Saturday, March 1, 2014

'ख्रिस्ती व्यक्ती मराठी असू शकत नाही'?

मेंडीस अन मराठी, कस शक्य आहे?' ऑफिसमधील कुलकर्णीनी प्रश्न केला.



'म्हणजे काय, जसा तू मराठी तसा मी मराठी, जसा तू महाराष्ट्रीयन तसा मी महाराष्ट्रीयन', मी उत्तर दिले.



'नाही रे पण तू ख्रिस्ती ना, मग महाराष्ट्रीयन कसा?' कुलकर्णीनी प्रतीप्रश्न केला.मला या उत्तराचा राग आला, पण मी अतिशय शांतपणे कुलकर्णीला उत्तर दिले, 'मित्रा, धर्म अन भाषा-संस्कृती ह्या भिन्न गोष्टी आहेत', आम्ही येशूने दिलेल्या शिकवणुकीने व बायबल च्या वचनाप्रमाणे आमची धार्मिक उपासना करतो अन तुम्ही हिंदू धर्मानुसार उपासना करता, यात मराठी भाषा-संस्कृतीचा प्रश्न आलाच कुठे?'



माझ्या उत्तराने कुलकर्णी महाशयांच समाधान झालं नाही, त्यांनी पुन्हा तोच हेका ठेवला, 'ख्रिस्ती व्यक्ती मराठी असू शकत नाही', आता तर हा माझ्या मराठी असण्याच्या  अस्तित्वाचा एकप्रकारे पुरावाच मागत होता. एक तर मी वसईकर, त्यातल्या त्यात मराठी शब्दांशी खेळणारा अन थोडं फार सामाजिक-राजकीय चळवळीत उठबस करणारा, थोडीच हार मानणार होतो. मी कुलकर्णीला चढ्या आवाजात म्हटले, '५ मिनिटे दे, तुला मी पटवून देतो कि तुझ्यापेक्षा कांकणभर जास्त मी मराठी आहे म्हणून'. तो थोडा खट्याळपणे हसला अन उत्तरला 'ठीक आहे, पटवून दे'.



मी कुलकर्णीला विचारले, 'कोणत्या माध्यमात शाळा शिकला रे?', 'इंग्रजी मिडीयम, कुलकर्णी उत्तरला, 'मी मराठी माध्यमातून शिकलोय, अन ती हि ख्रिस्ती मिशनर्यांनी सुरु केलेली'.



'काय पण फेकतो तू मेंडीस, तुझ इंग्रजी तर उत्तम आहे'. कुलकर्णी उत्तरला.



माझा पुढचा प्रश्न मी कुलकर्णीकडे फेकला, 'वेडात मराठे वीर दौडले सात', ह्या कडव्याची पाश्वभूमी माहित आहे का?, 'नाही, रे' कुलकर्णी उत्तरला. 'मला माहित आहे, बहलोलखानवर पुन्हा स्वारी करून वीरमरण आलेल्या शिवाजीमहाराजांच्या सात योद्धांवर ते स्फुर्तीगीत आहे, त्यावर  कडवे आहे ते'..



माझा पुढचा प्रश्न मी कुलकर्णीकडे फेकला, 'कुलकर्णी, मराठीभाषा दिन कोणता रे?' 'नाही माहित रे' कुलकर्णी उत्तरला. मी कपाळावर हात मारला, म्हटलं ह्याच आठवड्यात येतोय, शोध तूच'.



माझा पुढचा प्रश्न मी कुलकर्णीकडे फेकला, 'वपुर्झा पुस्तक वाचलंय का?', वाचलं जरी नसलं तरी लेखक कोण ते तरी सांग?. 'नाही माहित रे' कुलकर्णीने पुन्हा ठेवणीतलं उत्तर दिलं. ' व पु काळे नाव ऐकलंय का?, 'ऐकल्यासारख वाटते, कुलकर्णी बोलला'. 'नक्कीच नसेल, तुला 'चेतन भगत' माहित आहे पण दुर्दैवाने 'व पु काळे' माहित नाही.



'चल सांग मला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात किती हुतात्मे झाले?', मी अजून एक कठीण प्रश्न त्याला विचारला तर त्याच्या उत्तराने मी गार झालो, 'मेंडीस, संयुक्त महाराष्ट्र म्हणजे काय?'. 'अरे मराठी माणसा, संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी विविध वेळी झालेल्या आंदोलनांत एकूण १०६ जन हुतात्मे झाले, विसरलास का ते?'.



ते जाउ दे आत्ता,  मला सांग तुला 'ऋतू' माहित आहेत का?' पुन्हा त्याची नकारघंटा ऐकू आली. ''मित्रा, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शऱद, आणि हेमंत असे सहा ऋतू विसरलास ना?'



चल एक सोपा प्रश्न अन तोही फिल्मी 'सांग मला, अजय-अतुल ह्या प्रसिद्ध संगीतकार जोडीच आडनाव काय? पुन्हा त्याची नकारघंटा ऐकू आली. मी म्हटलं 'गोगावले'.



कुलकर्णी थंड झाला होता. मी म्हटलं 'कुलकर्णी, माझ्या आडनावावरून जाउ नको, माझ्या आडनावात जरी मराठी दिसत नसलं तरी माझ्या रक्तात अन श्वासात मराठी आहे, मीच काय वसईचा रोड्रिग्ज, लोपीस, डिसोझा, गोन्साल्वीस अन परेरा तुमच्या सामंत, सावंत, रानडे अन गोखलेसारखेच मराठी आहेत. माझ्या भूमीने 'फादर फ्रान्सीस दिब्रिटो' सारखे महान साहित्यिक ह्या महाराष्ट्राला दिलेले आहेत, पुन्हा कधी मला किव्हा वसईच्या कुणाही ख्रिस्ती व्यक्तीला असा प्रश्न विचारू नकोस, उगाच पुन्हा तुला तूच मराठी न उरल्याची जाणीव होईल'.



कुलकर्णी वसईच पाणी समजून चुकला होता. मी विषय थांबवला अन म्हटलं 'चल कुलकर्णी आता, चहा थंड झाला, आजच्या विषय बंद,  'जय महाराष्ट्र!.

1 comment:

Anonymous said...

Sir,

Thanks for this interesting article. I'm sure its a common question faced by many of our Vasai people. I too have faced similar situation in Mumbai, but could not give such impeccable answers, due to lack of knowledge.

Kudos to you!