Thursday, January 22, 2015

जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी !!

जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी !!
----------------------------------------------
सचिन मेंडिस

आपल्या समाजात घात होऊन एखाद्या व्यक्तीचे जेव्हा अकाली निधन होते तेव्हा सगळा समाज शोकसागरात बुडून जातो. त्यात जर मृत झालेली व्यक्ती तरुण असेल किव्हा कुटुंबातील एकटी कमावती व्यक्ती असेल, तर फार हळहळ व्यक्त केली जाते. अशा व्यक्तीच्या अंत्ययात्रेला हजारोने लोक जमा होऊन त्या कुटुंबाना धीर देण्याचा प्रयत्न करतात अन सहानभूती व्यक्त करतात. जर ते दुर्दैवी कुटुंब अन त्यांचे नातेवाईक सधन असतील तर त्या कुटुंबाचे पुढे हाल होत नाहीत, परंतु जर त्या दुर्दैवी कुटुंबाची परिस्थिती बेताची असेल तर त्यांचे पुढील आयुष्य अंधकारमय होते. मग एक समाज म्हणून अशा अभागी कुटुंबाकरिता व्यक्त केलेली एक दिवसाची सहानभूती बेगडी ठरते. आपली हळहळ अन ढाळलेले अश्रू काळाच्या ओघात सुकून जातात. अशी दुर्दैवी कुटुंबे लोकाच्या लाजेखातर मदतीसाठी हात पुढे करीत नाहीत अन अनेकदा त्या कुटुंबातील मुलांची शिक्षणे पूर्ण होत नाहीत. पुढे अशी कुटुंबे आर्थिक चक्रव्युहात अशी सापडली जातात कि अनेक पिढ्या त्या शापातून वर येत नाहीत. समाज म्हणून आपणही आपल्या व्यापात इतके व्यस्त अन धावत असतो, की अशा दुर्दैवी कुटुंबाचे प्राक्तन आपल्या कानापर्यंत पोहचत नाही. मागच्या वर्षी अशाच एक कुटुंबाचा अनुभव मी इथे कथन केला होता. पैशाअभावी कॉलेज सोडण्याच्या तयारीत असलेल्या एका अनाथ मुलीची व्यथा मी SVS कडे मांडली होती. सुदैवाने आपल्या सर्वांनी मदतीचा हात देऊन त्या कुटुंबाला आधार दिला अन त्या मुलीचे शिक्षण पूर्ण करण्यात आपल्याला यश आले.

ह्या विषयाच्या अनुषंगाने मला इथे एक उदारहण द्यायला आवडेल. काही वर्षापूर्वी मी एका मोठ्या फार्मा कंपनीत नोकरीला होता. दुर्दैवाने आमच्या डिविजनमधील एका कनिष्ट स्थरावरील तरुण सहकाऱ्याचा हार्ट फेल झाल्याने मृत्यू ओढवला. दुसऱ्या दिवशी आमच्या डिविजनमधील वरिष्ठ अधिकाऱ्या सोबत मला त्या मृत सहकाऱ्याच्या घरी जाण्याचा योग आला. एका छोट्याशा खोलीत विधवा आई, अशिक्षित पत्नी अन २ लहान मुले असा त्यांचा संसार होता. आमच्या डिविजनमधील सर्वांनी त्या अभागी कुटुंबियांची भेट घेऊन शोक व्यक्त केला अन काही वेळाने आम्ही त्यांच्या खोलीच्या बाहेर पडलो. त्या अभागी कुटुंबियांची परिस्थिती पाहून मी अस्वस्थ झालो होतो. एक दिवसाच्या सहानभूतीपलीकडे त्या अनाथ मुलांची गरज होती, जी पूर्ण होणे गरजेचे होते. मी आमच्या डिविजनच्या हेडला विचारले 'पुढे काय', आपली जबाबदारी संपली का? आपण ह्यांना वाऱ्यावर सोडायचे काय? एक सहकारी म्हणून आपल्याला कोरड्या सहानभूतीपलीकडे त्यांच्यासाठी काहीतरी करावे लागेल, आपण एक दिवसाचा पगार तरी त्यांना द्यायला हवा'. मी सगळ एका दमात त्यांच्यासमोर बोलून टाकलं. मग आमच्या डिविजनच्या हेडने पुढाकार घेऊन HR मार्फत त्या कुटुंबासाठी एक दिवसाचा पगार स्वेच्छेने देण्याचे आवाहन केले अन सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला. २-३ वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांनी तर पूर्ण महिन्याचा पगार दिल्याचे मला कळाले. एक महिन्या नंतर जमा झालेल्या मदतीचा आकडा ऐकून मी अचंबित झालो. सुमारे ३२ लाख रुपये मदत गोळा झाली होती. आमच्या कंपनीने तो निधी एकदाच त्या कुटुंबाकडे न देता HR कडे ठेऊन घेतला अन त्या मृत व्यक्तीचा महिन्याचा पगार त्या कुटुंबाकडे पोहचण्याची व्यवस्था केली. त्याचप्रमाणे मुलांच्या शाळेची फी परस्पर शाळेत भरण्याची जबाबदारी HR Manager कडे सोपवली. एका छोट्या पुढाकाराने एक कुटुंब आर्थिक विवंचनेच्या शापातून बाहेर पडलं होत. मला मिळालेले समाधान तर अनमोल होते, जे आजही कित्येक वर्षांनी मी अनुभवत आहे.

आज समाज म्हणून आपण फुलं न फुलाची पाकळी एकटी कमावती व्यक्ती मृत पावलेल्या कुटुंबाना मदत केली, तर ज्या मृत व्यक्तीच्या अकाली निधनाने आपण जी हळहळ व्यक्त केली असेल, तर त्यांना आपली ती खरी श्रद्धांजली ठरेल. ही मदत फक्त आर्थिक असावी असे नाही. कुटुंबातील कुणाला आपण नोकरीसाठी/व्यवसायासाठी जरी मदत केली तरीही खूप फरक पडू शकतो. फक्त त्यासाठी आपल्याला आपल्या गाव परिसराचा कानोसा घ्यावा लागेल. व्यक्तीच्या अकाली निधनानंतर अंत्यदर्शनासाठी होणारी गर्दी जेव्हा त्या अभागी कुटुंबाच्या मदतीसाठी तितक्याच गर्दीने पुढे येईल, तेव्हा आपल्या अश्रुची खरी फुले झालेली असतील. आपला समाज भावनिक आहे. अभागी अन दुर्दैवी कुटुंबियांच्या मदतीकरिता तो नेहमीच तयार असतो. गरज आहे ती आपल्या सर्वांच्या पुढाकाराची. मदतीचे हात दुर्दैवी कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी.

(विमा टर्म पॉलिसीबाबतीत आपल्या समाजात पाहिजे तितकी जागरूकता आलेली नाही, कुटुंबातील कमावत्या व्यक्तींनी अशी टर्म पॉलिसी घेतल्यास समाजाच्या पुढे न येणारे बरेच प्रश्न सुटू शकतील, असे मला वाटते.)

सचिन मेंडिस

No comments: