शिमनी !
चिमणी ह्या छोट्या पाखराबद्दल मला प्रचंड सहानभुती आहे. हा इवलासा जीव बालपणापासून माझ्या आठवणीच्या आभाळात उडत आलेला आहे. 'मुगले मुगले नास लो' ह्या बालगीतात 'शिम्न्यो रांडो पलाल्यो' असा तिचा उल्लेख आहे. त्या गाण्यापासून चिमणीला मी व आपण सगळेच ओळखत आलेलो आहात. चिमणी सारख्या निरागस जीवाला 'रांडेची' उपमा का दिली हे मोठे कोडेच आहे अन मला नेहमीच ते खटकते. ह्या एकतर्फी आरोपाबद्दल मी गाणं लिहिणाऱ्या कवीचा मनोमन धिक्कार करतो व जाहीरपणे त्याला चिमणीच्या व्यभिचाराचे पुरावे सादर करण्याचे आव्हान करतो.
लहानपणी आपले घर भरून चिवचिवनाऱ्या ह्या चिमण्या काळाच्या ओघात आज आपल्यापासून दूर गेल्या आहेत. का असेल बरे? जुन्या कौलारू घरात आपली घरटी बनवणारी अन आपल्या ताटातील जेवण जेवणारी हि पाखरे कुठे हरवली असतील? लहानपणी एखाद्या चिमणीच घरट जपण्यासाठी घरातील मंडळी किती काळजी घेत असू. किती जवळचे होतो आपण त्यांना. कौलारू घरांत त्यांना आपलेपणा वाटायचा बहुतेक. त्या घरांना, त्यातील आतील माणसांच्या स्वभावाला त्यांचे निरागस जिने अन काड्यांचे घरटे शोभत असे.
कधी शंका येते मला, त्यांनी आपल्यावर बहिष्कार टाकल्याची. नव्या चकचकीत बंगल्यातून आपण त्यांना हाकलून दिल्या पासून त्या येत नाहीत आपल्या गावात. बहुतेक त्यांचे घरटे आपल्या मार्बलच्या घरांत 'कचरा' म्हणून टोचू लागल्या पासून त्या निघून गेल्या आहेत दूर मायेच्या माणसांमध्ये राहायला. आपण हि सोडून दिलंय त्यांना साद घालण्याचे. आता आपण 'चिऊताई'च्या नावाने लेकरांना घास भरवत नाही, त्यासाठी आपण 'क्रिश' किव्हा 'छोटा भीम' आणलाय घरांत. तसेच आधुनिक जगातील मोबाइल विद्युत लहरींनी मोडून टाकलंय त्यांच्या इवल्याश्या जगण्याला. माणसांशी संवाद साधणाऱ्या ह्या कृत्रिम मोबाइलनी चिवचिवनाऱ्या जीवाशी असलेला संवाद तोडून टाकलंय आपला.
कधी शांतपणे ओटीवर बसून जुने अंगण आठवू लागलो कि चिमण्यांचे गीत कानी गुजु घालते. पण त्या गीतात मिळणाऱ्या स्वर्गीय आनंदाची जागा आज अपराधीपणाने घेतली आहे. गुन्हेगार आहे मी तिचा अन माझे लोक. हुसकावून टाकलंय आम्ही तिला आमच्या गावातून अन आमच्या आठवणीतून. 'या चिमण्यानो, परत फिरा रे' अशी साद घालण्याची शरम वाटते मला.जमलं तर या तुम्ही चिमण्यानो, आमच्या आठवणीच्या गावात, छोटीशी काडी दातात घेऊन. देईल तुम्हाला मी हक्काची जागा घरटे बांधण्यासाठी माझ्या आठवणीच्या गावात, बदल्यात हवी आहे मला तुमची जीवाकाळजाची चिवचिव, पुन्हा नाते जोडण्यासाठी!
सचिन मेंडीस
No comments:
Post a Comment