Thursday, January 22, 2015

मुलगी वंशाचा दिवा होऊ शकत नाही का?

मुलगी वंशाचा दिवा होऊ शकत नाही का?

---------------------- सचिन मेंडिस

आपला समाज सुशिक्षित अन प्रगत समजला जातो तरीही अजूनही काही कुटुंबात मुलगा म्हणजे वंशाचा दिवा अशी मागास विचारसरणी मूळ धरून आहे. अजूनही काही कुटुंबात मुलगी जन्माला आल्यास मुलगा जन्माला आल्यापेक्षा कमी आनंदाचे वातावरण असते. अलीकडे माझ्या मित्राला जेव्हा दुसरी मुलगी झाली तेव्हा काही मंडळीनी 'असू दे, नाराज होऊ नको' असे म्हणून एकप्रकारे त्याचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा संतापून त्याने त्यांना सुनावले होते की 'तुमच्या घरी तुमच्या मुली जर तुम्हाला ओझे झाल्या असतील तर मला आणून द्या, मी त्यांना वाढवतो'. दुसरी गोष्ट म्हणजे चौकोनी कुटुंबाची रचना असलेल्या आपल्या समाजात २ मुली जन्माला आल्यावर काही लोकांनी आधुनिक पद्धतीने नव्या खेपेस १००% मुलगाच होणार, असे थोतांड मांडणाऱ्या डॉक्टरांचे पाय धरल्याची अनेक उदाहरणे आज आहेत. अपत्यांची संख्या हा एखाद्या कुटुंबाचा खाजगी विषय आहे अन त्यावर आक्षेप घेणे चुकीचे ठरेल, परंतु २ गोंडस अन निष्पाप मुलीच्या जन्माने समाधान न झालेल्या व फक्त पुत्रप्राप्तीसाठी धावपळ करणाऱ्या सुशिक्षित पालकांविषयी काय बोलावे? त्यांची कीव करावीशी वाटते. जर अशा पालकांना २ अपत्यापैकी एक मुलगा असला असता तर मुलगी हवी म्हणून तिसऱ्या अपत्याला जन्म दिला असता का? फक्त पुत्रप्राप्तीसाठी तिसरे अपत्य घेणारे पालक एकप्रकारे देवाने ज्या २ गोंडस मुली दिल्या आहेत, त्या देणगीचा अपमान करीत नाहीत काय?

आपल्या पुरोगामी समाजात अजूनही 'मुलगा हवा' म्हणून बऱ्याच कुटुंबात इच्छा नसताना सासू सासरे, आई वडील अन काही वेळेला नवरे मंडळी मुलींच्या आईवर नवे मातृत्व लादतात. आपल्या स्वातंत्र्याची गळचेपी होऊनही कुटुंबाच्या विरोधात जाण्याचे धाडस अशा महिला दाखवू शकत नाही. जिथे कुटुंबच विरोधात असते तिथे अशा महिलांना पाठींबा देण्यासाठी बाहेरचे कोण पुढे येणार? मग अशा महिलांना 'मुलगा झाला नाही तर?' ह्या विचारात ९ महिने गरोदरपण काढावे लागते. ह्यात तिला होणारया शारीरिक अन मानसिक वेदना 'मुलगा हवा' ह्या खोट्या अपेक्षेत कुटुंबाकडून दुर्लक्षित केल्या जातात. अन हे सर्व करून जर त्या महिलेला 'तिसरी मुलगी' झाली तर तिच्या अन त्या निष्पाप बालिकेच्या वाट्याला येणारी अवहेलना तर शब्दात मांडता न येणारी. 'वंशाला दिवे हवे' ह्या खोट्या हव्यासात अजूनही जगणार्यांनी आपल्या आजूबाजूला काही मुलांनी त्यांच्या पालकांच्या म्हातारपणात काय 'दिवे' लावले आहेत, हे जरा डोळे उघडून पाहावे. बरयाच कुटुंबात तर सासरी गेलेल्या मुलीचं आपल्या म्हाताऱ्या पालकांची सेवा करताना दिसतात. अशी उदाहरणे बोटावर मोजण्या इतकी जरूर असतील, पण त्यामुळे त्या महिलांची घुसमट लपवून ठेवायला हवी, असे नव्हे.काल एका महिलेची घुसमट परिचितांकडून कानावर आली म्हणून हा लेखप्रपंच. अजून बऱ्याच जणांची दु:खे 'वंशाच्या दिव्या' खाली गाढून गेलेली असतील.

No comments: