Wednesday, August 12, 2015

फुलराणी !!

फुलराणी !!
---------------------------- सचिन मेंडिस

बयची खित आली कि मन उदास होते. तिच्या मायेच्या स्पर्शासाठी जीव कासावीस होतो. कित्येक दिवसात बयची भेट झाली नव्हती. काल वेळ काढून बयला भेटायला गेलो. बय ओटीवर हिंदोळ्यात बसलेली होती. बयला पाहताच माझ्या चेहऱ्यावर आनंदाचा मोरपिसारा फुलला. बयसुद्धा माझ्या ओढीने आसुसलेली होती. मला पाहताच तिच्या डोळ्यात चमक आली. मी ओटीच्या पायऱ्या चढत असतना बय उठून पुढे आली. वार्धक्याने ती कमरेत वाकली होती पण नेहमीप्रमाणे थकलेली जाणवली नाही. मी जवळ जाताच बयने मला मिठी मारली. त्या स्वर्गीय स्पर्शाने माझ्या अस्तित्वाला एक वेगळा गंध आला. किती मायेचा होता स्पर्श तिचा. अनमोल स्पर्श, जसं तिच प्रेम. अनमोल, अलौकिक, जणू आभाळमाया !!

बयशी मनोसोक्त गप्पा झाल्या अन निघताना मी सहज एक हजाराची नोट बयच्या हातात टेकली. बयने झटकन माझा हात मागे केला अन म्हटलं 'माला कादो ओडे पैशे, मा दरी हात. जे ते देत्यात माला. अन कालुस नाळ पाड्लोते त्याये ७००-८०० रुपय आल्यात, तू त्या पैशा पोरांना कय हाड मा नावाने'. मी बयच्या डोळ्यात पाहिले अन मनोमन विचार करू लागलो, 'किती सुंदर बनवल्या आहेत ह्या 'बय' देवाने, वास्तल्याने ओतप्रोत भरलेल्या, कशाची तक्रार नाही कि काही मागण नाही.

मी निघणार तो बय आत जाऊन आली अन म्हणाली 'मा एक काम कर, आपली शिशीनशी पोरी बाळत जाले तिला दे'. मला काही कळण्याच्या आत बयने माझ्या हातात १०० रुपयाची नोट ठेवली. बयने नारळाच्या कमाईतील काही वाटा सत्कारणी लावला होता. मी गमतीने बयला विचारले, 'बय, नाळाये पैशे तू दरी जास्ती वेळ ऱ्या नाय वाटाते'. माझ्या प्रश्नाने बय सुरेख हसली. क्षणभर प्राजक्ताचा सडा ओटीभर फुलून आला. बयने उत्तर दिलं, 'ये शेवट्शे १०० रेलते, ते जाग्या लागले'. मी बयकडे आश्चर्याने पाहिले. माझ्या मनात बयच्या खर्चाचा मागोवा घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. नक्कीच हिने सवयीप्रमाणे दानधर्म केला असेल ह्याची मला कल्पना आली. 'बय, अजून का केला पैशा?' मी बयचे हात हातात घेत प्रश्न केला. 'आते, मे कडे फिरया जाशी या वयात?, १०० हुकुरवारे देवळात कशीन टाकिली, ३०० रुपय मजुराला देवोन आंगाळ साफ करोन घेतला, एक पिलोटा रोजानसा आप्रेशन केले तिला धाडला अन काल मावरेवाली आलती ते मावरयाय पैशे दिले'. बयने एका दमात हिशोब माझ्या पुढ्यात ठेवला.

मी बयला मिठीत घेतले अन ओटीवरून खाली उतरलो. विचार करू लागलो. हिच्याकडे देण्यासारखे किती आहे. हीच आयुष्य देण्यातच गेलं. ना तिची माया कधी आटली ना कधी तिच्या बटव्यातले पैसे. अन आपली नवीन पिढी. फक्त घेण्याची वृत्ती. आपण सुगंध वाटत नाहीत म्हणून फ़ुलत नाही. फक्त आपल्यापुरताच उमलणे हे काय फुलंण झालं. बय वाटत राहिली सुगंध म्हणून फ़ुलत गेली. कोमेजण तिच्या वाट्याला आलं नाही. घरी परतेपर्यंत बय अजून फ़ुलत गेली मनात अन तिचा सुगंध घरभर. 'किती सुंदर आहे आपली 'फुलराणी', मी आईला म्हटलं. 'कोण फुलराणी? आई म्हणाली. मी हसत म्हटलं ' माझ्या आईची आई'. लाल लुगाड्यातील माऊली.

काय जादू आहे नव्या पावसाची?

हलकेच खिडकी उघडली. आभाळ भरून आलं होत. थेंब थेंब पावसाच्या सरी धरतीकडे झेपावू पाहत होत्या. हवाहवासा मातीचा गंध पुन्हा खुणावू लागला होता. निवडणुकीचा क्षीण मागे टाकून मन पुन्हा टवटवीत अन प्रसन्न झाले होते. केळीच्या पानावर थबकलेले पावसाचे थेंब अल्लडपणे खुणावत होते. तिथे दूर झाडावर बसलेला कावळा आपले पंख फडफडवत अंगावरील पाणी उडवत होता. किती सुंदर दिसत होते त्याच्या अंगावरून उडणारे पाण्याचे तुषार, अवर्णनीय. अन केळीच्या पानावर चढलेली हिरवी चादर, किती मोहक अन सुंदर. मोबाईल मध्ये फोटो साठवण्याचा मोह आवरत नाही. काय जादू आहे नव्या पावसाची? एक अनामिक सुख, निसर्गाच्या वेगळ्या रूपाचं. हवाहवासा गारवा. क्षणभर खिडकीतून हात बाहेर काढून निसर्गाला ओंजळीत घ्यावे असे मनोमन वाटत आहे. अन आंब्याच्या झाडावर मागे राहिलेल्या त्या कैऱ्या, सहज एखादी हाती आली तर? 'कोलूम' असेल का घरात? घराबाहेर पाणी अन तोंडाला सुटलेले पाणी. पाऊसराजा, कैरीची फोड खाता खाता, लिखाणाला पुन्हा सूर गवसू दे, चिंब पावसात नवे शब्द सापडू दे !

इनोसेंट !

इनोसेंट !

तो गेला नाही रे तुझ्यातून...
जिवंत आहे तो तुझ्यात, तुझ्या डोळ्यात...
फक्त शोधता आले पाहिजे आपल्याला...
तुझा आवाज, तुझी साद...आठवण करून देते त्याची...
तो आपल्यात, आजूबाजूला असल्याची...!

जाते ते शरीर, राहते ती नजर...
राहतो तो आवाज, आपला वाटणारा....
फक्त डोळे बंद करून ऐकावं तुला...
किव्हा डोळे उघडून, तुझ्या डोळ्यात पाहावं त्याला....
मग कळेल, तो गेलाच नाही आपल्यातून.....
फक्त विरघळला आहे तुझ्यात,
समरस होवून गेलाय तो, तुझ्या अस्तित्वात...!

आपण थांबवायला हवा शोध त्याचा....
विश्वास ठेवला तर तुझ्या स्पर्शात मिळेल उब त्याची...
अन सापडेल तुझ्या श्वासात, त्याचा हवाहवासा सुगंध...
आपले अस्तित्व भारावून टाकणारा...
आपण उगाच शोधतो त्याला....
तो कायमचा गेला आहे असे समजून...
तो मात्र तुझ्यात आहे, अगदी तुझ्यात तू बनून जगणारा...
अगदी 'निरागसपणे' वावरणारा !

निस्सीम चाहता हो स्वतःचा,
तुझा शोध थांबेल त्याच्यासाठी...
अन तुला शोध लागेल तुझ्यातल्या,
हरवलेल्या 'इनोसेंटचा' !!

बोलकं कुटुंब !

बोलकं कुटुंब !

त्या दिवशी सलून मध्ये मी केस कापण्यासाठी वाट पाहत बसलो होतो. काचेच्या भिंतीतून बाहेरची धावपळ दृष्टीस पडत होती. इतक्यात एक जोडपं साधारण ३ वर्षाच्या मुलाला घेऊन सलून समोर आलं. नवरा बाहेर तिथेच थांबून राहिला अन ती बाई मुलाला घेऊन सलून मध्ये शिरली. ती बाई हातवारे करून न्हाव्याला काहीतरी विचारात होती. न्हाव्याने तिला बोटाने एक तास अजून वेळ लागेल असे खुणाविले अन ती बाई मुलाला घेऊन बाहेर पडली. मी काचेपलिकडे नजर टाकली. त्या नवरा-बायकोमध्ये बोटांच्या खुणेने काही संवाद सुरु होता अन तो लहानगा मुलगा त्या दोघाकडे निरागसपणे पाहत होता.

मला त्यांच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. मी न्हाव्याकडे चौकशी केली अन कळले की ते नवरा-बायको जन्मजात मुके अन बहिरे आहेत आणि दोघांनाही हाताच्या खुणेची भाषा समजत असल्याने त्यांचे उत्तम चालले आहे. मग मला त्या मुलाविषयी जाणून घ्याव्यासे वाटले अन समजले की त्या मुलाला बोलता अन ऐकता येत होते. मन विचार करू लागले, दैव किती निष्ठुर अन चांगलेही आहे. दोन जीवांना जन्मजात बोलण्या अन ऐकण्यापासून वंचित केले अन त्यांच्याच पोटी सुधृढ बाळ जन्माला घातले. पुढे अजून एक विचार मनात आला, कोणती संवादाची भाषा असेल त्या कुटुंबात? मुके-बहिरे पालक अन आई-वडिलांच्या आवाजासाठी आसुरलेल लेकरू. आपल्या तान्हुल्या बालकाचे पहिले बोल ऐकण्यासाठी त्यांचे कान आसुरले असतील का? की ती संवेदनाचं त्यांच्यात नसेल? अन त्या निरागस बालकाच काय जग असेल? सारे विश्व एकमेकांशी संवाद साधत असताना आपले आई-वडील असे अबोल हातवारे करीत जगणारे, किती गूढ वाटत असेल त्या कोवळ्या मनाला?

कधी वाटल नव्हत, असंही असेल जगात एखादे कुटुंब, जिथे आई गात असेल मुके अंगाईगीत अन तान्हुल्याच्या डोळ्यातील अश्रूतून कळत असेल आईला त्याचा शांत हंबरडा. खरंच आपल जग किती वेगळ आहे, किती सोपे आहे. फक्त ऐकायचं तेव्हा आपण कान नसल्यासारखे करतो अन जिथे बोलायला हवं, तिथे मुग गिळून गप्प बसतो. असो, त्या दिवशी आपल्या मूक-बधिर दुनियेतील ते बोलकं कुटुंब खूप सांगून गेलं.

सचिन मेंडिस

लालबुंद बदाम !!

लालबुंद बदाम !!

पाऊस अन बदाम ह्याचं जवळच नांत. पावसाळ्याच्या हंगामात बदामाचे झाड बहरून निघते. आमच्या अंगणात बदाम कधी रुजला ते ठाऊक नाही, परंतु पावसाळ्यात तो असा फुलून येतो की मन प्रसन्न होते. रोज सकाळी अंगणात झाडाखाली लालबुंद बदामाचा सडा पडलेला दिसून येतो, पण एखादे बदाम उचलून तोंडात टाकण्याची उर्मी अन वय दोघेही मागे पडलंय. आज सहजंच अंगणातल्या खडीवर पडलेल्या लालबुंद बदमाकडे लक्ष गेलं. मनात विचार आला, किती वर्ष त्याला असं टाळता येईल? ओटीवरून खाली उतरलो. अलगदपणे त्या बदामाला जमिनीवरून उचलून घेतलं. तेच बदाम जे मिळवण्यासाठी २५ वर्षा अगोदर कसरत करावी लागत असे. उजव्या हाताच्या नखाने बदामावर एक चीर करून मोठाला पापुद्रा बाहेर काढला. लालबुंद रसाने आतला भाग सजून आला होता. बदामाला नाकाजवळ नेले अन डोळे बंद करून चीर केलेल्या भागाजवळ दीर्घ श्वास घेतला. संपूर्ण शरीरात बदामी गंध दरवळला. एका हलक्या गंधाने सरळ माझ्या प्राथमिक शाळेतल्या वर्गात पोहचलो.

बोळींज वरून गोलप्यातल्या शेतातून पायपीट करून घोसाळी गावातील बदामे वेचत असल्याचा काळ जागा झाला अन बदामाच्या रसाने शर्टचा रंगलेला लाल खिसा डोळ्यासमोर आला. किती सुंदर होते ते दिवस. अगदी गोड अन मधुर, बदामाच्या आतल्या पांढऱ्या गोळ्यासारखे. घोसाळी गावात एका बावखालाच्या कडेला मोठे बदामचे झाड होते अन त्याच्या खाली म्हशीचा भलामोठा गोठा होता. साहजिकच काही बदामे शेणाच्या संपत्तीमधून उचलावी लागत असतं. बदामे उचलताना मन मागेपुढे होई, परंतु शेणाच्या दुर्गंधीवर बदामाचा हवाहवासा सुगंध मात करीत असे. त्या वेळेला वर्गात ५० पैशात ५ बदामे विकणाऱ्या मुलाचं मला भारी आकर्षण अन कुतुहूल वाटत असे. आमच्या जुन्या घराचा दरवाजा एखाद्या किल्य्याच्या दारासारखा होता. बदामाची साल खाऊन झाल्या नंतर उरलेली आठी आम्ही दाराच्या फटीत अलगद ठेवून दरवाजा बंद करून फोडत असू. अन मग फुटलेल्या आठीमधून भुगा झालेल्या बदामच्या पांढरया गोळ्याचा शोध घेऊन त्याचा मनमुराद आस्वाद होत असे.

आज स्वतच्या अंगणात बदामाचा सडा दुर्लक्षित पडलेला पाहून बदललेल्या काळाचे नवल वाटते. बदामाचा आकार, रंग, सुगंध सगळ काही तसंच आहे, फक्त वेळ-काळ बदलली आहे. काळ बदलला कि माणसाच्या गरजा अन मन ही किती बदलते. तसं पाहिलं तर आज ज्या गोष्टीसाठी आपल्या जीवाचा आटापिटा चालला आहे, त्या गोष्टी अन गरजाही भविष्याच्या पोटात कधी अदृश्य होतील ह्याचा नेम नाही. तूर्तास बदाम हुंगण्याचा मोह सोडवत नाही.

सचिन मेंडिस

न सांगता निघून गेलेले !!

न सांगता निघून गेलेले !!
                                           सचिन मेंडिस

मुलं वाट पाहत होती, पप्पा हॉस्पिटल मधून बरे होऊन घरी परत येण्याची. पण पप्पा न सांगता, मुलांना न भेटता निघून गेले. पप्पा ठीक आहेत, लवकरच घरी परत येतील अशा भाबड्या आशेने पप्पाच्या येण्याची आतुरतेने वाट पाहणारी ती निरागस बालके, पप्पाच्या वाटेवर डोळे लावून बसली होती. पण पप्पा काही आले नाही. पप्पाच्या जाण्याची बातमी आली. बातमी पण सरळ आली नाही, आढेवेढे घेत. घरी जमलेली नातलगांची गर्दी अन पाठून आलेला आईचा काळीज चिरणारा हंबरडा. कुणी म्हणाले पप्पा सिरियस आहेत, कुणी म्हणाले ऑपेरेशन सुरु आहे पण तो क्षणभराचा आधार. वसंताच्या चाहुलीने वृक्षाने पालवीची तयारी करावी अन दुर्दैवाने वृक्षाने पेट घ्यावा असा सगळा प्रकार. मोठ्या काळोखाची सुरुवात म्हणा.

आपल्याला हवीहवीशी वाटणारी, आपल्यात वावरणारी, आपली माणसे अशी न सांगता का निघून जातात? कोणतीही चाहूल लावून न देता. एक प्रचंड पोकळी निर्माण करून, तीही कधीही भरून न निघणारी. अन ती निरागस बालके, त्यांची कशी समजूत घालावी? त्यांच्या निष्पाप प्रश्नांची उत्तरे कशी शोधावी? गेल्या २-३ वर्षात अशा अनेक व्यक्ती न सांगता मनाला चटका लावून निघून गेल्या. आईच्या मायेला पारखी झालेली इवलीशी पाखरे पाहिली कि मन पिळवटून निघते. ज्या घरट्यात आई नाही, त्या घरट्यात पिलांची चिवचिव कोण ऐकत असेल? कि नियतीने अकाली लादलेल्या अनाथपणामुळे हरवली असेल त्यांची चिवचिव? जेव्हा १२-१३ वर्षाची छकुली ख्रिस्ताच्या समोर हात जोडून 'माझी आई कधी परत येणार'? असा प्रश्न ख्रिस्तासमोर मांडत असेल तेव्हा ख्रिस्त काय उत्तर देत असेल तिला? कि तोही निरुत्तर होत असेल आपल्यासारखा? अन देवाघरी गेलेली ती तरुण आई, देवराज्यातून आपल्या मुलांचे अश्रू पाहताना किती व्याकूळ होत असेल? किती तुटत असेल आतून.

न सांगता निघून गेलेल्या त्या व्यक्तीचे, मृत शरीर चर्चला नेण्यासाठी घरून उचलताना होणाऱ्या त्या आर्त किंकाळ्या अन ते हंबरडे. किती वेदना किती यातना त्या क्षणात. आयुष्य किती क्षणभंगुर आहे ह्याची जाणीव करून देणाऱ्या. अन प्रेतयात्रेबरोबर चालताना कानी पडणारे 'माती असशी मातीस मिळशी' हे गीत, किती त्रासदायक. संपूर्ण समाजाला रडू आणणारे. क्षणभर काळाला थांबवणारे. अलीकडेच निघून गेलेल्या त्या तरुणाची विधवा पत्नी जेव्हा घरच्यांना ओक्साबोक्शी रडून सांगते कि 'मला माझ्या नवऱ्याची खित आली आहे' तेव्हा त्या खितीला कोणते उत्तर असेल? कि तिलाही माहिती असेल कि फक्त खित परत परत येणार पण तो? तो परत येणार नाही. एक अंधारलेल काटेरी सत्य. काळजात खुपणार, डोळ्यांच्या पापण्या सदोदित ओल्या ठेवणार.

आपण कितीही म्हणो 'जो आवडतो देवाला, तोचि आवडे देवाला'. पण हे बोल अन समजुती क्षणभराच्या, वरवर फुंकर मारण्यासाठी. काळजाच्या वेदना, हृदयाच्या जखमा फक्त काळावर सोडून द्यायच्या. म्हणतात कि देवाच्या योजना ह्या मानवाच्या योजनेपेक्षा वेगळ्या असतात. पण अकाली निघून जाणाऱ्या व्यक्तींकरिता देवाच्या योजना मानवांच्या योजनेशी मिळत्याजुळत्या का नसाव्या? निदान मायेचे छत्र हरवलेल्या त्या चिमुरड्यांसाठी तरी.

सिंह गेला


तुझ्याशिवाय वाढदिवस

आज तुझा फोन येणार नाही. कारण सकाळची वेळ निघून गेली आहे. तुझा फोन नेहमी सकाळीच यायचा. बहुतेक वेळा ऑफिसला निघण्याअगोदर तू विश करायचास. आता सकाळ टळून गेलीय. सायंकाळ पर्यंत तुझ्या फोनची वाट पाहू का? असा वेडेपणा तुला आवडणार नाही पण आजचा दिवस असा वेडेपणा केला तर चालेल का? ह्या वयात वाढदिवसाचे कौतुक नाही रे पण तुझा ४ ऑगस्टचा वाढदिवस आणि माझा ६ ऑगस्टचा वाढदिवस. एकामागोमाग एक आपण वाढदिवस साजरे करायचो. एकदा तर तू म्हणाला होतास, 'आपण एकत्र मित्रासोबत वाढदिवस साजरा करू, अन आपण मोठ्या आनंदात एकत्र साजरा केला आपला वाढदिवस. सोबत आपला जॉन सुद्धा होता. आज सगळे मित्र आहेत, पण तू नाहीस. शुभेच्छा द्यायला. जो कुणी फोन करतो, तो फक्त तुझाच विषय काढतो. आनंद साजरा करायला कुणी तयार नाही रे. हे सर्व लिहायला वाटत नाही दादा, पण आतून येते. मनातल असं शब्दात व्यक्त केलं कि हलक वाटत. आज असाच हातात हात घेऊन आपण केक कापला असता तर किती छान वाटलं असतं. तुझ्याशिवाय वाढदिवस गोड वाटत नाही. सायंकाळ पर्यंत तुझ्या फोनची वाट पाहू का?

Dost RIP


हरवलेलं पाकीट

हरवलेलं पाकीट

कालची घटना. ऑफिसवरून लवकर घरी निघालो. जोगेश्वरी स्टेशनला जिन्यावरून उतरून पुढे चालू लागलो. बाजूला उभा असलेल्या व्यक्तीने पाठीवरील Bag ची चेन उघडी असल्याचे सांगितले. मी Bag पाठीवरून खाली काढली. Bag च्या बाहेरील खिशाची चेन पूर्णपणे उघडी होती. मी Bag मध्ये हात घातला अन मला धक्का बसला. माझ्या Bag मधून माझे पाकीट चोरण्यात आले होते. पाकिटात पैसे नव्हते परंतु डेबिट अन क्रेडीट कार्ड, आधार कार्ड, PAN कार्ड, कार आणि बाईकचे RC कार्ड, ड्रायविंग लायसेन्स, रेल्वेचा पास अशी महत्वाची ओरिजिनल डोक्यूमेंट त्यात होती. मी घरी फोन करून पाकीट चुकून घरात असल्यास चेक करायला सांगितले परंतु घरी काही ते सापडले नाही. मग मी निराश होऊन परतीच्या प्रवासाला निघालो. डेबिट अन क्रेडीट कार्ड लॉक करणे गरजेचे होते परंतु माझ्याकडे नंबर नसल्याने मी मोबाइलवरून माझ्या सिटी बँकेच्या खात्यावरून तत्काळ पैसे कॅथोलिक बँकेत वळते केले.

मिरारोड निघून गेल्यावर माझा मोबाईल वाजला. पलीकडून एका तरुणाचा आवाज आला. त्याने 'सचिन मेंडिस' बोलता का असे विचारले. मी 'हो' असे उत्तर दिले. माझे पाकीट त्याला अंधेरी स्टेशनच्या बाहेर सापडले आहे असे त्याने सांगितले अन अंधेरीला यायला सांगितले. माझे पाकीट परत करण्यासाठी तो पाउण तास अंधेरीला थांबणार होता ह्याचे मला कौतुक वाटले. मी तत्काळ भायंदरला उतरून चर्चगेट गाडी पकडली. त्या मुलाने त्याचे नाव 'अमर' असे सांगितले होते. मी मोबाईलमध्ये 'अमर अंधेरी' असा त्याचा नंबर सेव केला. माझ्या जीवात जीव आला होता. आता मला गाडी अंधेरीला कधी पोहचते असे झाले होते. मी ट्रेनमधून अमरला फोन लावला आणि पाकिटातील ओरिजिनल डोक्यूमेंट सुरक्षित असल्याची खात्री करून घेतली. ट्रेन अंधेरीला पोहोचली अन त्याचा पुन्हा फोन आला. मी कुठे पोहचलो ह्याची त्याने चौकशी केली. मी त्याला गाडी अंधेरी स्टेशनला लागल्याचे सांगितले, त्याने मला त्याच प्लेटफॉर्मवर सरकत्या जिन्याच्या खाली उभे राहायला सांगितले अन तो तिथेच येईल असे कळवले. मी स्टेशनला उतरून सरकत्या जिन्याच्या बाजूला उभा राहिलो. काही मिनिटाने एक काळा, शिडशिडीत २५ वर्षाचा तरुण माझ्या समोर आला अन त्याने 'सचिन सर' अशी हाक दिली. मी त्या तरुणाला मिठी मारली अन त्याचे आभार मानले. त्याने पाकीट माझ्या हातात सोपवले. माझ्या पाकिटातील विजिटिंग कार्डवर माझा मोबाईल नंबर होता त्यावरून त्याने मला संपर्क केला होता. त्याची चौकशी केली. कोणत्या तरी छोट्या कंपनीत तो ऑफिसबॉय म्हणून काम करीत होता अन काही कामानिमित्त तो अंधेरीला आला होता. मला त्या अशिक्षित तरुणाच्या प्रामाणिकपानाचे अन विशेषकरून परोपकाराचे कौतुक वाटले. मी खिशातून ५०० रुपयाची नोट काढून त्याच्या हातात ठेवली अन माझे विजिटिंग कार्ड त्याकडे दिले. त्याला उशीर झाला होता. त्याने 'मी निघतो' असे म्हटले अन तो पाठी फिरला. अमर च्या रूपाने मला एक सुखद अनुभव मिळाला होता.

रात्री घरी गेल्यावर घरच्यांना हि घटना सांगितली. ह्या दुनियेत अशी चांगली माणसे आहेत ह्याबद्दल आनंद व्यक्त केला. मनात आले अमरच्या मोबाईलवर फोन करून त्याच्या आईशी बोलावं अन तिच्या गुणी मुलाचे कौतुक कराव. मी अमरला फोन लावला. म्हटलं 'घरात कोण असते तुझ्या'. 'मी आणि माझा भाऊ, आम्ही दोघेचं असतो' अमरने उत्तर दिले. 'अन आई-बाबा, माझा पुढचा प्रश्न'. पुढून थंड उत्तर आले,' आई-बाबा लहानपणीच वारले'. मला खूप वाईट वाटले. आई-बाबाच्या मायेला पारखी झालेली हि अल्पशिक्षित मुले किती सुंदर आहेत, असे मनोमन वाटले. मी फोन ठेवण्या अगोदर अजून एक प्रश्न केला 'अमर, पाकीट सापडल्यावर तुला परत करावेसे का वाटले'? त्याने उत्तर दिले,' सर, काही महिन्यागोदर खोली पाहण्यासाठी मी विरारला आलो होतो, घरून निघाल्यावर मी ATM मधून महिन्याचा ७ हजार पगार काढून पाकिटात टाकला अन ट्रेन मध्ये चढलो. विरार स्टेशनाला उतरल्यावर लक्षात आले कि पाकीट चोरीला गेले आहे. पूर्ण महिन्याचा पगार क्षणात निघून गेला होता. मी खूप शोधाशोध केली परंतु पाकीट मिळाले नाही. मला पाकीट हरवल्याचे दुक्ख माहीत आहे, म्हणून तुमचे पाकीट सापडल्यावर मी तुम्हाला संपर्क केला'.

अमरचे बोलणे ऐकून मी स्तब्ध झालो होतो. त्याच्या हरवलेल्या पाकिटाचे दुक्ख माझ्या सापडलेल्या पाकिटाच्या आनंदापेक्षा नक्कीच जास्त होते. मी त्याला त्याचे पाकीट परत मिळवून देऊ शकणार नव्हतो, परंतु माझ्या ओळखीने त्याच्यासाठी चांगली नोकरी तरी नक्कीच शोधू शकत होतो. मी त्याला वचन दिले, 'मित्रा, मी तुझे काम करतो'. मला त्याला पगाराने भरलेले नवीन पाकीट दयायचे आहे. सुरुवात केली आहे.

लग जा गले की कल हो ना हो !

लग जा गले की कल हो ना हो !

एक जवळचा मित्र अकाली निघून गेला. वाटलं शेवटचा भेटला होता तेव्हा त्याला मिठी मारायला हवी होती, अन सांगायला हवं होत, की तू किती चांगला आहेस, माझ्या आयुष्यात तू किती महत्वाचा आहेस. परंतु हस्तांदोलना पलीकडे कधी मिठीत घेण्याचा प्रश्न आला नाही. त्याचे शेवटचे दर्शन घेताना त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले अन केसावरून हात फिरवला. मन विचार करू लागले, हे तो अवतीभवती असताना का शक्य झाले नाही? मैत्रीत अन नात्यात ही सहजता का नसावी? कुठले हे अवघडलेपण? की नात्याला गृहीत धरण्याचा मनाचा स्वभाव? प्रेमाची सहजता, ऋणानुबंध, वास्तल्य्य, आपुलकी आपल्या कौटुंबिक अन मित्राच्या नात्यात का नसावी? आई-वडील, भाऊ-बहिण, मुलं-मुली, नातेवाईक, मित्र ह्यांना मिठीत घेण्यात संकोच का वाटत असावा? की प्रौढपणा निरागसता अन सहजता मारून टाकत असावा? की फक्त मोठा आघात झाल्यावर एकमेकांना मिठीत घेण्याची गरज भासावी.

माझ्या पत्नीच्या मामाकडच्या 'बय'कडे गेलो की ती पहिली मला मिठीत घेते अन हलकेच गालावर 'गोका' घेते. प्रेम व्यक्त करण्याचा किती सोपा परंतु प्रभावी प्रकार. जी गोष्ट लाखो शब्दात मांडता येणार नाही, ती एका मिठीत व्यक्त होते. देवाने गोष्टी किती सोप्या बनवून ठेवल्या आहेत. जवळचा मित्र जेव्हा अकाली गेला तेव्हा इतर मित्रांनी एकमेकांना आलिंगन देऊन सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. शोका प्रसंगी येणारी ही सहजता आपल्याला दैनदिन जीवनात का आणता येत नसावी? जीवन हे किती क्षणभंगुर आहे, ह्याचा अनुभव आपण अलीकडेच घेतलेला आहे. म्हणून आपल्या सर्व प्रिय व्यक्तींना भेटून सांगावेसे वाटते, 'लग जा गले की कल हो ना हो' !