Thursday, August 4, 2016

हा ख्रिस्ती मूल्यांचा विजय !

हा ख्रिस्ती मूल्यांचा विजय !

लोकसत्ताचे बुध्दिमान संपादक श्री. गिरीश कुबेर ह्यांनी १७ मार्चच्या संपादकीयामध्ये आदरणीय मदर तेरेजा विरोधात खालच्या पातळीवर जाऊन अश्लाघ्य टीका केली. मदर तेरेजा ह्यांनी सेवेच्या नावाखाली ख्रिस्ती धर्मांतरे केली असे आरोप करून त्या मानवतेच्या माऊलीला व तिच्या निस्वार्थ सेवेला बदनाम करण्याचा प्रयत्न कुबेर महाशयांनी केला. खरतर मदर ह्या कुणा विशिष्ट धर्मीयांच्या आई नव्हत्या तर समस्त अनाथांच्या माता होत्या. इतर धर्मियांच्या देव देवता किव्हा आदरणीय व्यक्तीबाबत असे घडले असते, तर कदाचित टोकाची हिंसक प्रतिक्रिया उमटली असती. इतिहासात असे घडले आहे. संतप्त लोक रस्त्यावर उतरून त्यांनी हिंसक आंदोलनाने जाळपोळ करून आपला रोष व्यक्त केला आहे. पण आपण असे केले नाही. आपली ख्रिस्ती मुल्ये अशा विरोधाला परवानगी देत नाही. किंबहुना धर्मापेक्षा थोडे जास्त आपण देशहिताला प्राधान्य देतो. कायदा हातात घेत नाही, अन काल आपण घेतलाही नाही.

आपण विचाराची लढाई विचाराने लढली. फक्त लढली नाही तर जिंकलीही. लोकसत्ता सारख्या अग्रगण्य दैनिकाला त्यांचे संपादकीय मागे घ्यावे लागले. माफी मागावी लागली. इतिहासात असे कधी घडलं असेल असं वाटत नाही. अतिशय सभ्य भाषेत लोकशाही मार्गाने आपण अनेकांनी संपादकांना प्रतिक्रिया पाठवून त्यांचे आरोप खोडून काढले. आपली भाषा कडक होती पण त्यात द्वेष अन विखार नव्हता. मदर तेरेजा ह्यांचे कार्य अन विचार आपल्या कृतीत होते. हा ख्रिस्ती मूल्यांचा विजय आहे.

वसईतील अनेक चळवळीचे नेतृत्व केलेल्या धर्मगुरूंशी मागे एकदा सामाजिक प्रश्नांवर बोलण्याचा योग आला होता. आपली लोकसंख्या कमी होत असताना मतपेटीतून व्यवस्था परिवर्तन करणे नजीकच्या काळात अशक्य आहे, ही चिंता तेव्हा त्यांनी व्यक्त केली होती. परंतु समाजातील बुद्धीजीवी गटाने एकत्र येऊन लेखणीचा वापर करून, माहिती अधिकार आणि जनहित याचिकेचा आधार घेऊन जर व्यवस्थेविरोधात लढा दिला तर आपण आपल्यावरील अन्याय दूर करू शकतो व व्यवस्थेकडून आपले हक्क मागू शकतो, असे ठाम विचार त्यांनी व्यक्त केले होते.

आज लोकसत्ताने आपले संपादकीय मागे घेऊन जी जाहीर माफी मागितली आहे, ते धर्मगुरूंनी सुचवलेल्या कायदेशीर मार्गाचं प्रेरणादायक उदाहरण आहे.


सचिन मेंडिस  

No comments: