Thursday, January 22, 2015

एक दुर्दैवी शाळा


मुलगी वंशाचा दिवा होऊ शकत नाही का?

मुलगी वंशाचा दिवा होऊ शकत नाही का?

---------------------- सचिन मेंडिस

आपला समाज सुशिक्षित अन प्रगत समजला जातो तरीही अजूनही काही कुटुंबात मुलगा म्हणजे वंशाचा दिवा अशी मागास विचारसरणी मूळ धरून आहे. अजूनही काही कुटुंबात मुलगी जन्माला आल्यास मुलगा जन्माला आल्यापेक्षा कमी आनंदाचे वातावरण असते. अलीकडे माझ्या मित्राला जेव्हा दुसरी मुलगी झाली तेव्हा काही मंडळीनी 'असू दे, नाराज होऊ नको' असे म्हणून एकप्रकारे त्याचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा संतापून त्याने त्यांना सुनावले होते की 'तुमच्या घरी तुमच्या मुली जर तुम्हाला ओझे झाल्या असतील तर मला आणून द्या, मी त्यांना वाढवतो'. दुसरी गोष्ट म्हणजे चौकोनी कुटुंबाची रचना असलेल्या आपल्या समाजात २ मुली जन्माला आल्यावर काही लोकांनी आधुनिक पद्धतीने नव्या खेपेस १००% मुलगाच होणार, असे थोतांड मांडणाऱ्या डॉक्टरांचे पाय धरल्याची अनेक उदाहरणे आज आहेत. अपत्यांची संख्या हा एखाद्या कुटुंबाचा खाजगी विषय आहे अन त्यावर आक्षेप घेणे चुकीचे ठरेल, परंतु २ गोंडस अन निष्पाप मुलीच्या जन्माने समाधान न झालेल्या व फक्त पुत्रप्राप्तीसाठी धावपळ करणाऱ्या सुशिक्षित पालकांविषयी काय बोलावे? त्यांची कीव करावीशी वाटते. जर अशा पालकांना २ अपत्यापैकी एक मुलगा असला असता तर मुलगी हवी म्हणून तिसऱ्या अपत्याला जन्म दिला असता का? फक्त पुत्रप्राप्तीसाठी तिसरे अपत्य घेणारे पालक एकप्रकारे देवाने ज्या २ गोंडस मुली दिल्या आहेत, त्या देणगीचा अपमान करीत नाहीत काय?

आपल्या पुरोगामी समाजात अजूनही 'मुलगा हवा' म्हणून बऱ्याच कुटुंबात इच्छा नसताना सासू सासरे, आई वडील अन काही वेळेला नवरे मंडळी मुलींच्या आईवर नवे मातृत्व लादतात. आपल्या स्वातंत्र्याची गळचेपी होऊनही कुटुंबाच्या विरोधात जाण्याचे धाडस अशा महिला दाखवू शकत नाही. जिथे कुटुंबच विरोधात असते तिथे अशा महिलांना पाठींबा देण्यासाठी बाहेरचे कोण पुढे येणार? मग अशा महिलांना 'मुलगा झाला नाही तर?' ह्या विचारात ९ महिने गरोदरपण काढावे लागते. ह्यात तिला होणारया शारीरिक अन मानसिक वेदना 'मुलगा हवा' ह्या खोट्या अपेक्षेत कुटुंबाकडून दुर्लक्षित केल्या जातात. अन हे सर्व करून जर त्या महिलेला 'तिसरी मुलगी' झाली तर तिच्या अन त्या निष्पाप बालिकेच्या वाट्याला येणारी अवहेलना तर शब्दात मांडता न येणारी. 'वंशाला दिवे हवे' ह्या खोट्या हव्यासात अजूनही जगणार्यांनी आपल्या आजूबाजूला काही मुलांनी त्यांच्या पालकांच्या म्हातारपणात काय 'दिवे' लावले आहेत, हे जरा डोळे उघडून पाहावे. बरयाच कुटुंबात तर सासरी गेलेल्या मुलीचं आपल्या म्हाताऱ्या पालकांची सेवा करताना दिसतात. अशी उदाहरणे बोटावर मोजण्या इतकी जरूर असतील, पण त्यामुळे त्या महिलांची घुसमट लपवून ठेवायला हवी, असे नव्हे.काल एका महिलेची घुसमट परिचितांकडून कानावर आली म्हणून हा लेखप्रपंच. अजून बऱ्याच जणांची दु:खे 'वंशाच्या दिव्या' खाली गाढून गेलेली असतील.

जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी !!

जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी !!
----------------------------------------------
सचिन मेंडिस

आपल्या समाजात घात होऊन एखाद्या व्यक्तीचे जेव्हा अकाली निधन होते तेव्हा सगळा समाज शोकसागरात बुडून जातो. त्यात जर मृत झालेली व्यक्ती तरुण असेल किव्हा कुटुंबातील एकटी कमावती व्यक्ती असेल, तर फार हळहळ व्यक्त केली जाते. अशा व्यक्तीच्या अंत्ययात्रेला हजारोने लोक जमा होऊन त्या कुटुंबाना धीर देण्याचा प्रयत्न करतात अन सहानभूती व्यक्त करतात. जर ते दुर्दैवी कुटुंब अन त्यांचे नातेवाईक सधन असतील तर त्या कुटुंबाचे पुढे हाल होत नाहीत, परंतु जर त्या दुर्दैवी कुटुंबाची परिस्थिती बेताची असेल तर त्यांचे पुढील आयुष्य अंधकारमय होते. मग एक समाज म्हणून अशा अभागी कुटुंबाकरिता व्यक्त केलेली एक दिवसाची सहानभूती बेगडी ठरते. आपली हळहळ अन ढाळलेले अश्रू काळाच्या ओघात सुकून जातात. अशी दुर्दैवी कुटुंबे लोकाच्या लाजेखातर मदतीसाठी हात पुढे करीत नाहीत अन अनेकदा त्या कुटुंबातील मुलांची शिक्षणे पूर्ण होत नाहीत. पुढे अशी कुटुंबे आर्थिक चक्रव्युहात अशी सापडली जातात कि अनेक पिढ्या त्या शापातून वर येत नाहीत. समाज म्हणून आपणही आपल्या व्यापात इतके व्यस्त अन धावत असतो, की अशा दुर्दैवी कुटुंबाचे प्राक्तन आपल्या कानापर्यंत पोहचत नाही. मागच्या वर्षी अशाच एक कुटुंबाचा अनुभव मी इथे कथन केला होता. पैशाअभावी कॉलेज सोडण्याच्या तयारीत असलेल्या एका अनाथ मुलीची व्यथा मी SVS कडे मांडली होती. सुदैवाने आपल्या सर्वांनी मदतीचा हात देऊन त्या कुटुंबाला आधार दिला अन त्या मुलीचे शिक्षण पूर्ण करण्यात आपल्याला यश आले.

ह्या विषयाच्या अनुषंगाने मला इथे एक उदारहण द्यायला आवडेल. काही वर्षापूर्वी मी एका मोठ्या फार्मा कंपनीत नोकरीला होता. दुर्दैवाने आमच्या डिविजनमधील एका कनिष्ट स्थरावरील तरुण सहकाऱ्याचा हार्ट फेल झाल्याने मृत्यू ओढवला. दुसऱ्या दिवशी आमच्या डिविजनमधील वरिष्ठ अधिकाऱ्या सोबत मला त्या मृत सहकाऱ्याच्या घरी जाण्याचा योग आला. एका छोट्याशा खोलीत विधवा आई, अशिक्षित पत्नी अन २ लहान मुले असा त्यांचा संसार होता. आमच्या डिविजनमधील सर्वांनी त्या अभागी कुटुंबियांची भेट घेऊन शोक व्यक्त केला अन काही वेळाने आम्ही त्यांच्या खोलीच्या बाहेर पडलो. त्या अभागी कुटुंबियांची परिस्थिती पाहून मी अस्वस्थ झालो होतो. एक दिवसाच्या सहानभूतीपलीकडे त्या अनाथ मुलांची गरज होती, जी पूर्ण होणे गरजेचे होते. मी आमच्या डिविजनच्या हेडला विचारले 'पुढे काय', आपली जबाबदारी संपली का? आपण ह्यांना वाऱ्यावर सोडायचे काय? एक सहकारी म्हणून आपल्याला कोरड्या सहानभूतीपलीकडे त्यांच्यासाठी काहीतरी करावे लागेल, आपण एक दिवसाचा पगार तरी त्यांना द्यायला हवा'. मी सगळ एका दमात त्यांच्यासमोर बोलून टाकलं. मग आमच्या डिविजनच्या हेडने पुढाकार घेऊन HR मार्फत त्या कुटुंबासाठी एक दिवसाचा पगार स्वेच्छेने देण्याचे आवाहन केले अन सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला. २-३ वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांनी तर पूर्ण महिन्याचा पगार दिल्याचे मला कळाले. एक महिन्या नंतर जमा झालेल्या मदतीचा आकडा ऐकून मी अचंबित झालो. सुमारे ३२ लाख रुपये मदत गोळा झाली होती. आमच्या कंपनीने तो निधी एकदाच त्या कुटुंबाकडे न देता HR कडे ठेऊन घेतला अन त्या मृत व्यक्तीचा महिन्याचा पगार त्या कुटुंबाकडे पोहचण्याची व्यवस्था केली. त्याचप्रमाणे मुलांच्या शाळेची फी परस्पर शाळेत भरण्याची जबाबदारी HR Manager कडे सोपवली. एका छोट्या पुढाकाराने एक कुटुंब आर्थिक विवंचनेच्या शापातून बाहेर पडलं होत. मला मिळालेले समाधान तर अनमोल होते, जे आजही कित्येक वर्षांनी मी अनुभवत आहे.

आज समाज म्हणून आपण फुलं न फुलाची पाकळी एकटी कमावती व्यक्ती मृत पावलेल्या कुटुंबाना मदत केली, तर ज्या मृत व्यक्तीच्या अकाली निधनाने आपण जी हळहळ व्यक्त केली असेल, तर त्यांना आपली ती खरी श्रद्धांजली ठरेल. ही मदत फक्त आर्थिक असावी असे नाही. कुटुंबातील कुणाला आपण नोकरीसाठी/व्यवसायासाठी जरी मदत केली तरीही खूप फरक पडू शकतो. फक्त त्यासाठी आपल्याला आपल्या गाव परिसराचा कानोसा घ्यावा लागेल. व्यक्तीच्या अकाली निधनानंतर अंत्यदर्शनासाठी होणारी गर्दी जेव्हा त्या अभागी कुटुंबाच्या मदतीसाठी तितक्याच गर्दीने पुढे येईल, तेव्हा आपल्या अश्रुची खरी फुले झालेली असतील. आपला समाज भावनिक आहे. अभागी अन दुर्दैवी कुटुंबियांच्या मदतीकरिता तो नेहमीच तयार असतो. गरज आहे ती आपल्या सर्वांच्या पुढाकाराची. मदतीचे हात दुर्दैवी कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी.

(विमा टर्म पॉलिसीबाबतीत आपल्या समाजात पाहिजे तितकी जागरूकता आलेली नाही, कुटुंबातील कमावत्या व्यक्तींनी अशी टर्म पॉलिसी घेतल्यास समाजाच्या पुढे न येणारे बरेच प्रश्न सुटू शकतील, असे मला वाटते.)

सचिन मेंडिस

कुपारी इतिहासातील भुते !!

कुपारी इतिहासातील भुते !!

का कुणास ठाऊक पण 'भूत' ह्या विषयावर ऐकण्यात व बोलण्यात खूप उत्सुकता अन मजा वाटते. त्यातल्या त्यात आपल्या गावातील भूतकथेमध्ये 'धोतीन' अन 'हेड्लन' हि दोन महत्वाची पात्रे ऐकण्यात आली आहेत. 'हेड्लन' विषयी मी माझ्या आजीकडून बरंच ऐकून होतो. वाडीतल्या बावखालावर असलेल्या चिंचेच्या झाडावर ती रात्री बसलेली असायची, असे आजी सांगत असे. तिचे वर्णन पण किती भयानक. सफेद रंग, केस मोकळे सोडलेले अन उलटे पाय. आजी म्हण्यायची कि रात्री हेड्लन हातातल्या बांगड्या वाजवत असे व विचित्र हसत असे. चुकून कुणी रात्री वाडीत गेले अन तिच्या तावडीत सापडले तर ती त्यांच्या मानगुटीवर बसून अख्खी रात्र त्याला वाडीत पिटाळत असे. पुढे शाळेत गेल्यावर 'हडळ' ही आजीने सांगितलेल्या 'हेड्लन'च मराठीय रूप असल्याचं लक्षात आलं. हिंदी चित्रपटात कमी कपड्यात नाचणारी 'हेलन' ही अभिनेत्री नाम साधर्म्या मुळे हेड्लनची नातेवाईक असावी असा लहानपणी माझा गैरसमज होता, तो नंतर दूर झाला.

भूतकथेमधील पुरुषी पात्र म्हणजे 'धोतीन'. आजीने वर्णन केल्याप्रमाणे उंचपुरे, सफेद कपडे परिधान केलेले 'धोतीन' रात्री घोड्यावरून गावात फिरत असतं. रात्री अपरात्री गावात कुणी रस्त्यावर आढळल्यास ते त्यांची मानगूट पकडून खेचून नेत असतं. मग अशी गावातून गायब झालेली व्यक्ती आजूबाजूच्या गावात कुठेतरी पेंढ्याच्या भारयात पडलेली सापडत असे. असेही म्हणतात कि 'धोतीन' मंडळी आपल्या हातात असलेल्या चाबकाने पाठीवर त्याला फटके देत असे. काही लोकांच्या म्हणण्यानुसार 'धोतीन' हे दुसरे तिसरे कुणी नसून त्या काळी रात्री गस्त घालणारे इंग्रज अधिकारी होते. अपरात्री दारू पिऊन रस्त्यात जोराने गाणी गाणाऱ्या आपल्या पूर्वजांना ते उचलून फटके देत असतं. खरे काय ते त्यांनाच माहित.

आम्ही लहान असताना धाक म्हणून वडीलधारी मंडळी अमूक ठिकाणी हेड्लन 'उतरते' असे सांगत असतं. ह्यात 'उतरणे' ह्या शब्दाचा मला कळलेला अर्थ म्हणजे 'अदृश्य स्वरूपातून दृश्य स्वरूपात येणे'. लहानपणी काही टवाळखोर मुले अमुक ठिकाणी आम्ही झाडावर हेड्लन पाहिली असे खोटे दावे करून भूतकथेत 'हेड्लन' रंगवत असतं. तिच्या बांगड्याचा 'छान छान' आवाज, सफेद मोकळे केस अन बाहेर आलेली जीभ असे वर्णन ऐकून छोट्या मुलांची बोबडी वळत असे. विशेष म्हणजे भूत विषयात भीती असूनही भूतकथा ऐकण्यात सगळ्यांना रुची असायची. मग कधी ओट्यावर बसून गोष्टी ऐकताना कुणी वात्रट मुलगा 'हेड्लन आली हेड्लन आली' असे ओरडून घरात पळत असे अन मग जी धावपळ उडायची ती शब्दात मांडणे कठीण. आधुनिक काळात अशा गोष्टी कुणी मानत नाही अन मानूही नये. फक्त नवीन पिढीला ह्याची माहिती व्हावी म्हणून ह्या चार ओळी.

मूर्तीपूजा करू नकोस !!

मूर्तीपूजा करू नकोस !!
-------------------------------- सचिन मेंडिस

काल फेसबुक चाळत असताना आदरणीय फादर Francis D'Britto ह्यांची खालील पोस्ट वाचनात आली.

"समाजात मूर्तीपूजा वाढत चालली आहे का? जो उठतो तो स्व:ताचे, आपल्या बायकोचे फोटो पोस्ट करीत आहे. काही फोटो इतके रोमांटिक असतात कि ते केवळ दोघांच्याच नजरेसाठी असतात. तुम्हाला काय वाटते?"

फादरांनी इथे २ मुद्दे उपस्थित केलेले आहेत.

१) समाजात मूर्तीपूजा वाढत चालली आहे का? जो उठतो तो स्वताचे, आपल्या बायकोचे फोटो पोस्ट करीत आहे.

२) काही फोटो इतके रोमांटिक असतात, कि ते केवळ दोघांच्याच नजरेसाठी असतात.

ह्यातील दुसऱ्या मुद्द्यावर आक्षेप घेता येऊ शकतो तरीही 'रोमांटिक' हि संकल्पना हि व्यक्तीसापेक्ष असल्याने प्रत्येकाच्या नजरेतून त्याची व्याख्या अन भावार्थ हे वेगळे असू शकतात. 'रोमांटिक' अन 'अश्लील' ह्यात अस्पष्टता जरी असली तरी मुलभूत फरक नक्कीच आहे. फेसबुकवर काही अपवाद वगळले तर फोटो अपलोड करणाऱ्या व्यक्ती ते तारतम्य पाळतात, असे मला वाटते. बाकी फेक अकौंटवरून पोस्ट होत असलेल्या वादग्रस्त फोटोवर चर्चा करणे अयोग्य ठरेल.

आता सविस्तरपणे पहिल्या मुद्द्याविषयी,

समाजात मूर्तीपूजा वाढत चालली आहे का? हा प्रश्न खरे तर धर्मगुरुकडून अपेक्षित नव्हता. खरतरं समाजात फार पूर्वीपासून मूर्तीपूजा चालत आलेली असून धर्मव्यवस्थेने अप्रत्यक्षपणे ह्या मूर्तीपूजेला व्यासपीठ अन धार्मिक अधिष्टान प्राप्त करून दिले आहे. आजपर्यंत चर्च व्यवस्थेत कोणत्याही धर्मगुरूंनी पुढाकार घेऊन 'मूर्तीपूजा' म्हणजे काय? आणि 'एकाच देवाला भज, मूर्तीपूजा करू नकोस' ह्या पहिल्या आज्ञेतील परमेश्वराला 'नको असलेली' मूर्तीपूजा कोणती ह्याचा स्पष्ट उल्लेख अन निराकरण केलेले नाही. आज प्रत्येक धर्मात 'मूर्तीपूजा' हा आराधनेचा मुख्य पाया बनलेला आहे अन दुर्दैवाने ज्या ख्रिस्ती श्रद्धेत परमोच्च असलेल्या दहा आज्ञेत 'मूर्तीपूजा करू नकोस' असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे, त्या चर्च व्यवस्थेत सुद्धा उघडपणे मूर्तीपूजा केली जाते अन ती थांबविण्याऐवजी मूर्तीभोवती गर्दी जमविण्यासाठी कार्यक्रम आखले जातात.

दुसरा मुद्दा म्हणजे फादरांनी चर्चेत घेतलेली फेसबुकवरील 'फोटो अपलोड मूर्तीपूजा'. मुळात फेसबुक हे मुक्त व्यासपीठ आहे. आपल्या जीवनात घडणारया गोष्टी लोकांना सांगणे अन दुसरयांच्या आयुष्यात काय चालले आहे ह्यांचा कानोसा घेणे हा फेसबुकच्या यशाचा फोर्मूला आहे. दुसऱ्याच्या खाजगी जीवनाबद्दल असलेली कुतुहुलता अन आपली 'सुवार्ता' लोकांपार्यात पोहचवून त्यातून मिरवण्याची हौस हे मानवी स्वभावाचे भाग आहेत. वरकरणी हे सर्व प्रकार उथळ जरी वाटत असले, तरी बदलत्या परिस्थितीत अप्रत्यक्षपणे हे सोशल जीवनाचे भाग बनले आहेत. आज देशविदेशातील अनेक विद्वान, बुद्धिमान, पुरस्कारविजेत्या मोठ्या महनीय व्यक्तीनी 'सोशल मिडिया'ला आपले केले आहे. लोकांनी निवडून दिलेले लोकशाही सरकार देखील ह्या बाबतीत मागे नाही.

फादर फ्रान्सीस दिब्रिटो ह्यांच्या पोस्टला प्रतिक्रिया देताना अनेक व्यक्तींनी 'सुवार्ता' मासिकाचा उल्लेख केलेला आहे. अनेकांच्या मते आज सुवार्ताचा आर्थिक कणा हा ह्या मासिकामध्ये ५०% पानात छापल्या जाणारया जाहिरातीवर अवलंबून आहे. ज्यातील बहुतेक पाने ही फोटोंनी भरलेली असतात. स्पष्ट सांगितले तर फोटो जाहिरात देऊन आपले सुख अन दुक्ख जगाला सांगण्याचा फेसबुकी प्रकार सुवार्ताद्वारे आज अनेक वर्ष चालू आहे. 'सुवार्ता'सारख्या दर्जेद्दार मासिकात ५०% पाने जाहिरातीसाठी देणे हा खरे तर चर्चेचा स्वतंत्र विषय आहे पण फादरांनी मांडलेल्या मुद्द्याला सुवार्ता मासिक अगदी जवळून निगडीत असल्याने त्याचा उल्लेख टाळणे, हे सुवार्तावर अन्याय केल्यासारखे होईल. मागच्या महिन्यात सकाळ ह्या वृत्तपत्रात वसईतील लेखक स्टॅन्ली गोन्साल्वीस ह्यांनी जुने गोवे येथे पार पडलेल्या सेंट फ्रान्सिस झेवियर ह्यांच्या शवदर्शनावर 'शवदर्शन कि प्रदर्शन' असा ख्रिस्ती धार्मिक व्यवस्थेला प्रश्न विचारणारा व शवदर्शन कसे चुकीचे व मूर्तीपूजेला प्रोत्साहन देणारे आहे, असा उहापोह करणारा लेख लिहला होता. त्यावर विरोधी प्रतिक्रिया उमटल्याचे ऐकिवात नाही.

अलीकडे 'पिके' सारख्या चित्रपटाने 'मूर्तीपूजा' ह्या विषयावर मार्मिक भाष्य करून भोळ्या भाबड्या लोकांच्या श्रद्धेला हात घालून आर्थिक प्राप्ती करणाऱ्या धार्मिक व्यवस्थेवर ताशेरे ओढले होते. लोकांनाही हा विषय भावल्याने त्याला प्रचंड प्रतिसाद दिला होता. आज खरे पाहिले तर धर्मव्यवस्थेतून मूर्तीपूजा दूर करून लोकांना 'धर्मशास्त्रातून नितीशास्त्राकडे' नेण्याची गरज आहे. आजच्या युगात मोठी महागडी मंदिरे, देवांच्या मुर्त्यांची स्थापना, मूर्त्यांना नैवद्य, देवांची मिरवणूक, मूर्त्यांच्या दर्शनासाठी २४ तास रांगा व रांगेतून मुक्तीसाठी वशिलेबाजी ह्या सर्व भौतिक पुजेअर्चेवर मुक्तपणे चर्चा घडवून आणण्याची गरज आहे. 'पिके'च्या निम्मिताने ती जरी घराघरात सुरु झाली असली तरी ती चित्रपटापुरता सीमित न राहता 'विषयावर' झाली पाहिजे. आजकाल प्रवाहाविरुद्ध लिहिणे अन तेही धार्मिक विषयावर लिहिणे हे 'धर्माविरुद्ध' समजले जाते. सहसा अशा विचाराला जाहीरपणे समर्थन करण्याच्या फंदात कुणी पडत नाही. अशा विषयावरचे विचार मनात दाबून ठेवून घुसमट वाढवण्यापेक्षा व्यक्त केले तर हलके वाटते. फादरांच्या पोस्टने ही संधी दिली म्हणून बरे वाटले, त्यांनी माडलेली चर्चा थोडी पुढे नेऊन नव्या पिढीचे मुर्तीपुजेबद्दल असलेले एकूणच मत चर्चेत घेण्याचा हा एक प्रयत्न आहे.