Sunday, July 7, 2013

एक 'बाई' निघून जाते...

एक 'बाई' निघून जाते तेव्हा एक 'आई' निघून जाते…
रोज सायंकाळी गाणारी एक 'अंगाई' निघून जाते…

तिची रडणारी इवलीशी लेकरे काळीज फाडून टाकतात…
देव बाप्पाकडे न येणारी आई परत मागतात…

'तो' उभा असतो सुन्न…
तिच्या निपचित देहाकडे पाहत…
क्षणभरात कित्येक आठवणींना चाळत… 
त्या दुर्दैवी संसाराची 'सावली' निघून जाते… 

एक 'बाई' निघून जाते तेव्हा एक 'आई' निघून जाते…
रोज सायंकाळी गाणारी एक 'अंगाई' निघून जाते…

तिच्या शोकाकुल आईचा आकांत…
घुमत असतो आसमंतात…
आणि खिन्न बापाचा हुंदका अडकून असतो श्वासात…
आपल्या तरुण लेकीचे शव त्यांना जिवंतपणी निर्जीव करते

एक 'बाई' निघून जाते तेव्हा एक 'आई' निघून जाते…
रोज सायंकाळी गाणारी एक 'अंगाई' निघून जाते…

घर होत सुन….
सुन होतं मन…
डोळ्यात अश्रूंची साठवण ….
अन हृदयात न पुसणारी आठवण….

एक 'बाई' निघून जाते तेव्हा एक 'आई' निघून जाते
रोज सायंकाळी गाणारी एक 'अंगाई' निघून जाते

पुन्हा होईल पहाट…
सुरु राहील जगरहाट…
पण एक घर, एक दार…
तिची आतुरतेने पाहील वाट… 

एक बाई…
एक आई ….
एक अंगाई…
येईल का परतुनि….?
सचिन मेंडीस