाष्य केले होते त्याची सरकारला दखल घ्यावी लागली होती, परंतु गानकोकिळेने मुंबई च्या रस्त्या बाबत किवा रहदारीच्या समस्येबाबत कधी भाष्य केल्याचे आठवत नाही. तसे ते केले असते तर त्याचा फायदा नक्कीच मुंबईकराना म्हणजेच त्याच्या चाहत्यांना झाला असता. अजूनही वेळ गेलेली नाही.



सचिन तेंडूलकर, अमिताभ बच्चन सारखे महान व्यक्ती आयुष्यातला एक दिवस खर्ची करून दुष्काळाने होरपळलेल्या जनतेच्या भावना जाणण्यासाठी विढर्भ-मराठवाड्यात जाऊ शकत नाही का? नक्कीच जाऊ शकतील.फक्त आपल्यावर प्रचंड प्रेम करणाऱ्या चाहत्याची म्हणजेच सामान्य माणसांची त्यांची नाळ जुळलेली असावी. अशा मंडळीच्या दुष्काळी प्रदेशातील भेट एक मोठी बातमी ठरेल. ब्रेकिंग न्यूज साठी हपापलेला मिडिया त्याची टेप दिवसभर दाखवून त्यावर चर्चा घडवून आणील अन मला खात्री आहे कि सरकारला त्याची योग्य ती दखल घेऊन युद्धपातळीवर मदत करावी लागेल.



काही महिन्यापूर्वी मुंबईमध्ये प्रसिद्ध चित्रपट निर्माते यश चोप्रा ह्यांचा डेंगू मुळे मृत्यू झाला होता. तसे सरकारी इस्पितळात डेंगू मुळे सामान्य लोकांचे मृत्यू होणे काही नवीन गोष्ट नाही, पण यश चोप्रा सारख्या प्रसिद्ध व वलयांकित व्यक्तीच्या डेंगू मुळे झालेल्या मृत्यूची बातमी झाली अन महापालिका प्रशासन कामाला लागून मुंबई मध्ये मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करावी लागली.



सांगायचा मुद्दा हा कि सामान्य माणसाच्या दुखाची बातमी होत नाही तर ती होते फक्त सेलेब्रिटीच्या. जर सेलेब्रिटी मंडळीनी सामन्याचे दुख आपले मानुन त्यावर मतप्रदर्शन केले तर नक्कीच प्रशासकीय कामात गुणात्मक फरक पडू शकेल. प्रसंगी जनतेच्या हितासाठी पक्षीय राजकारण करावे लागले तरी हरकत नाही.



सचिन मेंडीस, वसई

No comments: