Thursday, August 4, 2016

'बय'

'बय' हा माझ्या लिखाणाचा नेहमीचा विषय. बयला पाहिले तर चार ओळी सहंज सुचतात, इतकी बय लेखणीला भावून जाते. कधी लिहायला विषय नसला तर 'बय' मदतीला धावते. आज सहज फेसबुक चाळत असताना बयचा प्रसन्न फोटो समोर आला. क्षणभर थांबलो. बयच्या निर्मळ रुपाला डोळ्यात साठवून घेतलं. काय लिहावं ह्या फोटोविषयी. अनोळखी चेहरा तरीही कितीही जवळचा वाटणारा. रॉजरचंसुध्दा कौतुक करावं तितकं थोडं इतक्या बयच्या वेगवेगळ्या मुद्रा त्याने कँमेर्यात रूजवल्या आहेत.

किती दशकांच ओझं घेऊन बय इथपर्यंत आलीयं. न थकता, न थांबता, न तक्रार करता अक्ख्खा कुपारी समाज आपल्या उबदार मिठीत घेऊन बयचा अवर्णनीय प्रवास झालांय. एक चालताबोलता इतिहास,ज्या इतिहासात आनंदाचे क्षण कमी अन संघर्ष जास्त दडलांय. असा संघर्ष ज्या संघर्षाच्या पायावर एक सुशिक्षित अन संपन्न कुपारी समाज उभा राहिलाय.


लहानपणापासून बयला आपण डोळ्यात जागवत आलोय. किती मुद्रा पाहिल्या असतील बयच्या आपण. लहान बाळाला मांडीवर उलट झोपवून आंघोळ घालणारी बय, विहिरीच्या बाजूला झावळ्या विणणारी बय, घराच्या पाठीमागे चुलीवर ठेवलेल्या पातेल्याखाली नारळाची साल घालणारी बय ते वाडीतून डोक्यावर भाजीपाला वाहून आणणारी फोटोतील बय. सतत वाहत असणारी.

एक मात्र खंर. प्रत्येक मुद्रेत बयची ओळख जरी वेगळी असली तरीही ध्येय अन संघर्ष सारखांच असतो, आपल्या पिल्लाचा भविष्यकाळ उज्ज्वल करण्याचा. नाही का?

No comments: