Saturday, July 10, 2010

आठवण

आजकालचे जीवन खूप धावपळीचे-दगदगीचे बनले आहे. कुणाकडे कुणासाठी वेळ नाही. जिथे जिवंत असलेल्या लोकांच्या भेटीगाठी होत नाहीत तिथे परलोकी गेलेल्यांचे स्मरण होणे ही फार अवघड गोष्ट आहे. ज्या कोणाच्या कुटुंबातील व्यक्ती, जवळचे नातेवाईक, मित्र आणि इतर प्रिय व्यक्ती मृत झालेल्या असतील ते सर्वच जन याला अपवाद असू शकतील परंतु आपल्या नात्याच्या परिघाबाहेर असलेल्या आणि कधीकाळी सानिध्यात आलेल्या मृत लोकांची आठवण होणे तसे दुरापास्तच.

मागच्या महिन्याची घटना. महापालिकेच्या निवडणुकीच्या मतदानाचा दिवस. मतदानाच्या 'स्लीप' वाटण्यासाठी आमच्या वार्डामधील मतदार यादी चाळत बसलो होतो. बघता बघता एका नावाकडे सहज लक्ष गेले, 'मायकल लोपीस' हे ते नाव अन क्षणार्धात मन भूतकाळात गेले. मायकल काकांना गेल्याला दोन-तीन वर्षे झाली होती. मी माझ्याच मनाला प्रश्न केला, मागच्या दोन-तीन वर्षात कितीदा मी त्यांची आठवण काढली. माझ्या मनाने दिलेलं उत्तर मलाच त्रासदायक झालं. मला अपराध्यासारखे वाटू लागले. मी त्यांच्या नावावर फुली मारून मतदार यादीतील पुढील नावे वाचू लागलो. काही पाने उलटल्यावर मी माझ्या आजोबाच्या नावाजवळ येवून थांबलो. दोन महिन्यागोदर ते देवाघरी गेले होते. त्यांच्या आठवणीने माझे डोळे पाणावले. डोळ्यातील अश्रू रुमालाने टिपत मी त्यांच्या आठवणीना उजाळा दिला, त्यांच्याही नावावर फुली मारून मी पुढे चाळत राहिलो. परिसरातील अनेक मृत स्त्री-पुरुषांची नावे डोळ्यासमोर आली अन प्रत्येकाचे स्मरण झाले. त्यांच्याबरोबर घालवलेल्या काही महत्वाच्या प्रसंगाची आठवण आली. का कुणास ठाऊक वाटले की ही मतदारयादी आज हातात नसती तर ह्या सर्व मृत लोकांचे स्मरण झाले असते का? नक्कीच नाही. ते आठवणीच्या पडद्याआड कायमचेच गेले असते।


मी आता मनाशी ठरवलंय, कधी एकांतात, कधी प्रवास करीत असताना तर कधी मोबाईलवर गाणी ऐकत असताना थोडा वेळ का होईना आपल्या गावातील, आजूबाजूच्या परिसरातील व ऑफिसमधील ओळखीच्या मृत व्यक्तीची आठवण करायची, त्यांच्याबरोबर घालवलेल्या काही महत्वाच्या प्रसंगाला उजाळा द्यायचा अन जमलंच तर थोडी त्यांच्यासाठी व त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करायची. अन्यथा मतदार यादीत फुली मारून "कायमचे बाद" केल्यासारखे तेही कायमचे आपल्या जीवनातून बाद होवून जातील. चला तुम्हीही प्रयत्न करून बघा. किती मन हलक होईल तुमचं. जिवंत माणसाची आठवण कधी कधी त्रासदायक होते पण मला आशा आहे अशा जवळच्या मृत व्यक्तीची आठवण मन जिवंत करील.

सचिन मेंडिस
वसई.