Tuesday, November 25, 2014

कुपारी सीझनची कविता !!


कुपारी समाजाचे अस्तित्व !!

कुपारी समाजाचे अस्तित्व टिकवण्यासाठी लोकसंख्या वाढ हा उपाय होऊ शकत नाही. अस्तित्व टिकवणे हा अस्मितेचा प्रश्न आहे अन असुरक्षितता ही त्या मागची मूळ प्रेरणा आहे. तर लोकसंख्यावाढीसाठी अधिक अपत्यनिर्मिती जरुरी असून बदलत्या काळात नवीन पिढीला आपल्या पाल्याच्या संगोपनासाठी वेळ व खर्च ह्या बाबी आव्हानात्मक असल्याने व्यावहारिक पातळीवर हा उपाय अस्मितेच्या प्रेरणेवर मात करणारा आहे.

भाषा व वेशभूषा ह्या जरी आपण संस्कृतीशी निगडीत केल्या, तरी आपण हे जाणले पाहिजे कि संस्कृती ही प्रवाही असून आजच्या ग्लोबल जीवनात बाहेरच्या संस्कृतीपासून आपल्याला 'आयसोलेटेड' ठेवणे अशक्य अन अव्यवहार्य आहे. संकृती जतन करणे वाईट नाही, परंतु नव्या व्यावहारिक युगात जुन्या पद्धतीच्या संकृतीची अंमलबजावणी अपेक्षित करणे आपल्याला परवडणारे नाही.

अस्तित्व टिकवण्यासाठी लोकसंख्यात्मक वाढीपेक्षा गुणात्मक वाढीकडे लक्ष देणे ही काळाची गरज आहे. ह्याकरिता राजकीय दृष्ट्या सक्रिय होणे व उद्योगव्यवसायामध्ये उतरून आर्थिक दृष्ट्या संम्पन्न होणे ह्या दोन बाबी फार महत्वाच्या आहेत. तसेच समाजातील बुद्धीजीवी लोकांचा गट स्थापन करून कायदेशीर मार्गाने प्रसार माध्यमे, न्यायव्यवस्था, शासन प्रशासन ह्यात आपली उपयुक्तता अन उपद्रवमूल्य वापरून 'वेगळी ओळख' निर्माण करणे गरजेचे आहे.

शेवटी ज्याच्या पायाखाली त्याची हक्काची भूमी आहे, त्याला स्वतचा असा वेगळा चेहरा अन आवाज असतो. आज आपल्याच समाजात जमिनीवरून वाद इतके विकोपाला गेले आहेत कि नातेसंबंध उसवले जाऊन अप्रत्यक्षरीत्या जमिनींच्या दलालांना सहजतेने ह्या जागा मिळवण्यासाठी मदत करत आहेत. समाज टिकवण्यासाठी रक्ताची नाती टिकवणे व सर्वाना न्यायाने त्यांचे हक्क देणे, ही जागृती संस्कृती संवर्धन मोहिमेतून करावी लागेल व त्याकरिता चांगले आदर्श पुढे आणावे लागतील.

दुर्दैवाने एक दिवसाचा महोत्सव सोडला तर मागच्या २ वर्षात कुपारी संस्कृती मंडळाकडून भाषा, वेशभूषा, पारंपारिक खाद्यपदार्थ व वस्तू अन वास्तू ह्यांच्या संरक्षण व संवर्धनाकरिता विशेष प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. ही उदानसिनता आपल्या सर्वाना मागे टाकून क्रियाशील कार्यकर्त्यामार्फत कालबद्ध कार्यक्रम आखणे गरजेचे आहे, अन त्यासाठी मंडळाचे 'विजन' अन 'मिशन' पुन्हा एकदा तपासून आपल्याला दुरुस्त करावे लागेल.

ती निघता सासरी ....

लाडक्या लेकीचं पाऊल जेव्हा, सासरकडे निघते
दुडूदुडू धावणाऱ्या आठवणीने, घर सारे रडते !

आईची सोनुली पुन्हा, उदरी हालचाल करते
बाबाची लेक लाडकी, ओंजळीत पुन्हा जन्मते !

लाडक्या लेकीचं पाऊल जेव्हा, सासरकडे निघते
दुडूदुडू धावणाऱ्या आठवणीने, घर सारे रडते !

दादाची ताई प्रेमाची, अलगद डोळ्यातून ओघळते
पाठीवरची लहान बहीण, रिकामा हिंदोळा शोधते !

लाडक्या लेकीचं पाऊल जेव्हा, सासरकडे निघते
दुडूदुडू धावणाऱ्या आठवणीने, घर सारे रडते !

लाल लुगड्यातील बय तिची, गालाला मुका घेते
पुन्हा पुन्हा मिठीत घेऊन, रिकामी मिठी भरते !

लाडक्या लेकीचं पाऊल जेव्हा, सासरकडे निघते
दुडूदुडू धावणाऱ्या आठवणीने, घर सारे रडते !

जिवलग मैत्रीण शेजारची ती, हळवे क्षण शोधते
डोळ्यातील विरह तिच्या, उबदार स्पर्शाने जाणते !

लाडक्या लेकीचं पाऊल जेव्हा, सासरकडे निघते
दुडूदुडू धावणाऱ्या आठवणीने, घर सारे रडते !

हवीहवीशी ती निघता सासरी, अंगण उदास भासते
रेशमी बंध नात्याचे ती, पुन्हा अलगद विणते !

सचिन मेंडिस