Wednesday, January 7, 2015

आमची माती !!



आमची माती !!

---------------------- सचिन  मेंडिस 

मातीवर लिहावं असं का वाटल ते सांगता येणार नाही, पण 'माती' नव्या लेखासाठी सुपीक विषय ठरेल अशी खात्री होती. शेतीबाबतीत मी अज्ञानी असल्याने त्या दृष्टीने मातीवर लिहिण्यास मला मर्यादा आहेत पण 'माती' ह्या विषयावर दोन पान ललित अगदी आपुलकीने लिहिता येईल हे नक्की.

अगदी बालपणापासून ह्या मातीशी आपल नांत जुळलेलं आहे. लहानपणी शेणाने सारवलेल्या ओट्यापासून ते मातीने फुललेल्या अंगणापर्यंत मातीशी आपली गट्टी आहे. कित्येक वेळा खेळता खेळता मातीचे - घास सहज तोंडात टाकायला आपण मागे पुढे पाहिले नाही. तेव्हा माती तोंडात घातली तरी कुणी ओरडत नव्हते. आता चुकून लहान मुलाने तोंडात माती घातली तर नव्या पिढीची मम्मी त्याला दरडावून 'डर्टी बॉय' म्हणत डोळे वटारते. कसं समजवायचं तिला कि ज्याचे मातीशी नाते तुटते त्याचे आईशी नाते तुटायला वेळ लागत नाही.

त्या काळी बहुतेकांची पोटे शेतीवर अवलंबून असल्याने मातीत घाम गाळल्याशिवाय घरात चूल पेटत नसे. त्यामुळे प्रत्येक घरात मातीला मान होता. शेती श्रेष्ठ अन नोकरी कनिष्ट समजत असलेला आपला समाज शिक्षणाने बदलला अन नोकरी समोर शेती मागे पडली अन त्यामुळे मातीत राबणारे हात पुढे पेनाबरोबर राबणारे   आताच्या आधुनिक काळात हायटेक होऊन मातीपासून दुरावले. (सध्या महापालिकेने ठिकठिकाणी खोदकाम करून आपल्याला मातीसंगे प्रवास करण्याची आगळी संधी दिली आहे, असे म्हणता येईल).

शाळेत जीवशास्त्र हा विषय होता, जो आपला जीव काढत असे. त्यात मातीचे अनेक प्रकार दिले होते. पण गावात विहीर खोदताना चुकून लागलेल्या 'चिकणमाती' शिवाय मला दुसऱ्या मातीत गोडी नव्हती. तेव्हा दूरदर्शनवर मराठी चित्रपट दाखवण्याअगोदर 'आमची माती आमची माणस' हा कार्यक्रम दाखवला जाई, जो नाईलाजाने पाहावा लागे. आज त्या मातीला सोन्याचा भाव आला अन दुर्दैवाने आमची आमची म्हणावी अशी माणस परकी ठरली. त्यात मातीचा दोष तो काय. अडाणी पूर्वजांनी छातीची माती करून जमीन ठेवली अन सुशिक्षित नवीन पिढीने ती जागेला लावली. कधी कधी वाटते ह्या काळ्या आईला सातबाराच्या उताऱ्यावर आणून आपण फार मोठे पाप केले आहे. ना ती स्वतंत्र आहे ना आपले जीव शांत.

'काळ्या मातीत मातीत, तिफण चालती' हे माझे आवडते मराठी गाणं. हे गीत ऐकताना मन इतके मातीत विरघळून जाते कि आठवणीच्या पुस्तकात लपून ठेवलेली शेतातील नांगरणी डोळ्यासमोर धावते. मातीचा गंध हा तर लिहिण्यासाठी स्वतंत्र विषय ठरू शकेल. पहिल्या पावसातील मातीचा सुगंध श्वासावाटे हृदयात घेतल्याशिवाय खरा पावसाळा मनात डोकावताच नाही. इतका तो मातीचा सुगंध हवाहवासा, घरात असूनही ओलाचिंब करणारा.

मातीचा खरा महिमा कळून येतो तो एखाद्याच्या अंतयात्रेवेळी. 'माती असशी मातीस मिळशी, मनुजा आठव तू येशी' हे गीत जेव्हा कानावर पडते तेव्हा क्षणभर सुन्न व्हायला होते. आपण मातीपासून बनलेलो असून एक दिवस ह्या मातीत विलीन होणार आहोत हि भावना क्षणात प्रत्येकाला भौतिक जगातून जागी करते. स्पर्धेच्या युगात मागे पाहता धावत असताना एक दिवस पुढे जाऊन  माती व्हावे लागणार आहे, हे सत्य पचवायला किती कठीणशेवटी तेच अंतिम  सत्य. पायाखाली सतत मातीला तुडवत ऐटीत चालणाऱ्या मानवासाठी संत कबीरांनी फार सुंदर लिहून ठेवलं आहे, ते लिहितात,

माटी कँहे कुंभारसे। तु क्या रोंदे मोहे।।
एक दिन ऐसा आयेगा। मै रौंदूंगी तोहे।।

आजच्या काळात 'मातीशी बेईमानी' वाढत असताना असे वाटते कि ते दिवस दूर नाहीत, जेव्हा काळी आई आपल्याला जाब विचारायला मागे पुढे पाहणार नाही. ती जेव्हा जाब विचारते तेव्हा दुर्दैवाने एखादा माळीण गाव तिच्या पोटात गेलेला असतो, कायमचा. फक्त आपल्याला त्यातून काही तरी शिकायला हवं.

उब हाताला मातीची अन सुगंध श्वासाला मातीचा  !
ओळख देहाला मातीची अन निरोप अखेर ह्या मातीचा  !

No comments: