Wednesday, July 16, 2014

उठा अन उभे राहा, नवीन स्पर्धा जिंकण्यासाठी !!

आयुष्य हि एक स्पर्धा आहे. ह्या स्पर्धेत प्रत्येकाला यशस्वी व्हावेसे वाटते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला संघर्ष करावा लागतो. काही वेळेला ठरवलेले उद्दिष्ट समोर असूनही काही गोष्टी चुकतात अन पदरी अपयश येते. मन निराश होते, एकटेपणा वाटतो, हरल्याची-मागे पडल्याची भावना निर्माण होते. आपल्याबरोबर जे होते ते आपल्या पुढे गेले हे पाहून नैराश्य येते, उगाचच आपण दुसऱ्याशी तुलना करीत आपले प्रयत्न सोडून देतो. प्रसंगी टोकाचा निर्णय घेतो. हे प्रत्येकाच्या बाबतीत घडते, त्याला कुणी अपवाद नाही, फक्त यशाची परिमाणे अने व्याख्या व्यक्तिपरत्वे बदलतात किव्हा वेगवेगळ्या असतात. काही वेळेला आपण अपयशातून उठण्याचा प्रयत्न करतो, जवळच्या माणसाचा आधार मागतो. काही वेळेला जवळचे उठायला मदत करतात तर काही वेळेला आपण पडल्याचाच आनंद आपल्याच लोकांना होतो. अपयश हि यशाची पहिली पायरी समजली जाते. यशाचा मार्ग अपयशातून जातो फक्त पुन्हा उठून यशाच्या प्राप्तीसाठी धावण्याची मानसिकता तयार झाली पाहिजे. आज आपल्या समोर उभे असलेले अनेक यशस्वी व्यक्ती ह्या अनुभवातून गेलेले आहेत. त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत म्हणून ते यशस्वी झाले. आपण ही पराभवावर मात करून यशस्वी होऊ शकतो, फक्त जिद्द अन चिकाटी हवी. काल सकाळी माझा ट्रेन मधील मित्र जोएल डाबरे ह्याने मला हा प्रेरणादायी विडीओ दाखवला अन क्षणभर डोळ्यात पाणी उभे राहिले. शरीर साथ न देताही धाव पूर्ण करण्याच्या दुर्दम्य शक्तीने धावणारा धावपटू जितका प्रेरणादायी आहे तितकाच त्याच्या पाठीवर मायेचा हाथ ठेवणारा अन त्याला धावायला मदत देणारा 'तो' मनुष्य ही तितकाच मार्गदर्शक आहे. आपण जर अपयशाचा सामना करीत असाल तर त्या धावपटूला नजरेसमोर ठेवा अन जर आपण सुशेगात असाल तर उठून प्रयत्न करणार्यांचे मार्गदर्शक बना. या विडीओ मधील धावपटूला धावायला मदत देणारा 'तो' मनुष्य खूपच महत्वाचा आहे. कळत नकळत आपण अडचणीत असलेल्या व्यक्तीपासून नामनिराळे राहतो, माहित नसल्यासारखे करतो तर प्रसंगी अडचणीत सापडलेल्या व्यक्तीच्या वेदनेतून असुरी आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो. हि मानसिकता आपल्या सोडावी लागेल. आपण जर खाली पडले असाल तर उठा अन उभे राहा, नवीन स्पर्धा जिंकण्यासाठी !! अन जिंकले असाल तर पुढे या, इतरांना जिंकायला मदत करण्यासाठी !! http://www.youtube.com/watch?v=kZlXWp6vFdE

No comments: