'बांडी' भाजायची म्हटलं कि तोंडाला पाणी सुटते. मातीच्या मडक्यात भाजलेल्या पदार्थाची चवच न्यारी. कोवळ्या वालाच्या शेंगा, मसाला भरलेली बटाटे, गावठी कोंबड्यांची अंडी, चिकन किंव्हा डुकराचे मटन अशा स्वादिष्ट पदार्थाने बनलेली 'बांडी' खाणे हे तर खंर भाग्याचं.
काल आमच्या मामाकडे 'गेट टुगेदर' होते. मामाच्या सर्व मुली व माझी आई आम्ही सर्वजण कुटुंबासकट जमलो होतो अन जेवणासाठी बेत होता फक्त 'बांडीचा'. बच्चेकंपनी मिळून आम्ही २४ जण होतो अन एकूण ५ बांड्या. आमच्या ८८ वर्षीय आजीसह आम्ही वेगळ्या पद्धतीने 'बांडी' पार्टी एन्जोय केली. लहान मुले ह्या प्रकाराबद्दल अनभिद्न्य होते पण भाजलेल्या पदार्थावर ते अक्षरशः तुटून पडले. भाजलेली बांडी उघडताना त्यातून येणारी वाफ अन भाजलेल्या स्वादिष्ट पदार्थाचा सुगंध तर अवर्णनीयचं.
बांडी भाजण्यासाठी मातीची भांडे जमवण्यापासून ते जाळण्यासाठी लागणारी लाकडे, झावळ्या अन इतर पालापाचोळा जमा करणे हे एक कसरतीचे काम, परंतु मेहनतीतून मिळणाऱ्या फळाची चवच इतकी भन्नाट कि मेहनतीची तक्रार कुणालाच नाही. एक मात्र खंर, बांडी गरजेपेक्षा जास्त भाजून आतील पदार्थाचा कोळसा होवू नये म्हणून अनुभवी माणसाकडून वेळोवेळी बांडीवर पाणी शिंपडून आतील पदार्थाचा अंदाज घेतला जातो. ते काम आमच्या तात्यांनी परफेक्ट केले.
बांडी ह्या कल्पनेचा जनक कोण ते माहित नाही, पण साल्याने काय सॉलिड डिश दिली आहे आपल्या समाजाला. सलाम बांडीच्या प्रणेत्याला अन त्याचा आनंद घेणाऱ्या कुपारी जिभेला!
सचिन मेंडीस
No comments:
Post a Comment