आपल्या समाजात उच्चशिक्षण घेतलेल्या मुलीचे प्रमाण वाढत चालले आहे, त्यामानाने उच्चशिक्षण घेणारे तरुण जास्त नाही. तरुणाच्या संघटनेत काम करीत असल्याने व अनेक तरुणांशी चांगला संपर्क असल्याने अनेक तरुण उच्चशिक्षित मुलीचे पालक त्यांच्या मुलीसाठी उच्चशिक्षित तरुणाचे नाव सुचवण्यास सांगतात अन किमान पात्रता म्हणून किमान मुली इतका शिकलेला, रुबाबदार, उंचीने तिच्यापेक्षा जास्त अन चांगल्या घरातील असल्याची अपेक्षा करतात व त्याच प्रमाणे विशिष्ट parish मधील असावा अशी भौगोलिक मर्यादा घालतात. पालकांनी आपल्या मुलीसाठी अशी अपेक्षा करावी ह्यात त्यांचा काही दोष नाही, कारण आपली मुली चांगल्या मुलाच्या हातात जावी, हि सर्व मात्यापित्याची अपेक्षा असते व ती रास्त आहे.
प्रश्न असा आहे कि उच्चशिक्षित मुलीच्या आपल्या जोडीदार विषयी असलेल्या निकषात बसणाऱ्या तरुणाची संख्या कमी असताना त्यांनी आपल्या निकषाबाबतीत थोडी तडजोड करावी का? म्हणजे शिक्षणाने थोडा कमी किव्हा रूप रंग अन मुलाच्या कौटुंबिक निकषाबाबतीत थोडी तडजोड करावी?. अन अशा तडजोडी करून विवाह झाल्यावर अन काही वर्षांनी नैसर्गिकरित्या संसारात साचलेपणा आल्यावर वेगळे प्रश्न उभे करतील काय?
खर म्हटलं तर मागील काही महिन्यात मी एकही पालकांना त्यांनी सांगितलेल्या निकषात बसणारा तरुण सुचवू शकलो नाही, हे मलाच चिंताजनक वाटते. मुलीनी आपल्या अनुरूप जोडीदाराकरिता अन मानसिक गरजा भागवनारा अनुरूप जोडीदार मिळण्यासाठी प्रसंगी भौगोलिक व जात-धर्म ह्या मर्यादेच्या बाहेर जावून विचार करावा. आंतरजातीय विवाहाच्या नावाने आपल्या इथे कितीही बोटे मोडली जात असली तरी एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यासाठी अन मानसिक घुसमट टाळण्यासाठी समाजाच्या बाहेर पडण्याचा धाडशी निर्णय घेण्याची वेळ आली आहे का? माझे विचार प्रसंगी धाडशी अन समाजविरोधी वाटू शकतात परंतु वैचारिक पातळीवर हि चर्चा होणे गरजेचे आहे असे मला वाटते. आपल्याला काय वाटते?
No comments:
Post a Comment