तो आक्रोश मात्र थांबायला हवा !!
------------------------------ ती काकुळतीला येऊन त्याची वाट पाहत होती. बहुतेक पाहुणेमंडळी घराकडे परतू लागली होती. तिची २ चिमणी लेकरे झोपेने कासावीस झाली होती. डिसेंबरचा महिना असल्याने हवेत गारवा वाढला होता अन त्यामुळे ती निरागस मुले थंडीने गारठू लागली होती. दोष तिचा नव्हता कि त्या बालकांचा, पण पप्पा आल्याशिवाय घरी जाणे त्यांना शक्य नव्हते. तसा तो चांगला माणूस. कोणाच्या अध्यात नाही. आपण भले अन आपले काम भले. पण लग्नाचा सिझन सुरु झाला कि त्याला आवरणे कठीण व्हायचे. घड्याळात ११ वाजले होते, डीजेचा कर्णकर्कश आवाज तिला जास्तच अस्वस्थ करीत होता. आज लग्नाला आलीच नसती तर किती चांगले झाले असते, असा विचार तिच्या मनात आला. तिने ओळखीच्या एका मुलाला हाक मारली अन विचारले, 'ह्यांच्या पप्पाला पहिले का'? 'अंकल काउंटवर घेत आहेत', त्या मुलाने तिला सांगतिले. 'प्लीज, त्यांना निरोप दे कि पोरांना झोप आली आहे, अन थंडी पण जास्त आहे, पटकन जेऊन घरी चल'. तो मुलगा मांडवातील कोपरयात गेला अन लागलीच परत आला. 'अंकलने सांगितलंय कि १५ मिनिटात जेऊन येतो, थोडी वाट पाहायला सांगितली आहे'. नवऱ्याची वाट पाहण्याशिवाय तिच्याकडे तसा दुसरा पर्याय नव्हता. तशी कुणाला विनंती करून घरी पोहचवण्याची व्यवस्था तिला करता आली असती, पण त्याला असे मागे सोडून निघणे, तिचे मन तयार होत नव्हते. अर्धा तास होऊन गेला तसा तिचा संयमाचा बांध सुटला. ती पुन्हा अंगणातल्या मांडवातून मुलांना घेऊन जेवणाच्या मंडपाकडे गेली. मंडपातील दृश्य पाहून तिचे काळीज फाटून निघाले. दारूच्या पूर्ण नशेत तो हातात प्लेट घेऊन खुर्चीवर एका बाजूने पडलेला होता. हातातील जेवणाची प्लेट अर्धी खाली कलंडली होती अन त्याचे शर्ट प्लेटमधील रस्स्याने खराब झाले होते. थंडीने गारठलेली तिची मुले आपल्या पप्पांना पाहून रडू लागली होती. नीट नेटक्या कपड्यात त्यांना गाडीवरून लग्नाला घेऊन आलेला लाडका पप्पा आता स्वतः उठण्याच्या स्थितीत नव्हता. काउंटवर अजून काही मंडळी वाढेपर्यंत दारू रिचवत होती. डीजेच्या मोठ्या आवाजात त्या लहान मुलांचा आवाज दाबून गेला होता. एक निरागस संसार एका आनंदी लग्न उत्सवात आपले प्राक्तन घेऊन आक्रोश करीत होता. तिचा हवाहवासा साथीदार त्या परिस्थितीत तिला नकोसा वाटू लागला होता. ती मनातल्या मनात देवाला दोष देत होती, तिच्या कर्माला कोसत होती. बाजूचा दगड उचलून काउंटवरवरील बाटलीवर मारावा अशी तीव्र इच्छा तिला झाली होती परंतु त्याला उठवून व्यवस्थित घरी नेणे ही तिची तेव्हाची गरज होती. तिने मुलांना खाली उतरवले अन त्याच्या हातून प्लेट घेतली. बाजूच्या दोघांना घेऊन त्याचे हात तोंड धुवून घेतले अन एकाला विनंती करून घरी जाण्यासाठी कारची व्यवस्था केली. घरी पोहोचल्यावर तिने त्याला व्यवस्थित खोलीत नेले अन बिछान्यावर झोपवले. तिच्या घरात आजूबाजूचे लोक जमा झाले होते. भेदरलेली मुले अजून जागी होती. तिची आयुष्यभराची झोप आजच्या दिवसाने उडाली होती. कधीतरी थोडी घेणाऱ्या तिच्या जोडीदाराला ह्या लगानच्या सिझनने 'दारुडा' केले होते. रात्रभर तिच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता, डोळे सतत वाहत होते. जो नवरा तिला कार्यक्रमाला हौशेने घेऊन जात होता, त्याला लग्नघरून उचलून आणण्याची दुर्दैवी परिस्थिती आज तिच्यावर आली होती. ती मनोमन विचार करत होती, हे बदलायला हवे, हे कुणीतरी बदलायलाच हवे. ------------------------------ (ह्या ललित लेखाचा शेवट कसा व्हावा हे मला कळत नाही, पण हे चित्र बदलले पाहिजे हे नक्की. काउंटवर खुली दारू वाढनारयाला दोष द्यायचा, की फुकट मिळते म्हणून आपल्या बायका-पोरांची काळजी न करता शेवटपर्यंत काउंटवर पीत बसणाऱ्याला दोष द्यायचा की एकूणच मद्य वाढून उत्सव साजरा करणाऱ्या आपल्या सोहळा संकृतीला दोष द्यायचा. प्रत्येक शनिवारी लग्नात वाजणाऱ्या डीजेच्या आवाजात कुणान कुणा निष्पाप संसाराचा टाहो असा विरून गेलेला असतो. तो आक्रोश मात्र थांबायला हवा.) |
Thursday, January 1, 2015
तो आक्रोश मात्र थांबायला हवा !!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment