कुपारी समाजातील एक दोन मुलींनी आंतरजातीय (बिगर-कुपारी) तरुणाशी विवाह विवाह केल्याने कुपारी संस्कृतीवर आघात झाल्याची व्यर्थ ओरड सध्या Facebook chya व्यासपीठावरून चालू आहे. त्या उद्देशाने काही मुद्दे इथे मांडावे वाटतात. मुळात कुपारी संस्कृती अस्त होण्याची कारणे हि मोठ्या प्रमाणात बोली भाषा मागे पडणे, पेहराव अन आहार बदलणे, कुटुंब आत्मकेंद्री होणे अन ग्लोबल वातावरणाचा समाज एक भाग होवून जाणे हि आहेत. इंग्रजी माध्यमाचा वापर, उच्च शिक्षण,कॉर्पोरेट सेक्टर मधील नोकरीचे वातावरण, स्त्रियांचे नोकरीमधील वाढते प्रमाण तसेच इंटरनेटमुळे जगाशी वाढलेला संपर्क हि झपाट्याने संस्कृती iबदलण्यासाठी उत्प्रेरके ठरली आहेत.
कौलारू घरे जाऊन बंगले येणे, रहाटाची चित्रे बनून भिंतीवर टांगणे, लग्नसमारंभात गावकर्यांचा सहभाग कमी होवून प्रोफ़ेस्सिओनल मंडळी येणे , घरगुती पक्वनाऐवजी सणाला रेडीमेड केक येणे अन धोतर-लुगडे हा पेहराव जाऊन शर्ट जीन्स चा मोठ्या प्रमाणात वापर होणे हि संस्कृती बदलाची व्यापक चिन्हे झाली. १-२%आंतरजातीय विवाहामुळे संस्कृती अस्ताला जात नाही. जेव्हा मोठ्या प्रमाणात गुजराती, मारवाडी, ब्राह्मण, मद्रासी मुली आपल्या येथे विवाह करून आयुष्य घालवतील तेव्हा ' आंतरजातीय लग्न' ह्या मुद्य्यामुळे कुपारी संस्कृतीचा चेहरामोहरा बदलेल असे मला वाटते.
लग्न हि खाजगी बाब आहे, कुणी कुणाबरोबर आणि कसे नाते जोडावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. ह्या खाजगी बाबीला समाजाशी जोडणे योग्य होणार नाही. आपल्या समाजात होणारी लग्ने अन संसार सगळे चांगले अन आंतरजातीय वाईट हे सुद्धा संयुक्तिक नाही. लग्न करणे ह्या पेक्षा चांगल्या रीतीने संसार करणे, आपल्या जोडीदाराला सन्मानाने वागवणे हे महत्वाचे...तसेच ज्या व्यक्तीच्या जडणघड्निशी आपला काही संबंध नाही त्यावर हक्काने मतप्रदर्शन करणे मला गैर वाटते. काळ बदलत चालला आहे, ज्या प्रमाणे आपले राहणीमान, आहार, वेशभूषा बदलत जात आहे त्याच प्रमाणे ह्या ग्लोबल वातावरणात नातेसंबंध सुद्धा वेगळ्या रूपाने समोर येतील. त्यांना गुणदोषासकट स्वीकारणे हेच खरे. उगाच एखाद्या खाजगी विषयाला सामाजिक स्वरूप देवून एखाद्या व्यक्ती किव्हा कुटुंबाची जाहीर अवहेलना नको.
आपल्या समाजातील मुला-मुलीनी समाजातील व्यक्तीची जोडीदार म्हणून निवड करावी हि भावना आदर्श आहे. मुळात आंतर-जातीय विवाह हे सो कॉल्ड निरोप पाठवून केले जात नाही. म्हणजे कुपार्याच्या पोराने कोकणस्थ ब्राह्मण मुलीला मागणी घालून लग्न जमवणे वैगरे. आंतर-जातीय विवाह हे ९०% प्रेमविवाह आहेत. कॉलेज, ऑफिस, प्रवासाच्या जागा इथे ओळखी होऊन नंतर प्रेम होणे अन पुढे जाऊन त्याचे विवाहात रुपांतर होणे हा सर्वसाधारण अशा विवाहाचा साचा असतो. राहिलेले १०% मंडळी समाजात कुणी जोडीदार मिळत नसल्याने नाईलाजास्तव इतर जातीत विवाह करतात, पण हे प्रमाण तसे खूप कमीच...
इथे चर्चा करून आपण ह्या गोष्टी टाळू शकत नाही. कुणी, कुठे, कसे, प्रेम करेल ते आपल्या हातात नाही अन नसावं ही..... योग्य वेळी पालकांनी आपल्या वयात आलेल्या मुलांना आपला जोडीदार कसा असावा आणि त्यांच्या मुलाकडून काय अपेक्षा आहेत त्याची स्पष्ट जाणीव करून दिली तर अतिउत्तम....अन हो, जर कुणी प्रेमात पडून चांगल्या सुशिक्षित, सुसंकृत जोडीदाराची निवड केली असेल तर पालकांनीही मोठ्या मनाने त्यांना सामावून घ्याव. शेवटी सुखी जीवन जगणे महत्वाचे....फक्त कुपारी समाजात जगणे महत्वाचे नाही.....जर तस असलं असत, तर आपल्या समाजात सगळ्यांचेच संसार बहरले असते.
संस्कृतीमध्ये काळारूपाने बदल होत जाणे अपरिहार्य आहे. आपली कुपारी संस्कृती जतन झाली पाहिजे हे जरी मान्य केले तरी त्या मध्ये साचलेपण येणार नाही ह्याची सुद्धा काळजी आपण घ्यायला हवी. संस्कृती, मग ती कुठलीही असो, आसपासच्या अनेक संस्कृतीमधले रिवाज आपल्यात सामावून घेत पुढे जाते त्यामुळेच टिकते. संस्कृती बदलते पण नष्ट होत नाही. संस्कृती ही प्रवाही असली पाहिजे. अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करणे हा स्थायी भाव आहे. काळाच्या उदरात काय गडप होईल हे सांगता येत नाही. येणाऱ्या काळात व्यवहारात जी भाषा, पेहराव व चालीरीती जास्त वापरल्या जातील तीच संस्कृती बनणार आहे आणि टिकणार, हे मान्य करावयास हवे. कालाय तस्मै नम:
(हा लेख लिहिण्यासाठी इंटरनेटवरून अनेक लेखाचे संदर्भ घेतले आहेत.)