Thursday, January 1, 2015

सेलेब्रेशनमधील दुखः !!


सेलेब्रेशनमधील दुखः !!
-------------------------------------- सचिन मेंडीस

ख्रिसमस अन नववर्षाची रात्र म्हणजे आपल्याकडे जल्लोष अन उत्साहाची वेळ. चर्चला जाण्याची तयारी, नवीन कपडे अन रात्रीच्या पार्टीची तयारी. कुणी कुटुंबाबरोबर तर कुणी गावातील मित्रमंडळी बरोबर ही रात्र साजरी करण्याचे बेत आखलेले असतात. वेगवेगळ्या खाद्याच्या डिशेश, उंची मद्य अन डीजे संगीत अशा वातावरणात बरीच मंडळी ख्रिसमस अन नववर्षाची रात्र साजरी करतात. काही मंडळी तर अगोदरच गोवा सारख्या पर्यटनस्थळी जाऊन एका वेगळ्या वातावरणात आयुष्याचे वेगळे क्षण अनुभवतात. पण कधी व्यक्तीच्या आयुष्यात असे क्षण येतात की ख्रिसमस अन नववर्षाची रात्र कल्पना नसलेल्या वास्तूत अन अतिशय वेगळ्या मूडमध्ये व्यतीत करावी लागते. जिथे नसतो जल्लोष, जिथे नसतो आनंद, असती ती अकल्पित, नको असलेली भयाण शांतता.

चार वर्षाअगोदर साधारण ख्रिसमसच्या ३-४ दिवस अगोदर आईला ब्रेन हेमरेज झाल्याने तिला लीलावती रुग्णालयात आयसीयू मध्ये दाखल केले होते. तिला रुग्णालयात दाखल करताना तिचा श्वास सोडून तिच्या शरीराची काहीही हालचाल होत नव्हती. आईची प्रकृती चिंताजनक असल्याने पहिले दोन दिवस आमच्या कुटुंबाना अतिशय भीतीच्या छायेत काढावे लागले. माणूस कितीही सामर्थ्यवान असला तरी अशा वेळी त्याच्या मर्यादा उघड्या पडतात. अशा परिस्थितीत मानवी मन इतके दुबळे बनते की डॉक्टरांच्या प्रयत्नाबरोबर आपल्या सृष्टीच्या निर्मात्याकडे मदतीसाठी याचना करावी लागते. अशा कठीण परिस्थितीत प्रार्थना बळ देते, हरलेल्या जीवाला आशेचा आधार देते. सुदैवाने दुसरया दिवशी आईने शरीराची थोडी हालचाल करावयास सुरुवात केली अन आम्हा थकलेल्या जीवाला थोडा दिलासा मिळाला. आई कोमामधून बाहेर आलेली असली तरीही अजून काही दिवस आईला आयसीयू मध्ये ओब्जरवेशन खाली ठेवावे लागणार होते.

लीलावती रुग्णालयात रात्री वस्तीला फक्त एक व्यक्तीला राहण्याची परवानगी असल्याने मी, माझे वडील अन भाऊ आळीपाळीने तिथे रात्रीला वस्तीला थांबत असू. योगायोगाने मला ख्रिसमस अन नववर्षाच्या दोन्ही रात्री लीलावती रुग्णालयात वस्तीला थांबावे लागले. आयुष्यात ह्या पूर्वी ख्रिसमस अन नववर्षाच्या रात्री ह्या वेगळ्या जल्लोषाच्या अन आनंदाच्या वातावरणात जगायला मिळाल्या होत्या. पण त्या वर्षी लीलावती रुग्णालयात काढलेल्या त्या रात्री खूप वेगळ्या, भयाण, एकाकी अन बऱ्याच काही गोष्टी शिकवून गेल्या. आयुष्य दुसरया नजरेने पाहण्याचा अन जगण्याचा अनुभव त्या रात्री देऊन गेल्या. वांद्रे सारख्या उच्चभ्रू अन ख्रिस्ती परिसरात लीलावती रुग्णालय असल्याने दोन्ही रात्री आजूबाजूला मोठा जल्लोष होता. आकाशात फटक्याची रोषणाई चालू होती. सेलेब्रेशन मूड मध्ये आजूबाजूच्या परिसराला आनंदाचे उधाण आले होते. रोषणाईने फुललेल्या त्या मुंबईत एका बंदिस्त आयसीयूच्या शेजारी मी अन माझ्यासारखे अनेक जीव आपल्या प्रिय व्यक्तीच्या जीवन मरणाचे क्षण अनुभवत होतो. त्या क्षणी माझा नाताळ माझ्या आईचा सुरु असलेला श्वास होता. आईची हालचाल नव्या वर्षाचे अनमोल सुख होते. आई जिवंत असलेल्याची, ती आपल्यात असल्याची भावना कोणत्याही जल्लोषापेक्षा आम्हाला मोठी होती. आईचा श्वास, आईची हालचाल हेच आमचे त्या रात्रीचे सेलेब्रेशन होते. दुखःच्या त्या दोन रात्री जणू मला सेलेब्रेशनचा वेगळा अर्थ समजावून सांगत होत्या. भौतिक गोष्टीत सुख शोधणारा मी त्यावेळी आईच्या जिवंत असण्यात सुख अनुभवत होतो.

देवाच्या कृपेने आई १५ दिवसानंतर बरी होऊन घरी आली. आज ती तिचा दुसरा जन्म जगत आहे. त्या २ रात्रीच्या अनुभवानंतर मी ख्रिसमस अन थर्टी फस्ट नाईटला वेगवेगळ्या खाद्याच्या डिशेश, उंची मद्य अन डीजे संगीत ह्या मध्ये सेलेब्रेशन शोधत नाही. आपल्या जिवाभावाची माणसे सुखी समाधानी व आपल्यात असल्याची भावना मला ह्या दिवशी वेगळा आनंद देऊन जाते. ह्या दोन दिवशी मला आजूबाजूच्या परिसरातील परिस्थितीने हरलेल्या जीवांची आठवण येते. ते आज जगत असलेल्या स्थितीत मी माझा घालवलेला भूतकाळ जिवंत करतो अन त्यांच्याशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. मग अशा जल्लोषाच्या रात्री दूर कुठेतरी कोमात गेलेल्या आपल्या सानुल्या जीवाच्या शेजारी प्रार्थना करीत असलेल्या कुणा अनोळखी अभागी आईशी कनेक्ट व्हावेसे वाटते, परदेशात मृत्यू पावलेल्या आपल्या उमद्या लेकराच्या शवाची वाट पाहत असलेल्या दुर्दैवी पालकांसाठी प्रार्थना करावीशी वाटते. अशा करुण परिस्थितीत आजूबाजूच्या जल्लोषात त्यांना काय वाटत असेल, हे स्वता: अनुभवल्याने बाहेच्या जल्लोषापेक्षा त्यांच्या आतल्या दुखः त एकरूप व्हावेसे वाटते. सुखात सामील करून घेण्यासाठी आपल्याला आमंत्रण द्यावे अन स्वीकारावे लागते, दुखःचे तसे नसते. त्यासाठी आपल्याला त्यांच्याशी कनेक्ट व्हावे लागते, त्यांच्यात विरघळावे लागते.

आज थर्टी फस्टच्या रात्री जग सेलेब्रेशन मूड मध्ये असताना, आपल्या आजूबाजूला, हाकेच्या अंतरावर, एका अंधाऱ्या खोलीत आपल्यातीलच कुणी शोक करीत असल्याने हे लिहावेसे वाटले. नाहीतर सरलेल्या दुखःची आठवण काढायला कुणाला आवडते.

No comments: