दूरचित्रवाणीवरील जंगली प्राण्यांचा कार्यक्रम बघत होतो. कुठल्या तरी जंगलात हरीणांचा कळप नदीकिनारी पाणी पिण्यासाठी जमला होता, अचानक झुडुपात दबा धरून बसलेल्या वाघाने कळपावर हल्ला चढवला आणि सगळी हरिणे जीव वाचवण्यासाठी सैरा-वैरा पळू लागली. एका हरिणाच्या पिल्लाचा वाघाने शेवटपर्यंत पाठलाग सोडला नाही, आणि शेवटी थकलेले ते पिल्लू शिकारी वाघाच्या तावडीत सापडले आणि प्राण गमावून बसले. हरिणाच्या पिल्लाचे प्राण वाचावे असे मनापासून वाटत होते परंतु नियतीला किंबहुना निसर्गशास्त्राला ते मान्य नसावे हेच खरे. मन विचार करू लागले की वाघाने पाप केले का? त्या गरीब बिचाऱ्या पिल्लाचा जीव घेण्याचा वाघाला काय अधिकार? वाघाने आपल्या उदरनिर्वाहासाठी दुसरा अहिंसक पर्याय का शोधू नये? वाघाची नीती चांगली की वाईट?. माझ्या मनानेच मला उत्तर दिले की नक्कीच निसर्गशास्त्र हे नीतीशास्त्रा पेक्षा श्रेष्ठ असावे. वाघाच्या नीतीपेक्षा उदरनिर्वाहासाठी निसर्गाने त्याला हरणापेक्षा दिलेल्या नैसर्गिक क्षमतेचे ते उदाहरण होते.
निसर्गशास्त्र नीतीशास्त्रा पेक्षा श्रेष्ठ हे ठरवताना मला डार्विनचा उत्क्रांतिवादाचा सिद्धांत आठवतो, या सिद्धांताचा सर्वसाधारण गोषवारा असा की "प्राणीजगतात वंशसातत्याची सहजप्रवृत्ती असते. नैसर्गिक परिस्थितीतील बदलांना तोंड देऊन जे जगू शकतात, त्यांनाच वंशसातत्य टिकवता येतं. अशा बदलांना तोंड देऊन वंश चालवू शकणारे हेच खरे जगण्यायोग्य सजीव". खरोखर उत्क्रांतिवादाचा सिद्धांत इथेही लागू पडत आहे, हरिणांना जगण्यासाठी किंबहुना वंशसातत्य टिकवता येण्यासाठी वाघांना तोंड देवू शकेल अशी क्षमता निर्माण करणे गरजेचे आहे ज्याबाबतीत ते कमी पडले आहेत. थोडक्यात माझ्या आकलनाप्रमाणे निसर्गशास्त्र म्हणजे 'जे प्रचलित परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतात ते जगतात, जे जुळवून घेऊ शकत नाहीत ते नष्ट होतात किव्हा मरत-मरत जगतात'. हरीण कमजोर होते, त्याची ताकत वाघापुढे चालू शकली नाही हेच वास्तव होते. तेथे नीती-अनीतीचा प्रश्नच न्हवता. हरिणाला जर वाघाचा सामना करून जिवंत राहायचे असेल तर किमान वाघाच्या नैसर्गिक क्षमतेच्या एक पाऊल पुढे राहावे लागेल हे निसर्गाला अभिप्रेत असावे आणि तीच आजच्या दुनियेची रीत आहे.
पशु-पक्ष्यांना लागू असणारे वरील सर्व निसर्ग नियम सर्वश्रेष्ठ अशा मानव प्राण्यालाही तंतोतंत लागू पडतात हे आज दिसून येते. प्रत्येक दिवशी पावलो-पावली निसर्गशास्त्र हे नितीशास्त्रा पेक्षा श्रेष्ठ आहे ह्याची परिणीती होत आहे. 'ज्याची लाठी त्याची मैह्स' हे निसर्गालाच अभिप्रेत असावे आणि फक्त चांगला समाज बनवण्यासाठी धर्मपंडितांनी आणि समाजधुरीणांनी नितीशास्त्राची निर्मिती केली असावी, असे आज ज्या पद्धतीने देश आणि समाज चालला किंबहुना चालविला जात आहे त्यावरून मला वाटते. आज देशात गुंड मंडळी, भ्रष्ट लोकप्रतिनिधी, लबाड सरकारी अधिकारी जनतेला नाडून अनीतीने अमाप पैसा कमवत आहेत, तेव्हा वाटते की देव ह्या मंडळीला ह्याच जन्मात अद्दल का घडवत नाही?. का अशा मंडळीला त्यांच्या पापाची शिक्षा होत? . नीतीने वागणारा गरीब बिचारा माणूस आज साध्या तापाने उपचाराविना मरतो तर दुसरी ठिकाणी मोठे दुर्धर आजार झालेली ही भ्रष्ट मंडळी आपल्या पैशाच्या व sattechya ताकदीने परदेशात महागडे उपचार घेवून दिर्घायुशी होतात हे आपण पाहतच आहोत. कमी ताकदीचा गरीब माणूस प्रचलित परिस्थितीशी जुळवून घेण्यात कमी पडल्याने ह्या दुनियेत राहू शकत नाही तर ह्याच दुनियेत पैसेवाला सत्ताधारी माणूस परिस्थितीला आपल्या काबूत ठेवू शकतो आणि अनीतीने राहू शकतो हेच वास्तव नाही का?.
मला हरीण वाघाची कथा मानव जातीसाठी समर्पक वाटते. सामान्य माणूसरुपी हरीण आज ह्या सत्ताधारी वाघांपुढे हतबल झालेला दिसतो, तो व्यवस्थेशी लढायचा प्रयत्न करतो पण त्याचे प्रयत्न तोकडे पडतात. निसर्ग त्याला साथ देत नाही असे नाही, परंतु व्यवस्थेशी लढण्यासाठी हवी असलेली संघटीत क्षमता उभारण्यास तो कमी पडतो. जे प्रचलित परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतात, लढू शकतात, ते जगतात, जे जुळवून घेऊ शकत नाहीत ते नष्ट होतात किव्हा मागे पडतात हे आजचे वास्तव आहे. त्यामुळेच आज सर्वच जनतेला हे कळूच चुकले आहे की ताकदवर माणसाच्या संपर्कात राहिल्यावर आपली ताकद वाढते आणि आपल्याला सामजिक सुरक्षितता व फायदे मिळतात आणि म्हणूनच कितीही धर्माचे व तत्वाचे ढोल पिटले तरीही लोकांचा राबता नीती-तत्वे पायाखाली घालणाऱ्या सत्ताधारी मंडळीकडेच दिसून येतो. जी मंडळी नीतीवर विश्वास ठेवतात त्यांना अजूनही वाटते की वाईट प्रवृत्तीच्या माणसाला त्याच्या पापांचा हिशोब ह्याच दुनियेत द्यावा लागेल मग ते कितीही ताकदवर होवो.
असो, हे असेच चालायचे. आपण वाट बघूया की असाही दिवस येईल जेव्हा हरिणाची शिकार केलेला वाघ आपल्या पापामुळे तडफडून मरून जाईल आणि सगळी हरणे आनंद साजरा करतील. तूर्तास निसर्गशास्त्र हे नीतीशास्त्रा पेक्षा श्रेष्ठ असल्याने हरणास जगण्यासाठी पळावेच लागेल.
सचिन मेंडिस