एक लडका और एक लडकी कभी दोस्त नही हो सकते?
वरील वाक्य आपण बरयाच वेळा ऐकले असेल किंबहुना आपल्या ग्रुपमध्ये ह्या विषयावर अनेकदा चर्चा सुद्धा केली असेल. बदलत्या काळात जेव्हा हातातील मोबाईलद्वारे आपण क्षणात एखाद्या भिन्नलिंगी व्यक्तीशी संपर्क करू शकतो तेव्हा अशा विषयावर मोकळी चर्चा जरुरी वाटते. आपण एका मोठ्या समाजाचे भाग आहोत अन इच्छा असूनही भिन्नलिंगी व्यक्ती मधील निखळ नात्याचे स्वागत करायचे पुरोगामित्व आपल्याकडे नाही, ज्याला समाजाची पुर्व्ग्रहित मानसिकता तसेच कामधंदा नसलेल्या टवाळखोर मंडळीची निंदानालस्ती तितकीच कारणीभूत आहे. काही वेळेला इच्छा असूनही अशी मैत्री सामाजिक संकेतांत बसत नसल्याने आवश्यक मोकळेपणा दिसत नाही. अलीकडेच इंटरनेट वर ह्या विषयावर एक ब्लॉग वाचण्यात आला ज्याचा एक भाग खाली देत आहे जो ह्याविषयावर सविस्तर प्रकाश टाकू शकेल.
--------------------------------------------------------
"पुरूषाची मैत्रीण म्हटलं की आपल्याकडे थोडं सावरून बसायची पद्धत आहे. शंभर एक वर्षांपूर्वी 'मैत्रीण' हार्ट अॅटॅक देत असेल. आता फक्त सावरून बसण्यापर्यंत आलो आहोत हे एक चांगलंच. शिवाय आज विशीतली बरीच (सगळी नव्हे) मुलं-मुली मैत्री, आकर्षण, लैंगिकता याबाबतीत पुष्कळच 'सुलझे हुए' आहेत, अधिक थेटपणे या गोष्टींना सामोरं जात आहेत असंही मला वाटतं. किमान आजच्या अभिव्यक्तीतून, चित्रपट-नाटक, फेसबुक अशा माध्यमातून जे चित्र समोर येतंय ते तरी असं आहे. आणि ते आश्वासकही आहे. आज छत्तीस पूर्ण केलेला मी 'आमच्या वेळच्या' गोष्टी आठवतो तेव्हा मला आंतरिक पातळीवर फारसा फरक दिसत नाही, पण अभिव्यक्ती, आकलन - विशेषतः आजच्या मैत्रिणींचं मुलं आणि त्यांचं 'टेस्टॉस्टेरॉन प्रेरित' वागणं याचं आकलन - याबाबतीत मात्र फरक दिसतो.
'व्हेन हॅरी मेट सॅली' या चित्रपटातलं 'स्त्री आणि पुरूष मित्र होऊ शकत नाहीत' हे एक गाजलेलं वाक्य/विचार. ('मैने प्यार किया'मध्ये पुढे ते आपण रीतसर वापरलं.) एखादं सार्वकालिक सत्य किंवा सत्यांश असावा असं वाटायला लावणारा हा विचार पुढे पुष्कळच चर्चिला गेला. हे सार्वकालिक सत्य आहे का याबाबतीत मी ठाम नसलो तरी हॅरीचं पुढचं म्हणणं मला पटतं. सॅली त्याला 'का' असं विचारते तेव्हा तो म्हणतो की 'द सेक्स पार्ट ऑल्वेज गेट्स इन द वे'. मला ते पटतं कारण 'सेक्स पार्ट'चा अर्थ कायम लैंगिक भूक असा असत नाही. तीही असू शकते पण स्त्री आणि पुरूषामधलं 'सेक्शुअल टेंशन' अतिसूक्ष्म, अगदी सूक्ष्मातिसूक्ष्म स्वरूपात का होईना जागं असतं. दोन मित्रात किंवा दोन मैत्रीणीत (ते समलिंगी नसतील तर) ते असत नाही. 'दृष्टी' चित्रपटात हा विचार 'स्त्री और पुरूष के बीच हमेशा एक उत्तेजना रहती है' अशा, आशयाच्या अधिक जवळ जाणाऱ्या समर्पक शब्दांत येतो. या उत्तेजनेला एक आदिम परिमाण, योग्य-अयोग्यच्या पलीकडे असा एक विस्तृत अर्थ आहे. स्त्री-पुरूष मैत्रीमधलं ते एक परिमाण आहेच असं मला वाटतं. अर्थात हे सगळं मान्य करूनही दोघांमधल्या निखळ मैत्रीची, ती मैत्री वर्षानुवर्षे टिकल्याची उदाहरणे सापडतील. ऑन-ऑफ होणारा 'लिंगभाव' गृहीत धरून मैत्रभाव चांगला आकार घेऊ शकतोच."
--------------------------------------------------------------------
मोकळी चर्चा होईल असा हा विषय नाही, परंतु नव्या विचाराच्या सुशिक्षित पिढीचे मत जाणून घ्यायला नक्की आवडेल.
No comments:
Post a Comment