लालबुंद बदाम !!
पाऊस अन बदाम ह्याचं जवळच नांत. पावसाळ्याच्या हंगामात बदामाचे झाड बहरून निघते. आमच्या अंगणात बदाम कधी रुजला ते ठाऊक नाही, परंतु पावसाळ्यात तो असा फुलून येतो की मन प्रसन्न होते. रोज सकाळी अंगणात झाडाखाली लालबुंद बदामाचा सडा पडलेला दिसून येतो, पण एखादे बदाम उचलून तोंडात टाकण्याची उर्मी अन वय दोघेही मागे पडलंय. आज सहजंच अंगणातल्या खडीवर पडलेल्या लालबुंद बदमाकडे लक्ष गेलं. मनात विचार आला, किती वर्ष त्याला असं टाळता येईल? ओटीवरून खाली उतरलो. अलगदपणे त्या बदामाला जमिनीवरून उचलून घेतलं. तेच बदाम जे मिळवण्यासाठी २५ वर्षा अगोदर कसरत करावी लागत असे. उजव्या हाताच्या नखाने बदामावर एक चीर करून मोठाला पापुद्रा बाहेर काढला. लालबुंद रसाने आतला भाग सजून आला होता. बदामाला नाकाजवळ नेले अन डोळे बंद करून चीर केलेल्या भागाजवळ दीर्घ श्वास घेतला. संपूर्ण शरीरात बदामी गंध दरवळला. एका हलक्या गंधाने सरळ माझ्या प्राथमिक शाळेतल्या वर्गात पोहचलो.
बोळींज वरून गोलप्यातल्या शेतातून पायपीट करून घोसाळी गावातील बदामे वेचत असल्याचा काळ जागा झाला अन बदामाच्या रसाने शर्टचा रंगलेला लाल खिसा डोळ्यासमोर आला. किती सुंदर होते ते दिवस. अगदी गोड अन मधुर, बदामाच्या आतल्या पांढऱ्या गोळ्यासारखे. घोसाळी गावात एका बावखालाच्या कडेला मोठे बदामचे झाड होते अन त्याच्या खाली म्हशीचा भलामोठा गोठा होता. साहजिकच काही बदामे शेणाच्या संपत्तीमधून उचलावी लागत असतं. बदामे उचलताना मन मागेपुढे होई, परंतु शेणाच्या दुर्गंधीवर बदामाचा हवाहवासा सुगंध मात करीत असे. त्या वेळेला वर्गात ५० पैशात ५ बदामे विकणाऱ्या मुलाचं मला भारी आकर्षण अन कुतुहूल वाटत असे. आमच्या जुन्या घराचा दरवाजा एखाद्या किल्य्याच्या दारासारखा होता. बदामाची साल खाऊन झाल्या नंतर उरलेली आठी आम्ही दाराच्या फटीत अलगद ठेवून दरवाजा बंद करून फोडत असू. अन मग फुटलेल्या आठीमधून भुगा झालेल्या बदामच्या पांढरया गोळ्याचा शोध घेऊन त्याचा मनमुराद आस्वाद होत असे.
आज स्वतच्या अंगणात बदामाचा सडा दुर्लक्षित पडलेला पाहून बदललेल्या काळाचे नवल वाटते. बदामाचा आकार, रंग, सुगंध सगळ काही तसंच आहे, फक्त वेळ-काळ बदलली आहे. काळ बदलला कि माणसाच्या गरजा अन मन ही किती बदलते. तसं पाहिलं तर आज ज्या गोष्टीसाठी आपल्या जीवाचा आटापिटा चालला आहे, त्या गोष्टी अन गरजाही भविष्याच्या पोटात कधी अदृश्य होतील ह्याचा नेम नाही. तूर्तास बदाम हुंगण्याचा मोह सोडवत नाही.
सचिन मेंडिस

No comments:
Post a Comment