हलकेच खिडकी उघडली. आभाळ भरून आलं होत. थेंब थेंब पावसाच्या सरी धरतीकडे झेपावू पाहत होत्या. हवाहवासा मातीचा गंध पुन्हा खुणावू लागला होता. निवडणुकीचा क्षीण मागे टाकून मन पुन्हा टवटवीत अन प्रसन्न झाले होते. केळीच्या पानावर थबकलेले पावसाचे थेंब अल्लडपणे खुणावत होते. तिथे दूर झाडावर बसलेला कावळा आपले पंख फडफडवत अंगावरील पाणी उडवत होता. किती सुंदर दिसत होते त्याच्या अंगावरून उडणारे पाण्याचे तुषार, अवर्णनीय. अन केळीच्या पानावर चढलेली हिरवी चादर, किती मोहक अन सुंदर. मोबाईल मध्ये फोटो साठवण्याचा मोह आवरत नाही. काय जादू आहे नव्या पावसाची? एक अनामिक सुख, निसर्गाच्या वेगळ्या रूपाचं. हवाहवासा गारवा. क्षणभर खिडकीतून हात बाहेर काढून निसर्गाला ओंजळीत घ्यावे असे मनोमन वाटत आहे. अन आंब्याच्या झाडावर मागे राहिलेल्या त्या कैऱ्या, सहज एखादी हाती आली तर? 'कोलूम' असेल का घरात? घराबाहेर पाणी अन तोंडाला सुटलेले पाणी. पाऊसराजा, कैरीची फोड खाता खाता, लिखाणाला पुन्हा सूर गवसू दे, चिंब पावसात नवे शब्द सापडू दे !
No comments:
Post a Comment