Thursday, August 4, 2016

गावं हेच खरं 'राव' असतं

गावात मरण झालं. साधासरळ देवमाणूस चांगलं जीवन जगून परतीच्या प्रवासाला निघाला. सायंकाळची वेळ होती. घरात व आजूबाजूच्या घरात चुली पेटल्या नाहीत. अर्ध्या तासापूर्वी बोललेली व्यक्ती आपल्यात नाही, हे किती अनपेक्षित.

रात्रीच्या जेवणाची वेळ झालेली. गावातील क्रियाशील व्यक्तींची पाऊले हलू लागली. चहा नाश्त्याची सोय होऊ लागली. लहान मुलांना दूध, जेवणासाठी दुसरीकडे नेलं गेलं. आजारी शेजाऱ्यांच्या व नातेवाईकांच्या औषधाची सोय केली गेली. गावात राहण्याची उब काय असते, ह्याचा प्रत्यय अशा प्रसंगातून आला.

कोणतीही आपत्कालीन परिस्थिती असू दे, गावं उभं राहतो. गावं पुढं आलं की संकट माघार घेते, हा इतिहास आहे. सुखात सर्व गावं असेलच असं नाही, परंतु दुःख्खात गावं उभं राहतं. कधी कधी काही व्यक्ती किव्हा एखादे श्रीमंत कुटुंब गावापेक्षा मोठा असल्याचा आभास निर्माण करतात. व्यक्ती कितीही मोठा असुदे, मग तो पैशाने, हुद्द्याने वा कीर्तीने. तो गावापेक्षा मोठा होऊ शकत नाही.

गावात भांडण तंटे असतात. निंदा-नालस्ती चालते परंतु अडचणीला जसा गावं धावून येतो तसा कुणी राव धावून येऊ शकत नाही. कारण जे गावं करील ते राव करील काय? मग ते गावं कोणतंही असू दे, तुमचं वा आमचं, गावं हेच खरं 'राव' असतं.

No comments: