Tuesday, June 10, 2014

विहीर

'जो बात विहीर में थी वो स्विमिंग पूल में कहा'? शाळेत असताना वार्षिक परीक्षा संपल्या कि पहिली धाव घ्यावयास वाटे ती गावतल्या विहिरीवर. एक तर एप्रिलचा महिना. अंगाची लाहीलाही वर इतके दिवस इच्छा नसताना अभ्यास करण्यासाठी घरात डांबून घ्याव लागे ते वेगळंच. शाळेतून घरी आल्यावर घाईघाईत जेवण करून धाव मारायची ती विहिरीकडे. पाण्याचा अंदाज घेऊन वरून मस्त विहिरीत उडी मारून शरीर मनोसोक्त डुंबवून घेतलं कि मन प्रस्सन होत असे. आमच्या गावातील विहीर प्रचंड मोठी. 'वाळूवर' नावाच्या वाडीत चिंचा अन आंब्याच्या सावलीत उठून दिसणारी. अतिशय चांगल्या प्रतीच्या दगडाने स्वातंत्र्यपूर्व काळात बांधली असल्याने तीच रूप अन रुबाब अवर्णनीय असंच होत. दुपार झाली कि गावातली संपूर्ण बच्चे कंपनी 'वाळूवर' खेळायला जात असत. विहिरीवर मनोसोक्त अंघोळ करणे, नवीन शिकाऊ मुलांना केळीच्या खोडाने किव्हा प्लास्टिक ड्रम वापरून पोहायला शिकवणे तसेच नवशिक्याला बुडवून त्याची टर खेचणे हे नित्याचे उद्योग. कधी कधी बुडी मारून तळातली माती काढण्याची पैज लागे अन 'दम' असलेल्या मुलाची दमदार कामगिरी रोमांचित होऊन पाहायला मिळे. काहीजण विहिरीला ५-६ प्रदक्षिणा घालून आपली ताकद आजमावून पाहत असत जे खरचं प्रेरणादायी वाटायचं. बर्याच वेळेला विहिरीत असलेले साप (नानेटी अन दिवाड) पोहण्याची मजा हिरावून घेत असत. पोहताना चुकून हे साप बाजूला येवून चुंबन घेतील अशी भीती वाटत राहायची. विहिरीतील पकडापकडीचा खेळ खूपच कठीण. त्यातल्या त्यात पाण्याखाली दम धरणाऱ्या मुलांना पकडणे फारच जिकीरीचे. पण हा खेळ खेळताना कस लागायचा अन व्यायाम हि मस्त व्हायचा. मे महिन्याच्या शेवटी जेव्हा पाणी खाली जायचे तेव्हा विहिरीच्या पायथ्याशी असणार्या झऱ्यामधून येणाऱ्या पाण्याची चव किती गोड अन तहान भागवणारी. जसं जसा पावसाला जवळ यायचा तसा विहिरीत झावळ्या टाकल्या जायचा जेणेकरून त्या भिजवून नंतर त्या वळण्यासाठी तयार व्हायच्या अन मग विहीर पोहण्यासाठी कमी पडायची. आज तुरळक प्रमाणात अशा पोहण्यायोग्य विहिरी मागे राहिल्या आहेत. ज्या आहेत त्याची सुद्धा डागडुजी न झाल्याने त्या धोकादायक बनल्या आहेत. वेळ काळ बदलली तशी विहिरीची जागा क्लोरीनयुक्त स्विमिंग पुलाने घेतली पण 'जो बात विहीर में थी वो स्विमिंग पूल में कहा'? आठवणीच्या विहिरीत, मन रमते आज फार ! पुन्हा फिरुनी घ्यावी डुबकी, अंग भिजवावे गारगार !

No comments: