Wednesday, August 12, 2015

फुलराणी !!

फुलराणी !!
---------------------------- सचिन मेंडिस

बयची खित आली कि मन उदास होते. तिच्या मायेच्या स्पर्शासाठी जीव कासावीस होतो. कित्येक दिवसात बयची भेट झाली नव्हती. काल वेळ काढून बयला भेटायला गेलो. बय ओटीवर हिंदोळ्यात बसलेली होती. बयला पाहताच माझ्या चेहऱ्यावर आनंदाचा मोरपिसारा फुलला. बयसुद्धा माझ्या ओढीने आसुसलेली होती. मला पाहताच तिच्या डोळ्यात चमक आली. मी ओटीच्या पायऱ्या चढत असतना बय उठून पुढे आली. वार्धक्याने ती कमरेत वाकली होती पण नेहमीप्रमाणे थकलेली जाणवली नाही. मी जवळ जाताच बयने मला मिठी मारली. त्या स्वर्गीय स्पर्शाने माझ्या अस्तित्वाला एक वेगळा गंध आला. किती मायेचा होता स्पर्श तिचा. अनमोल स्पर्श, जसं तिच प्रेम. अनमोल, अलौकिक, जणू आभाळमाया !!

बयशी मनोसोक्त गप्पा झाल्या अन निघताना मी सहज एक हजाराची नोट बयच्या हातात टेकली. बयने झटकन माझा हात मागे केला अन म्हटलं 'माला कादो ओडे पैशे, मा दरी हात. जे ते देत्यात माला. अन कालुस नाळ पाड्लोते त्याये ७००-८०० रुपय आल्यात, तू त्या पैशा पोरांना कय हाड मा नावाने'. मी बयच्या डोळ्यात पाहिले अन मनोमन विचार करू लागलो, 'किती सुंदर बनवल्या आहेत ह्या 'बय' देवाने, वास्तल्याने ओतप्रोत भरलेल्या, कशाची तक्रार नाही कि काही मागण नाही.

मी निघणार तो बय आत जाऊन आली अन म्हणाली 'मा एक काम कर, आपली शिशीनशी पोरी बाळत जाले तिला दे'. मला काही कळण्याच्या आत बयने माझ्या हातात १०० रुपयाची नोट ठेवली. बयने नारळाच्या कमाईतील काही वाटा सत्कारणी लावला होता. मी गमतीने बयला विचारले, 'बय, नाळाये पैशे तू दरी जास्ती वेळ ऱ्या नाय वाटाते'. माझ्या प्रश्नाने बय सुरेख हसली. क्षणभर प्राजक्ताचा सडा ओटीभर फुलून आला. बयने उत्तर दिलं, 'ये शेवट्शे १०० रेलते, ते जाग्या लागले'. मी बयकडे आश्चर्याने पाहिले. माझ्या मनात बयच्या खर्चाचा मागोवा घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. नक्कीच हिने सवयीप्रमाणे दानधर्म केला असेल ह्याची मला कल्पना आली. 'बय, अजून का केला पैशा?' मी बयचे हात हातात घेत प्रश्न केला. 'आते, मे कडे फिरया जाशी या वयात?, १०० हुकुरवारे देवळात कशीन टाकिली, ३०० रुपय मजुराला देवोन आंगाळ साफ करोन घेतला, एक पिलोटा रोजानसा आप्रेशन केले तिला धाडला अन काल मावरेवाली आलती ते मावरयाय पैशे दिले'. बयने एका दमात हिशोब माझ्या पुढ्यात ठेवला.

मी बयला मिठीत घेतले अन ओटीवरून खाली उतरलो. विचार करू लागलो. हिच्याकडे देण्यासारखे किती आहे. हीच आयुष्य देण्यातच गेलं. ना तिची माया कधी आटली ना कधी तिच्या बटव्यातले पैसे. अन आपली नवीन पिढी. फक्त घेण्याची वृत्ती. आपण सुगंध वाटत नाहीत म्हणून फ़ुलत नाही. फक्त आपल्यापुरताच उमलणे हे काय फुलंण झालं. बय वाटत राहिली सुगंध म्हणून फ़ुलत गेली. कोमेजण तिच्या वाट्याला आलं नाही. घरी परतेपर्यंत बय अजून फ़ुलत गेली मनात अन तिचा सुगंध घरभर. 'किती सुंदर आहे आपली 'फुलराणी', मी आईला म्हटलं. 'कोण फुलराणी? आई म्हणाली. मी हसत म्हटलं ' माझ्या आईची आई'. लाल लुगाड्यातील माऊली.

No comments: