Thursday, August 4, 2016

मला भावलेला जॉन

मला भावलेला John Pereira 󾁅

जॉन सर्वाना आवडतो, आपला वाटतो. जॉनच्या धावपळीमुळे व प्रकृतीकडे करीत असलेल्या दुर्लक्षामुळे सर्वाना जॉनची काळजी वाटते. दुसर्यांना जॉन आपला वाटणं, त्याची काळजी वाटणं हे जॉनच्या ५० वर्षाच्या आयुष्याचं संचित आहे. हे संचित फक्त अनमोल नाहीए तर तितकचं आदर्श अन अनुकरणीयही आहे. जो दुसर्यांच्या अंगणात आनंदाचं झाड लावतो, त्याच्या अंगणात सुखाची फुलं दरवळतातं असं म्हटलं जातं. जॉनने आपल्या घरात सुख यावं हा हेतू डोळ्यापुढे ठेऊन इतरांच्या अंगणात कधी झाडं लावली नाहीत. तसा त्याचा मुळी स्वभावचं नाही. तो निस्वार्थी वृत्तीने वाहत असतो, म्हणून त्याची ओंजळ कधी आटत नाही अन आटणारही नाही.

जॉनची ओळख कधी झाली ती आठवत नाही परंतु जसजसा त्याचा परिचय व सहवास वाढत गेला, तसतसा त्याच्यामधील 'देवमाणूस' उलगडत गेला. आजच्या स्वार्थी व चंगळवादी दुनियेत जॉनसारखा नम्र, निस्वार्थी, नैतिक व निरागस मनुष्य मित्र म्हणून लाभणं हे भाग्यचं. त्याच्या गरजा मर्यादीत आहेत. भौतिक सुखाची त्याला ओढ नाही. जगण्याची त्याची स्व:ताची तत्वे आहेत अन तो तत्वांशी तडजोड करीत नाही. तो त्याच्या जगण्याशी प्रामाणिक आहे म्हणून त्याच्या ५० व्या वाढदिवसी दोन शब्द लिहीताना कुणाला उसने शब्द घ्यावे लागत नाही.

दिवंगत फा. नँप हे जॉनचे श्रध्दास्थान. जॉनच्या आयुष्यावर त्यांचा खूप प्रभाव जाणवतो. म्हणूनच फादरांनी लिहिलेल्या गीताप्रमाणे जॉन 'कधी धरतीस अंथरतो तर कधी आकाश पांघरतो'. आभाळाला छत व धरतीला अंथरूण मानून जॉनसारख्या समई अखंड तेवत असतात म्हणूनचं लोकांच्या वाटेवर प्रकाश सोबत करतो. काळोखाला भगदाड पाडण्याचं मूळ व सामर्थ्य जॉनच्या धार्मिक श्रध्देत असांव. 'सचिन, तू प्रत्येक रविवारी मिस्साला जात जा' असं जेव्हा तो निरागसपणे पण तितक्याचं पोडतिडकीने समजावून सांगतो तेव्हा त्याला कर्मकांडापेक्षा जीवनाला नैतिक अधिष्ठान प्राप्त करण्यासाठी ख्रिस्ती श्रध्दा कशी गरजेची आहे, हे अभिप्रेत असावं.

जॉनच्या प्रवासात त्याची पत्नी वेरोणीकाला विसरून चालणार नाही. निस्वार्थीपणे लोकांना वाहून घेतलेल्या जॉनचं वेरोणिका ही मानसिक बळ आहे. ज्याचं मानसिक बळ अगाधं असतं त्याला संघर्षाची भीती नसते. म्हणूनचं पाणी आंदोलनापासून सुरू असलेला व्यवस्थेविरूध्दचां जॉनचा संघर्ष महापालिकाविरोधी लढ्यापर्यत तितकाचं त्वेषाने दिसून येतो. 'वेरोणिका येशूचा चेहरा पुसते' ह्याचा अन्वयार्थ लावण्यासाठी मला जॉन-वेरोणिका ह्या जिवंत पुस्तकाचं उदाहरण द्यावसं वाटेल. कुणाला ही अतिशोयोक्ती वाटेल, परंतु त्यांना जवळून ओळखणारे माझ्याशी सहमत असतील.

जॉन हा असा आहे, म्हणून गमतीने मी जॉनला 'वसईचा महात्मा गांधी' म्हणतो. खरंतर आज मी अशा निरागस, निस्वार्थी, नितळ माणसाला शुभेच्छा देताना त्यांचा आशिर्वादही मागतोय. आजच्या चंगळवादी दुनियेत जॉनपासून खूप काही शिकण्यासारखं आहे. त्यासाठी कधीतरी वेळ काढून 'जॉन' नावाचं पुस्तक वाचावं लागेल. क्रिकेटच्या सामन्यात पंचगिरी करताना अनवधाने चुकीचा निर्णय दिल्याने संघाची जाहीर माफी मागणारा जॉन असो की स्टिफनच्या जाण्याने आठवडाभर निर्जीव झालेला जॉन असो. तो मनात फुलत राहतो, आसपास दरवळत राहतो. म्हणूनचं हवाहवासा वाटतो.

एकचं प्रार्थना. बाबा रे, प्रकृतीची खूप हेळसांड केली. आता जप तब्बेतीला. ही समई अनेक वर्ष तेवत ठेवायची आहे. तुझी आभाळमाया आम्हा मित्रांवर सदैव राहू दे.

सचिन मेंडिस

No comments: