Tuesday, June 22, 2010

वसई समताला आमची प्रतिक्रिया


दि. २२ जून २०१०

प्रती संपादक,
वसई समता,

सस्नेह वंदे!

आपल्या आजच्या (दि. २२ जून २०१०) अंकामधील 'स्वाभिमानी वसईकर संघटनेची कहाणी' ह्या विशेष लेखाला प्रतिक्रिया म्हणून हे पत्र पाठवीत आहे. संघटनेचे हितचिंतक व समतोल पत्रकार म्हणून आम्ही आपल्या सकारात्मक टिकेवाजा समिक्षनाचे स्वागत करितो. तुमच्या लेखातील काही विचारांचे समर्थन करीत असतानाच काही मुद्द्याला उत्तर देणे संघटनेचा जबाबदार पदाधिकारी म्हणून मी अगत्याचे समजतो. मुळात संघटना म्हणून आम्ही पाळण्यात असलो तरीही संघटनेचे बहुतेक पदाधिकारी वसईतील विविध सामाजिक-राजकीय पक्षात व चळवळीचा अनुभव घेवून वर आलेले आहेत त्यामुळे फक्त कामकरी न बनता निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्या इतके नेतृत्व पुढे नेणे किंबहुना कोणत्या तरी पदाचा दावा करणे ह्यात गैर काहीच नाही. कोणताही राजकीय-सामाजिक अनुभव नसलेले परंतु राजकीय वारसा असलेले अनेक तरुण आज देशात व महाराष्ट्रात नेतृत्व करताना आढळत आहेत. आपली वसई हि त्याला अपवाद नाही. त्यामुळे संघटनेच्या तरुणांनी काही दावे करणे किवा मागण्या करणे हा देशातील प्राप्त राजकीय परिस्थितीचा भाग आहे. आणि अशा गोष्टीमुळे जन आंदोलनाचे नुकसान नसून त्यामुळे दीर्घ काळ तरुण वर्गाना सामाजिक-राजकीय प्रक्रियेत कार्यरत ठेवणे जन आंदोलनाला सोपे जाणार आहे. समान उधिष्टासाठी एकत्र आले भिन्न घटक म्हणजे जन आंदोलन हे वास्तव खरे आहे परंतु प्रत्येक घटक पक्षांना आपापल्या कार्यकर्त्यांना वेळोवेळी उर्जा देवून आपापला पक्ष किवा संघटना वाढवणे काळाची गरज आहे. घटक पक्षाची होणारी दृश्य-अदृश्य व अंतर्गत स्पर्धात्मक वाढ जन आंदोलन समितीच्या निकोप वाढीसाठी क्रमप्राप्त आहे. जर घटक पक्षाचे, त्यांच्या नेतृत्वाचे अस्तित्व राहिले व वाढले तरच जन आंदोलन समितीची उत्तम वाढ होणार आहे. माझ्या ह्या विचारावर मतभेद व वादविवाद होवू शकतात.
वसईतील माफिया शक्तीला आवर घालण्यासाठी सर्व राजकीय विरोधकांना आपल्या दबावाद्वारे एकत्र ठेवणे हि संघटना आपली जबाबदारी समजते आणि त्यामुळेच हि जबाबदारी समर्थपणे पेलण्यासाठी आपले ठळक अस्तित्व जपून ठेवणे संघटनेला अगत्यशील आहे. ह्याच जबाबदारीचे भान जर जन आंदोलन समितीमधील कॉंग्रेस, भाजप, शिवसेना ह्या पक्षांनी व त्यांच्या धुरिणांनी दाखवले असते तर शहरात त्यांचे पानिपत झाले नसते. त्यामुळे जबाबदारीच्या बाबतीत आमचा प्रौढपणा प्रस्तापित पक्षापेक्षा किंचित जास्तच आहे हेही वास्तव आहे. मोठ्या प्रमाणात तरुण व महिला कार्यकर्त्याची फळी असल्याने निवडणुकीमधील परिवर्तन व आंदोलने संघटनेच्या अग्रेसर पुढाकारामुळे शक्य झाल्याचे वास्तव अनेक वसई करांनी मान्य केलेले आहे. भले दुसरे कुणी ते अमान्य करो व त्याचे श्रेय दुसरया कुणाला देवो. काम न करता प्रसिद्धी प्राप्त करण्याचे कसब तालुक्यातील अनेक जणांनी आत्मसाथ केलेले आहे त्यामुळे आपल्या कॉर्पोरेट सेक्टर मधील नोकरया सांभाळून वसईतील परिवर्तनाला हातभार लावण्याचे श्रेय प्रसिद्धी माध्यमाद्वारे घेणे संघटनेकरिता चुकीचे ठरणार नाही. अगोदर म्हटल्याप्रमाणे संघटनेच्या कार्यकर्त्यांना वेळोवेळी उर्जा व प्रेरणा देण्यासाठी व संघटनेची वाढ करण्यासाठी प्रसिद्धी तंत्राचा वापर करणे काही वेळा पटत नसले तरी व्यवहार्य व काळाची गरज आहे.

जन आंदोलन समितीचे आमदार विवेकभाऊ पंडित संघटनेचे आमदार असल्याचे आपले म्हणणे शंभर टक्के खरे आहे आणि त्यामुळेच काही अपवादात्मक गोष्टी सोडता वेळोवेळी त्यांच्या नेतृत्वाखाली व सहकार्याने समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेने प्राधान्य दिलेले आहे. आमच्या काही मित्रांनी ह्या लेखाचा 'बोलविता धनी कुणी वेगळाच आहे' अशी प्रतिक्रिया आम्हाकडे दिली आहे परंतु आम्ही त्या मताशी सहमत नाहीत. आपण आमचे मित्र व हितचिंतक असल्याचे लेखात म्हटले आहे. आपले टीकावजा मार्गदर्शन, आपली प्रेरणा व वडीलधारी आशीर्वाद संघटनेच्या वेळोवेळी पाठी असतील अशी अपेक्षा करितो आणि वसई समता परिवाराला संघटनेच्या वतीने प्रार्थानामय शुभेच्छा देतो.

आपलाच
सचिन मेंडिस
प्रवक्ते, स्वाभिमानी वसईकर संघटना