Tuesday, July 13, 2010

वसईतील राजकीय स्पर्धा जनतेच्या फायद्याची?







आजचे युग हे स्पर्धेचे युग म्हणून समजले जात आहे, ह्या स्पर्धेत जो तग धरतो व पुढे जातो त्यालाच ढोबळमानाने 'यशश्वी' असे संबोधले जाते. आजपर्यंत तरी निसर्गाने मानवाला विपुल साधन-संपत्तीचे वरदान दिलेले आहे परंतु दुसरीकडे मानवाने निसर्गाला यथेच्छा ओरबाडण्याचे कामही इमानेइतबारे केलेले आहे. निसर्गाचे देणे आणि मानवाची न संपणारी भूक ह्यामध्ये असणार्या तफावतीमुळे पृथ्वीतलावर असलेली साधनसंपत्ती मिळवण्याची स्पर्धा आज मनुष्य प्राण्यात सगळीकडेच दिसून येते. अशा प्रकारे स्पर्धा असणे चांगले कि वाईट ह्याबद्दल विचार वंता मध्ये मतभेद आहेत, काहींच्या मते स्पर्धेमुळे स्वार्थीवृत्ती वाढीस लागते ज्यामुळे सामजिक सौहार्द नष्ट होते तर काहींच्या मते स्पर्धेमुले नुकसानीपेक्षा लाभच अधिक आहेत.

निरोगी स्पर्धा ही चांगल्या कार्यक्षमतेची उगमस्थान आहे असे म्हटले जाते. ह्याचा प्रत्यय उत्पादनावर आधारित अर्थव्यवस्थेत पाहायला मिळतो. एकाच पद्धतीची उत्पादने किवा सेवा देणाऱ्या कंपन्यामध्ये असलेल्या स्पर्धेमुळे ग्राहकाला रास्त भावात, दर्जेदार उत्पादने किवा सेवा मिळत असल्याचे दिसून येते. उदाहरणादाखल मोबाइल सेवा देणाऱ्या कंपन्यातील चाललेल्या स्पर्धेमुळे दरात झालेली घट व ग्राहकाच्या तक्रारीला मिळणारा ताबडतोब प्रतिसाद ह्याचा अनुभव घेता येईल. दुसरीकडे स्पर्धा नसलेल्या क्षेत्रामध्ये एकाधिकारशाही वाढलेली दिसून येते ज्यामुळे ग्राहकाला चांगली उत्पादने किवा सेवा न मिळाल्याने नुकसान होते व त्याचे परिणाम समाजाची राहणीमान घसरण्यात होतो.




प्रस्तुत लेखाचा मूळ उद्देश सर्वसाधारण 'स्पर्धा' ह्या विषयावर चर्चा घडवून आणण्याचा नसून वसईतील सद्य राजकीय गटानाही स्पर्धेचे हेच नियम कसे लागू पडतात व त्याचा प्रत्यय कसा जाणवतो हे वाचकांच्या नजरेत आणणे हे आहे. वर म्हटल्याप्रमाणे स्पर्धेबाबतीत चांगले उदाहरण म्हणजे राजकारण, वसईतील ताज्या राजकारणाचे उदाहरण हे त्यादृष्टीने समर्पक ठरेल. गेली वीस वर्षे माजी आमदार हितेंद्र ठाकूर ह्यांच्या बहुजन विकास आघाडीची तालुक्यावर निरंकुश अशी सत्ता होती. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या जागा आघाडीकडे होत्या. कुणीच प्रतिस्पर्धी नसल्याने आपल्या जागा कुणी हिरावून घेवू शकत नाही व या पुढेही आमचीच एकाधिकारशाही राहील असे चित्र आघाडीमध्ये होते. अगोदर सांगितल्याप्रमाणे निरोगी स्पर्धा ही चांगल्या कार्यक्षमतेची उगमस्थान आहे. स्पर्धा नसल्यामुळेf आघाडीचा बेफिकीरपणा वाढला व त्यामुळे आघाडीत शिथिलता आली ज्याचे परिणाम कार्यक्षमतेत व पुढे पर्यवसन विकास कामे न होण्यात झाली. आघाडी हा तर्क मान्य करणार नाही परंतु जनांदोलन समितीच्या पर्यायामुळे व निर्माण झालेल्या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील मतदार जनांदोलन समितीकडे गेल्याचे वास्तव त्यांना मान्य करावेच लागेल. मागील दोन निवडणुकीचे आकडे त्याबाबत पुरावे ठरू शकतील।


माजी आमदार हितेंद्र ठाकूर ह्यांची बहुजन विकास आघाडी व आमदार विवेक पंडितांची जनांदोलन समिती ह्यात निर्माण झालेल्या स्पर्धेमुळे सामान्य वसईकरांचा फायदा होईल कि नुकसान होईल हे येणारा काळच ठरवील, तरीही सद्य स्थितीत वसईचा गड राखण्यासाठी बहुजन विकास आघाडीला तर आपले अस्तित्व शहरात वाढवण्यासाठी जनांदोलन समितीला ह्या स्पर्धेत रहावेच लागेल. नुकताच तालुकाभर दिसून आलेली बहुजन विकास आघाडीची 'पिवळी होर्डिग बाजी' ह्या स्पर्धेची सुरवात म्हणता येईल. त्याचप्रमाणे अपघात जागी सर्वप्रथम पोहचण्याची आणि आपल्या कार्यकर्त्यांना 'आदेश' देवून मदतकार्य वेळेवर सुरु करण्याची कालची बातमी ह्या सुरु झालेल्या स्पर्धेचे फलित म्हणता येईल. असो, त्यामुळे आम वसईकरांचे कामे होतात हे महत्वाचे. आगामी काळात सरकारी योजना राबवण्यासाठी, राबवलेल्या योजना प्रसिद्धी माध्यमाकडे पोहचवण्यासाठी व त्याद्वारे आपला जनाधार (मतदार) वाढवण्याची स्पर्धा आघाडी व समिती मध्ये दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी निकोप आणि निरोगी स्पर्धा वसईकरांच्या निकडीची व फायद्याची आहे ज्यामुळे नवा 'विकास' करण्यासाठी नाईलाजाने का होईना दोन्ही बाजूने प्रयत्न केले जातील. ही स्पर्धा जास्तीत जास्त निकोप,निरोगी व सकारात्मक ठेवणे हे दोन्ही गटाच्या हातात आहे. त्याचबरोबर ह्या स्पर्धेचे संघर्षात रुपांतर होवू नये ह्यासाठी समाजधुरीणांनी, प्रसिद्धी माध्यमांनी, सामाजिक संस्थांनी व सामान्य वसईकरांनी वेळोवेळी 'दबावगट' बनून कार्यरत राहणेही आवश्यक आहे. शेवटी राजकीय स्पर्धेचे पर्यवसन समाजाचे राहणीमान उंचावण्यात होणे हे महत्वाचे आहे, कोण स्पर्धेत जिंकतो ह्याचे जनतेला तसे काही देणे घेणे नाही.

जाता जाता हेच म्हणता येईल की विकासाची शिडी वरवर जाण्यासाठी व त्याचे फळ आम आदमीला मिळण्यासाठी 'एकाधिकारशाही' नष्ट होणे व वेगवेगळ्या गटा-तटात निकोप आणि निरोगी स्पर्धा चालू राहणे काळाची गरज आहे। जनतेने ह्या स्पर्धेकडे दुर्लक्ष न करता स्पर्धा निकोप व लोकाभिमुख होण्याकरिता जागृतपणे प्रयत्न केले पाहिजेत. आपली वसई सकारात्मक राजकीय स्पर्धेचा आदर्श घालून देईल अशी अशा बाळगूया.


सचिन मेंडिस