Thursday, January 1, 2015

तो आक्रोश मात्र थांबायला हवा !!

Sachin Mendes5:22pm Dec 8
तो आक्रोश मात्र थांबायला हवा !!

-------------------------------- सचिन मेंडिस

ती काकुळतीला येऊन त्याची वाट पाहत होती. बहुतेक पाहुणेमंडळी घराकडे परतू लागली होती. तिची २ चिमणी लेकरे झोपेने कासावीस झाली होती. डिसेंबरचा महिना असल्याने हवेत गारवा वाढला होता अन त्यामुळे ती निरागस मुले थंडीने गारठू लागली होती. दोष तिचा नव्हता कि त्या बालकांचा, पण पप्पा आल्याशिवाय घरी जाणे त्यांना शक्य नव्हते. तसा तो चांगला माणूस. कोणाच्या अध्यात नाही. आपण भले अन आपले काम भले. पण लग्नाचा सिझन सुरु झाला कि त्याला आवरणे कठीण व्हायचे.

घड्याळात ११ वाजले होते, डीजेचा कर्णकर्कश आवाज तिला जास्तच अस्वस्थ करीत होता. आज लग्नाला आलीच नसती तर किती चांगले झाले असते, असा विचार तिच्या मनात आला. तिने ओळखीच्या एका मुलाला हाक मारली अन विचारले, 'ह्यांच्या पप्पाला पहिले का'? 'अंकल काउंटवर घेत आहेत', त्या मुलाने तिला सांगतिले. 'प्लीज, त्यांना निरोप दे कि पोरांना झोप आली आहे, अन थंडी पण जास्त आहे, पटकन जेऊन घरी चल'. तो मुलगा मांडवातील कोपरयात गेला अन लागलीच परत आला. 'अंकलने सांगितलंय कि १५ मिनिटात जेऊन येतो, थोडी वाट पाहायला सांगितली आहे'. नवऱ्याची वाट पाहण्याशिवाय तिच्याकडे तसा दुसरा पर्याय नव्हता. तशी कुणाला विनंती करून घरी पोहचवण्याची व्यवस्था तिला करता आली असती, पण त्याला असे मागे सोडून निघणे, तिचे मन तयार होत नव्हते.

अर्धा तास होऊन गेला तसा तिचा संयमाचा बांध सुटला. ती पुन्हा अंगणातल्या मांडवातून मुलांना घेऊन जेवणाच्या मंडपाकडे गेली. मंडपातील दृश्य पाहून तिचे काळीज फाटून निघाले. दारूच्या पूर्ण नशेत तो हातात प्लेट घेऊन खुर्चीवर एका बाजूने पडलेला होता. हातातील जेवणाची प्लेट अर्धी खाली कलंडली होती अन त्याचे शर्ट प्लेटमधील रस्स्याने खराब झाले होते. थंडीने गारठलेली तिची मुले आपल्या पप्पांना पाहून रडू लागली होती. नीट नेटक्या कपड्यात त्यांना गाडीवरून लग्नाला घेऊन आलेला लाडका पप्पा आता स्वतः उठण्याच्या स्थितीत नव्हता. काउंटवर अजून काही मंडळी वाढेपर्यंत दारू रिचवत होती. डीजेच्या मोठ्या आवाजात त्या लहान मुलांचा आवाज दाबून गेला होता. एक निरागस संसार एका आनंदी लग्न उत्सवात आपले प्राक्तन घेऊन आक्रोश करीत होता. तिचा हवाहवासा साथीदार त्या परिस्थितीत तिला नकोसा वाटू लागला होता. ती मनातल्या मनात देवाला दोष देत होती, तिच्या कर्माला कोसत होती. बाजूचा दगड उचलून काउंटवरवरील बाटलीवर मारावा अशी तीव्र इच्छा तिला झाली होती परंतु त्याला उठवून व्यवस्थित घरी नेणे ही तिची तेव्हाची गरज होती.

तिने मुलांना खाली उतरवले अन त्याच्या हातून प्लेट घेतली. बाजूच्या दोघांना घेऊन त्याचे हात तोंड धुवून घेतले अन एकाला विनंती करून घरी जाण्यासाठी कारची व्यवस्था केली. घरी पोहोचल्यावर तिने त्याला व्यवस्थित खोलीत नेले अन बिछान्यावर झोपवले. तिच्या घरात आजूबाजूचे लोक जमा झाले होते. भेदरलेली मुले अजून जागी होती. तिची आयुष्यभराची झोप आजच्या दिवसाने उडाली होती. कधीतरी थोडी घेणाऱ्या तिच्या जोडीदाराला ह्या लगानच्या सिझनने 'दारुडा' केले होते. रात्रभर तिच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता, डोळे सतत वाहत होते. जो नवरा तिला कार्यक्रमाला हौशेने घेऊन जात होता, त्याला लग्नघरून उचलून आणण्याची दुर्दैवी परिस्थिती आज तिच्यावर आली होती. ती मनोमन विचार करत होती, हे बदलायला हवे, हे कुणीतरी बदलायलाच हवे.
------------------------------------------------------
(ह्या ललित लेखाचा शेवट कसा व्हावा हे मला कळत नाही, पण हे चित्र बदलले पाहिजे हे नक्की. काउंटवर खुली दारू वाढनारयाला दोष द्यायचा, की फुकट मिळते म्हणून आपल्या बायका-पोरांची काळजी न करता शेवटपर्यंत काउंटवर पीत बसणाऱ्याला दोष द्यायचा की एकूणच मद्य वाढून उत्सव साजरा करणाऱ्या आपल्या सोहळा संकृतीला दोष द्यायचा. प्रत्येक शनिवारी लग्नात वाजणाऱ्या डीजेच्या आवाजात कुणान कुणा निष्पाप संसाराचा टाहो असा विरून गेलेला असतो. तो आक्रोश मात्र थांबायला हवा.)

कुपारी समाजाचे अस्तित्व

Sachin Mendes4:54pm Nov 13
कुपारी समाजाचे अस्तित्व टिकवण्यासाठी लोकसंख्या वाढ हा उपाय होऊ शकत नाही. अस्तित्व टिकवणे हा अस्मितेचा प्रश्न आहे अन असुरक्षितता ही त्या मागची मूळ प्रेरणा आहे. तर लोकसंख्यावाढीसाठी अधिक अपत्यनिर्मिती जरुरी असून बदलत्या काळात नवीन पिढीला आपल्या पाल्याच्या संगोपनासाठी वेळ व खर्च ह्या बाबी आव्हानात्मक असल्याने व्यावहारिक पातळीवर हा उपाय अस्मितेच्या प्रेरणेवर मात करणारा आहे.

भाषा व वेशभूषा ह्या जरी आपण संस्कृतीशी निगडीत केल्या, तरी आपण हे जाणले पाहिजे कि संस्कृती ही प्रवाही असून आजच्या ग्लोबल जीवनात बाहेरच्या संस्कृतीपासून आपल्याला 'आयसोलेटेड' ठेवणे अशक्य अन अव्यवहार्य आहे. संकृती जतन करणे वाईट नाही, परंतु नव्या व्यावहारिक युगात जुन्या पद्धतीच्या संकृतीची अंमलबजावणी अपेक्षित करणे आपल्याला परवडणारे नाही.

अस्तित्व टिकवण्यासाठी लोकसंख्यात्मक वाढीपेक्षा गुणात्मक वाढीकडे लक्ष देणे ही काळाची गरज आहे. ह्याकरिता राजकीय दृष्ट्या सक्रिय होणे व उद्योगव्यवसायामध्ये उतरून आर्थिक दृष्ट्या संम्पन्न होणे ह्या दोन बाबी फार महत्वाच्या आहेत. तसेच समाजातील बुद्धीजीवी लोकांचा गट स्थापन करून कायदेशीर मार्गाने प्रसार माध्यमे, न्यायव्यवस्था, शासन प्रशासन ह्यात आपली उपयुक्तता अन उपद्रवमूल्य वापरून 'वेगळी ओळख' निर्माण करणे गरजेचे आहे.

शेवटी ज्याच्या पायाखाली त्याची हक्काची भूमी आहे, त्याला स्वतचा असा वेगळा चेहरा अन आवाज असतो. आज आपल्याच समाजात जमिनीवरून वाद इतके विकोपाला गेले आहेत कि नातेसंबंध उसवले जाऊन अप्रत्यक्षरीत्या जमिनींच्या दलालांना सहजतेने ह्या जागा मिळवण्यासाठी मदत करत आहेत. समाज टिकवण्यासाठी रक्ताची नाती टिकवणे व सर्वाना न्यायाने त्यांचे हक्क देणे, ही जागृती संस्कृती संवर्धन मोहिमेतून करावी लागेल व त्याकरिता चांगले आदर्श पुढे आणावे लागतील.

दुर्दैवाने एक दिवसाचा महोत्सव सोडला तर मागच्या २ वर्षात कुपारी संस्कृती मंडळाकडून भाषा, वेशभूषा, पारंपारिक खाद्यपदार्थ व वस्तू अन वास्तू ह्यांच्या संरक्षण व संवर्धनाकरिता विशेष प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. ही उदानसिनता आपल्या सर्वाना मागे टाकून क्रियाशील कार्यकर्त्यामार्फत कालबद्ध कार्यक्रम आखणे गरजेचे आहे, अन त्यासाठी मंडळाचे 'विजन' अन 'मिशन' पुन्हा एकदा तपासून आपल्याला दुरुस्त करावे लागेल.

अस्पष्टीकरण:

Sachin Mendes10:32am Dec 17
माझा कॉलेज मित्र आणि आजचा बर्थ डे बॉय Simson Rodrigues ह्यांनी मागे लिहिलेल्या पोस्टला माझी प्रतिक्रिया कम वाढदिवसाची भेट !!
-----------------------------------------------------

मला गांडूळ आवडत नाही ( अ # ब )
मला मासेही आवडत नाही (अ # क)
पण माशाला गांडूळ आवडतात (ब = क)
----------------------------------------------------
मी चंद्राला पाण्यात पाहत नाही ( अ # ब )
मी माशांनाही पाण्यात पाहत नाही (अ # क)
पण मी चंद्रावरच्या पाण्यात मासे शोधतो (अ=ब=क)
----------------------------------------------------
अस्पष्टीकरण:

भारत माझा देश आहे पण सर्व भारतीय माझे बांधव नाहीत. कारण काही मासे खातात तर काही गांडूळ म्हणून जगतात. कुणाला चंद्रावर जाण्याचे वेध लागले आहेत, तर भाकरीचा चंद्र शोधण्यात काहींची जिंदगी बरबाद झाली आहे. मी चंद्राचा विचार करीत नाही. मला २ वेळच्या भाकरीचाही प्रश्न नाही, पण मला भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झालेल्या गांडूळाचा विचार करायला शिकले पाहिजे.
----------------------------------------------------
तात्पर्य:

मला गांडूळ आवडत नाही ( अ # ब )
मला मासेही आवडत नाही (अ # क)
पण मला गांडूळरुपी माणसे आवडतात (ब = क)
----------------------------------------------------
सचिन मेंडिस@भारत माझा देश आहे.कॉम

मेहनत करे कुपारी, मलई खाये भैय्या !!

Sachin Mendes5:46pm Dec 18
मेहनत करे कुपारी, मलई खाये भैय्या !!

माझ्या काकांचे घर मुख्य रस्त्यावर आहे. त्यांच्या अंगणात कमी उंचीची चार पाच नारळाची झाडे आहेत. त्या दिवशी नारळ विकत घेणारा एक भैय्या त्यांच्या घरी आला अन १० रुपयाप्रमाणे सौदा केला. त्याने बरोबर आणलेल्या व्यक्तीने २० मिनिटात त्या चार पाच झाडावरून ६-७ पेंडी खाली उतरवल्या अन रस्त्याच्या कडेला ठेवल्या. त्यात जवळपास ४० नारळ होते. त्यावेळी रस्त्यावरून जाणारी एक सफेद होंडा सिटी कार काकांच्या अंगणात थांबली. त्यात बसलेल्या ३ तरुणांपैकी एकाने नारळाचा भाव विचारला. काका काही बोलण्याअगोदर त्या भैय्याने त्या तरुणाला एका नारळाचे प्रती २५ रुपये सांगितले. तरुण म्हणाला 'ठीक आहे, सर्व नारळ गाडीच्या डीगीत टाका'.

त्या भैय्याने त्या ६-७ पेंडी होंडा सिटी कारच्या डीगीत टाकल्या अन त्या तरुणाकडून प्रती २५ रुपये मोजून घेतले. कार निघून गेली अन त्या व्यक्तीने काकाच्या हातात त्या तरुणाने दिलेल्या पैशातून १० रुपये प्रमाणे नोटा ठेवल्या. काकांचे नारळ, काकांच्या अंगणात, काकांच्या डोळ्यासमोर एका भैय्याला काकांपेक्षा जास्त नफा मिळवून देऊन गेले होते. दुर्दैव हे कि आपल्या शेतीमालासाठी बाजारपेठ आपल्या आजूबाजूला उपलब्ध असताना आपल्याला त्याचा फायदा घेता येत नाही, अन अगदी थोड्या श्रमाने परप्रांतीय लोक आपल्या मेहनतीवर गब्बर होतात. आपल्या गावातील बेरोजगार तरुण ह्या संधीचा फायदा घेऊ शकतील का? कोवळे नारळ, केळी, पपई अन इतर भाजीपाल्याला आज आजूबाजूच्या मार्केटमध्ये चांगला भाव मिळतो, परंतु आपल्याला आपल्याच गावात हा माल विकण्याची 'लाज' सोडावी लागेल.

एका लग्नाची मजेशीर गोष्ट !!

एका लग्नाची मजेशीर गोष्ट !!
-----------------------------------------------------------------------
सचिन मेंडिस

आपल्या इकडे लग्न म्हटलं कि तयारी खूप आधीपासून सुरु होते, पण कितीही केले तरी बारीक सारीक गोष्टी राहून जातात अन ऐन वेळेला गोंधळ होतो. प्रसंगी काही गोष्टी सांभाळता येतात तरी काही अडचण करतात. अलीकडेच एका लग्नातील गोष्ट. रविवारी सकाळी नवरा मुलगा घरून मुलीच्या धर्मग्रामातील चर्चकडे लग्न लावायला जाण्यासाठी तयार झाला. साधारण आपल्याकडे निघताना बाज्यांच्या तालमीत गावाच्या वेशीपर्यंत चालत जाण्याची पद्धत आहे अन मग पुढे सजवलेल्या कारने चर्चचा प्रवास. ह्या छोट्याशा प्रवासात जितके बाजेवाले महत्वाचे आहेत, तितकीच नवरयाच्या डोक्यावर फिरणारी छत्री अन ती छत्री धरणारा अन गोल गोल फिरवणारा अनोळखी चेहरा. तसा तो दुर्लक्षित माणूस पण वेळ आली तर खूप महत्वाचा. तर झालं काय नवरा मुलगा घरून निघण्यासाठी तयार, बाजेवले तयार, घरची मंडळी तयार अन छत्री पण तयार पण छत्री फिरवणारा नाही तर करायचे काय? ज्या वारली मुलाला छत्री फिरवण्याचे कंत्राट दिले होते त्याने आदल्या रात्री यथेच्च दारू प्याल्याने सकाळी त्याची छत्री मोडली होती. त्याला बोलवायला अन उठवायला ३ वेळा घरातील माणसे जाऊन आली पण त्याचा मांडव असा मोडलेला कि उभा करणे अशक्य. अन इकडे लग्नाच्या मिस्साची वेळ होत आलेली. मग कुणीतरी मनाचा मोठेपणा दाखवून तात्पुरती छत्री नवरोबाच्या डोक्यावर धरली अन नवरा कारपर्यंत पोहचवला. पुढे तात्पुरती छत्री धरणाऱ्या महामानवाने इथे लग्नाचे मिस्सा संपेपर्यंत धावाधाव करून छत्री धरण्याचा कंत्राटदार बदलला. नाहीतर ते कंत्राट त्याच्या गळ्यात पडायचे.

हा किस्सा पहा. वरच्या घटनेत छत्रीवाला नव्हता म्हणून घोळ झाला होता, अन ह्या घटनेत छत्रीवाल्यामुळे घोळ झाला. तर घडले असे कि लग्न लावण्यासाठी नवरा मुलगा घरून निघाला. चर्च जवळ असल्याने लवाजमा पायीच निघाला होता. नवऱ्याच्या मागे छत्री फिरवणारा छत्रीवाला आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे तोंडात माणिकचंद गुठका कोंबून रवंथ करीत होता. नवरा मुलगा जेव्हा नंदाखाल चर्चच्या पायरीजवळ पोहचला तेव्हा अनपेक्षित घडले. त्या छत्रीवाल्या व्यक्तीला जोराची शिंक आली अन नवऱ्या मुलाचा सूट पाठीमागून माणिकचंद गुठ्क्याने रंगून गेला. त्या छत्रीवाल्या व्यक्तीने आपली 'ऊंची पसंद' माझ्या मित्राच्या पाठीवर फुलवून ठेवली होती. मग काय सगळे घरचे अन पाहुणेमंडळी आपापले रुमाल काढून त्या छत्रीवाल्याचा आशीर्वाद आपापल्या रुमालात जमा करू लागले. तब्बल १० मिनिटे मित्राची पाठ थोपटून काढल्यावर त्याचा सूट माणसात आला अन सगळी मंडळी चर्चमध्ये पळाले. नंतर पूर्ण दिवस छत्रीवाल्या व्यक्तीने माणिकचंद गुठ्क्याचा उपवास करून माझ्या मित्राचे सांत्वन केले.

दुसरा किस्सा, लग्नाचा केक कापण्यासाठी स्टेजवर प्रार्थना सुरु होती. मंडप पाहुण्यांनी फुलून गेला होता. सूत्रसंचालन करणारा माणूस नवरा नवरीची मनोसोक्त स्तुती करत होता. ती स्तुती ऐकून उगाच नवरा नवरीला मनोमन ह्यापेक्षा अधिक चांगला जोडीदार मिळाला असता, असे क्षणभर वाटले असावे. अन वराच्या मात्यापित्याला एवढे गुणी रत्न इतके वर्षे आपल्या घरात असून आपल्याला त्याची जान नसल्याचे शल्य टोचले असावे. तर तिकडे मंडपात भुकेने व्याकूळ झालेले लोक केक कापतो कधी अन कधी आपण जेवणाच्या रांगेत घुसतो ह्या स्थितीपर्यंत आलेले होते. शेवटी लोकांच्या संयमाची परीक्षा घेऊन झाल्यावर त्या सूत्रसंचालकाने नवरा नवरीला केक कापून आपला आनंद द्विगुणीत करण्याची आज्ञा केली. नवरा नवरी खुर्ची सोडून केकच्या टेबलजवळ आले. डीजेने Congratulations चे गाणे रेडी केले. बेस्टमन सुद्धा टेबलाच्या डोक्यावरील कबुतराच्या पोटातील दोरी खेचून थर्माकोलच्या दाण्याने नवरा नवरीला आशीर्वाद देण्यासाठी सज्ज झाला. पण हाय रे देवा !! केक कापायला सुरी होती कुठे तिथे? नवरा सूत्रसंचालकाच्या तोंडाकडे पाहत होता अन सूत्रसंचालक खाली. मग धावाधाव झाली अन दोन तीन लोक सुरी आणण्यासाठी घरात पळाले. पण लग्नाच्या घरी एखादी वस्तू जागेवर मिळेल तर ते लग्नाचे घर कसे. लग्नात घर जितके बाहेरून सुंदर दिसते त्यापेक्षा जास्त ते घरातील खोलीत अन किचन मध्ये विस्कटलेले असते. शेवटी एकाला बुद्धी सुचली अन त्याने मंडपाच्या मागे काकडी कापायला घेतलेली सुरी उचलून आणली अन तमाशा संपला.

आता हा किस्सा जुन्या काळातला. तेव्हा एकूणच गरिबीची परिस्थिती असल्याने प्रत्येकाला लग्नासाठी नवीन सूट शिवणे शक्य नव्हते, म्हणून मंडळी दुसऱ्याकडून सूट घालायला आणायची. तर किस्सा असा की एका नवरयामुलाने असाच दुसऱ्या कडून लग्नासाठी सूट आणला होता पण ट्राय करून पाहिला नव्हता. कारण तेव्हा तितके चोईस ही नव्हते. सूट विना भाड्याने मिळणे हेच मोठे होते. तर झालं असं कि ह्या नवरया मुलाने चर्चला जाण्यासाठी तयारी सुरु केली. ह्याची कंबर ३० ची अन ज्याची pant मागून आणली होती त्याची कंबर ३६ ची. झाले ना वांदे. आता शेवटच्या क्षणाला काय करायचे? पण शेवटी कुपारी तो कुपारी. एकाने शक्कल लढवली. नवऱ्याच्या कमरेला टॉवेल गुंडाळला अन त्यावर pant चढवली अन छान पैकी पट्ट्या ऐवजी 'हुम्बडी' वापरून नवऱ्याचे माप pant वापरण्यायोग्य केले. अन मग कमरेचे झाकण्यासाठी वरून सूट अंगावर आला. प्रश्न सुटला जरी नसला तरी झाकला गेला होता. बिचाऱ्या नवऱ्याला नावळ आणताना एक हात नवरीच्या हातात अन दुसरा pant सांभाळण्यात वापरावा लागला. 'सूट नको पण टॉवेल आवर' असे बिचाऱ्याला वाटले असावे.

आता हा किस्सा माझ्या परमप्रिय मित्राचा. त्याला बहुतेक लग्नात स्टेजवर सूत्रसंचालन करण्यासाठी बोलावले जाते. तर झाले असे कि केक कापण्या अगोदर त्याने सुखाला प्रार्थना घेतली अन बिचारा तिथेच फसला. 'आमच्या स्वर्गीय बापा, ........... सुरुवात झाली अन मध्ये गाडी अडकली. पुढचे काही आठवेना अन लोकही त्याला साथ देईना. २ मिनटे स्तब्धता. बिचारा काकुळतीला आला. पण शेवटी साहस करून त्याने डायरेक्ट 'नमो मारिया' वर उडी घेतली अन प्प्रार्थनेची गाडी केक पर्यंत पोहचली. प्रश सोडून दिल्याने सुटतात असे जे म्हटले जाते त्याचा हा अनुभव. ह्या धड्याने त्या मित्राने कानाला पीळ घेतला अन नंतर केक कापताना प्रार्थना कायमची टाकून दिली. कुमसारा अगोदर 'धोत्रीन' ला दांडी मारली कि काय होते त्याची शिक्षा त्याला अशी मिळाली होती.

एकदा असाच जवळच्या मित्राच्या लग्नाला थोडा उशिरा पोहोचलो. केक वैगरे कापून झाला होता. मंडप लोकांनी भरलेला पण स्टेज रिकामे होते. च्या आयला, नवरा नवरी गेले कुठे गेले? मंडपात गेल्यावर कळाले कि, केक कापताना दुर्दैवाने स्टेजच्या मागील मधमाशीच्या पोळ्यातील मधमाश्यांनी विना आमंत्रण स्टेजवर एन्ट्री केली होती. अन त्यांना माझ्या मित्राचे चुंबन घेऊन शुभेच्छा देण्याची अपर इच्छा झाली होती. पण नशीब चांगले कि कुणाच्या तरी ते उडणारे पाहुणे लक्षात आले अन स्टेजवरची नावळ खाली उतरली. असाच दुर्दैवी प्रसंग एका दुसऱ्या परिचित असलेल्या नवरयाच्या वाट्याला आला होता. केक कापताना कुणा वात्रट मुलाचा नेम चुकून स्टेजवर उडवण्यात येणारा कागदी फटाका नवऱ्याच्या नाकावर बसला होता अन त्यामुळे त्याचे तोंड अन फोटो बर्यापैकी बिघडले होते. एकदा तर आमच्या गावात एक बाका प्रसंग आला होता. नावळ गावात पोहचली अन मंडपातील जनरेटर बंद पडले. मंडप वाल्याला सांगितले तर तो म्हणाला 'जनरेटर बंद झाले हा काय माझा दोष आहे का?' शेवटी ठाकठोक करून ते जनरेटर चालू झाले, पण उजेड एवढा कमी होता कि भाजी संपली अन चिकन उरले. हा मंडपवाला आपण नक्कीच ओळखला असेल, अशी त्याच्या कामाची कीर्ती अन कम्पलेटची महती आहे.

मित्रानो, अशा अनेक गमती जमती, कडू गोड प्रसंग आपण पहिले असतील किव्हा ऐकले असतील तर इथे शेर करा. सीजन लग्नाचा आहे. 'पुढच्यास ठेच मागचा शहाणा' ह्या म्हणीप्रमाणे लोक केप कापण्याची सुरी, सूटची pant , छत्रीवाला, जनरेटर तसेच फटाके फोडणारे मुलगे अशा गोष्टीची पुढे योग्य काळजी घेतील. मंडपात मधमाशाचा पोळा असल्यास त्याचा बंदोबस्त करतील अन विशेष म्हणजे पूर्ण प्रार्थना येणारा सूत्रसंचालक शोधून काढतील.

'रंग माझा आहे कुपारी' !!

Sachin Mendes1:29pm Dec 29
'रंग माझा आहे कुपारी' !!

शब्दाला जेव्हा सुरांची साथ मिळते तेव्हा जन्म घेते ते गीत. जुन्या काळी आपल्या कुपारी मातीत अनेक गीतांचा जन्म झालेला आहे, पण अलीकडच्या काळात नवीन गीतांची निर्मिती थांबलेली आहे. दुर्दैवाने नवीन पिढीला भावतील अशी गीते सध्या कानावर पडत नाहीत.

आपल्या समाजात अनेक उभरते लेखक-कवी आहेत तसेच उच्च प्रतिभा असलेले तरुण संगीतकार अन गायक सुद्धा आहेत. ह्या सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास कुपारी मातीचा संगीतमय वारसा आपल्याला पुढे नेता येईल. एक सुरुवात म्हणून मी आणि Anson A. Tuscano ह्याने तरुण पिढीला आवडेल अशा एका गीताची निर्मिती केलेली आहे. मला सहज सुचलेल्या ओळीवर Anson ह्याने सुरेख संगीत देऊन आपल्या दमदार आवाजात ह्या गाण्याला जिवंत केले आहे. संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या प्रतिभावान तरुण मंडळीना प्रोत्साहन देण्याचा हा प्रयत्न आहे अन ह्या प्रयत्नात आपल्या सर्वांची साथ आपल्या होतकरू तरुण मंडळीना हवी आहे.

'रंग माझा आहे कुपारी' ह्या गीताला संगीत देण्यासाठी Anson ह्याने भरपूर मेहनत घेतली आहे. ह्यात कुपारी मातीचा गोडवा आहे, तसेच आपल्या पारंपारिक वाद्यांचा तडकाही आहे. हे गीत रेकॉर्ड करीत असताना शेवटच्या कडव्यात खूप रंग पेरण्यात आले आहेत, जेणेकरून ऐकताना आपल्याला नाचण्याचा मोह होईल. हे गीत बनवण्यसाठी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत केली आहे त्या सर्वांचे आभार. हे गीत आपण यु ट्यूब वरून किव्हा http://www.onevasai.com/ येथून डाऊनलोड करू शकता. आपल्याला हे गीत आवडल्यास आपल्या मित्रांशी शेअर करा.

https://www.youtube.com/watch?v=nMFuSFqlDgE&feature=youtu.be
Kupari Theme Song
'रंग माझा आहे कुपारी' !! शब्दाला जेव्हा सुरांची साथ मिळते तेव्हा जन्म घेते ते गीत. जुन्या काळी आपल्य...

सेलेब्रेशनमधील दुखः !!


सेलेब्रेशनमधील दुखः !!
-------------------------------------- सचिन मेंडीस

ख्रिसमस अन नववर्षाची रात्र म्हणजे आपल्याकडे जल्लोष अन उत्साहाची वेळ. चर्चला जाण्याची तयारी, नवीन कपडे अन रात्रीच्या पार्टीची तयारी. कुणी कुटुंबाबरोबर तर कुणी गावातील मित्रमंडळी बरोबर ही रात्र साजरी करण्याचे बेत आखलेले असतात. वेगवेगळ्या खाद्याच्या डिशेश, उंची मद्य अन डीजे संगीत अशा वातावरणात बरीच मंडळी ख्रिसमस अन नववर्षाची रात्र साजरी करतात. काही मंडळी तर अगोदरच गोवा सारख्या पर्यटनस्थळी जाऊन एका वेगळ्या वातावरणात आयुष्याचे वेगळे क्षण अनुभवतात. पण कधी व्यक्तीच्या आयुष्यात असे क्षण येतात की ख्रिसमस अन नववर्षाची रात्र कल्पना नसलेल्या वास्तूत अन अतिशय वेगळ्या मूडमध्ये व्यतीत करावी लागते. जिथे नसतो जल्लोष, जिथे नसतो आनंद, असती ती अकल्पित, नको असलेली भयाण शांतता.

चार वर्षाअगोदर साधारण ख्रिसमसच्या ३-४ दिवस अगोदर आईला ब्रेन हेमरेज झाल्याने तिला लीलावती रुग्णालयात आयसीयू मध्ये दाखल केले होते. तिला रुग्णालयात दाखल करताना तिचा श्वास सोडून तिच्या शरीराची काहीही हालचाल होत नव्हती. आईची प्रकृती चिंताजनक असल्याने पहिले दोन दिवस आमच्या कुटुंबाना अतिशय भीतीच्या छायेत काढावे लागले. माणूस कितीही सामर्थ्यवान असला तरी अशा वेळी त्याच्या मर्यादा उघड्या पडतात. अशा परिस्थितीत मानवी मन इतके दुबळे बनते की डॉक्टरांच्या प्रयत्नाबरोबर आपल्या सृष्टीच्या निर्मात्याकडे मदतीसाठी याचना करावी लागते. अशा कठीण परिस्थितीत प्रार्थना बळ देते, हरलेल्या जीवाला आशेचा आधार देते. सुदैवाने दुसरया दिवशी आईने शरीराची थोडी हालचाल करावयास सुरुवात केली अन आम्हा थकलेल्या जीवाला थोडा दिलासा मिळाला. आई कोमामधून बाहेर आलेली असली तरीही अजून काही दिवस आईला आयसीयू मध्ये ओब्जरवेशन खाली ठेवावे लागणार होते.

लीलावती रुग्णालयात रात्री वस्तीला फक्त एक व्यक्तीला राहण्याची परवानगी असल्याने मी, माझे वडील अन भाऊ आळीपाळीने तिथे रात्रीला वस्तीला थांबत असू. योगायोगाने मला ख्रिसमस अन नववर्षाच्या दोन्ही रात्री लीलावती रुग्णालयात वस्तीला थांबावे लागले. आयुष्यात ह्या पूर्वी ख्रिसमस अन नववर्षाच्या रात्री ह्या वेगळ्या जल्लोषाच्या अन आनंदाच्या वातावरणात जगायला मिळाल्या होत्या. पण त्या वर्षी लीलावती रुग्णालयात काढलेल्या त्या रात्री खूप वेगळ्या, भयाण, एकाकी अन बऱ्याच काही गोष्टी शिकवून गेल्या. आयुष्य दुसरया नजरेने पाहण्याचा अन जगण्याचा अनुभव त्या रात्री देऊन गेल्या. वांद्रे सारख्या उच्चभ्रू अन ख्रिस्ती परिसरात लीलावती रुग्णालय असल्याने दोन्ही रात्री आजूबाजूला मोठा जल्लोष होता. आकाशात फटक्याची रोषणाई चालू होती. सेलेब्रेशन मूड मध्ये आजूबाजूच्या परिसराला आनंदाचे उधाण आले होते. रोषणाईने फुललेल्या त्या मुंबईत एका बंदिस्त आयसीयूच्या शेजारी मी अन माझ्यासारखे अनेक जीव आपल्या प्रिय व्यक्तीच्या जीवन मरणाचे क्षण अनुभवत होतो. त्या क्षणी माझा नाताळ माझ्या आईचा सुरु असलेला श्वास होता. आईची हालचाल नव्या वर्षाचे अनमोल सुख होते. आई जिवंत असलेल्याची, ती आपल्यात असल्याची भावना कोणत्याही जल्लोषापेक्षा आम्हाला मोठी होती. आईचा श्वास, आईची हालचाल हेच आमचे त्या रात्रीचे सेलेब्रेशन होते. दुखःच्या त्या दोन रात्री जणू मला सेलेब्रेशनचा वेगळा अर्थ समजावून सांगत होत्या. भौतिक गोष्टीत सुख शोधणारा मी त्यावेळी आईच्या जिवंत असण्यात सुख अनुभवत होतो.

देवाच्या कृपेने आई १५ दिवसानंतर बरी होऊन घरी आली. आज ती तिचा दुसरा जन्म जगत आहे. त्या २ रात्रीच्या अनुभवानंतर मी ख्रिसमस अन थर्टी फस्ट नाईटला वेगवेगळ्या खाद्याच्या डिशेश, उंची मद्य अन डीजे संगीत ह्या मध्ये सेलेब्रेशन शोधत नाही. आपल्या जिवाभावाची माणसे सुखी समाधानी व आपल्यात असल्याची भावना मला ह्या दिवशी वेगळा आनंद देऊन जाते. ह्या दोन दिवशी मला आजूबाजूच्या परिसरातील परिस्थितीने हरलेल्या जीवांची आठवण येते. ते आज जगत असलेल्या स्थितीत मी माझा घालवलेला भूतकाळ जिवंत करतो अन त्यांच्याशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. मग अशा जल्लोषाच्या रात्री दूर कुठेतरी कोमात गेलेल्या आपल्या सानुल्या जीवाच्या शेजारी प्रार्थना करीत असलेल्या कुणा अनोळखी अभागी आईशी कनेक्ट व्हावेसे वाटते, परदेशात मृत्यू पावलेल्या आपल्या उमद्या लेकराच्या शवाची वाट पाहत असलेल्या दुर्दैवी पालकांसाठी प्रार्थना करावीशी वाटते. अशा करुण परिस्थितीत आजूबाजूच्या जल्लोषात त्यांना काय वाटत असेल, हे स्वता: अनुभवल्याने बाहेच्या जल्लोषापेक्षा त्यांच्या आतल्या दुखः त एकरूप व्हावेसे वाटते. सुखात सामील करून घेण्यासाठी आपल्याला आमंत्रण द्यावे अन स्वीकारावे लागते, दुखःचे तसे नसते. त्यासाठी आपल्याला त्यांच्याशी कनेक्ट व्हावे लागते, त्यांच्यात विरघळावे लागते.

आज थर्टी फस्टच्या रात्री जग सेलेब्रेशन मूड मध्ये असताना, आपल्या आजूबाजूला, हाकेच्या अंतरावर, एका अंधाऱ्या खोलीत आपल्यातीलच कुणी शोक करीत असल्याने हे लिहावेसे वाटले. नाहीतर सरलेल्या दुखःची आठवण काढायला कुणाला आवडते.