Thursday, August 4, 2016

आभाळमाया

आभाळमाया

मान वर करून आभाळाकडे पाहीले. चांदण्यांचे थवे आभाळावर अलगदपणे विहार करत होते. चंद्र दिसत नव्हता. बहुतेक ढगाआड विश्रांती घेत असावां. तरीही त्याची श्वेत काया ढगाआडून शुभ्र प्रकाशाची मंद फुंकर मारत होती. किती विलोभनीय सौंदर्य आभाळांच. अवघ्या धरतीला कवेत घेणारं. आभाळमाया म्हणतात ती हीच असेल का?

किती दिवसानंतर आभाळाकडे पाहीलं होतं, तेही इतकं प्रेमाने. सवडीने आभाळाकडे पाहायचं विसरून गेलोय आपण. आपण म्हणजे आपली अख्खी नवी पिढीचं. आम्ही त्या नवीन पिढीतले थोडे वयस्कर. आभाळाला पारखे झालोयं असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. आजकाल मोबाईलमुळे मान वर करण्याची सवयचं सुटुन गेलीयं. तेच कारण असावं, पण ते एकमेव कारणही नसावं.

चिंता कुणाला नाहीत? राजापासून रंकापर्यत अन दिल्लीपासून गल्लीपर्यत सगळेचं जीव चिंतेचं गाठोडं घेऊन जगतांयत. प्रत्येकाच्या चिंतेचं वर्तुळ गरजांच्या त्रिज्येवर अवलंबून. जगण्याची अशी सोपी भूमिती.
पदोपदी चिंता वाहणारी नवी पिढी. दुर्भाग्य म्हणजे आईवडिलांच्या कुशीत शिरून चिंता हलक्या कराव्या तर कुठलंस अनामिक अवघडलेपणं आलेलं. मोठे झाल्याची किंमत म्हणा पाहीजे तर. अशा वेळी आभाळाचा आधार घ्यावा का? विसरून गेलोयं आपण. नीरव शांततेत गाव अंगावर झोपेची चादर ओढत असताना आपण आभाळाच्या स्वाधीन व्हायचं. किती अनुपम,अलौकीक, अतुल्य आभाळ. बघत बसायचं आभाळाचं अमर्याद रूप. बोलायचं त्याच्याशी. एक मूक संवाद. आभाळांच्या लेकरांचा त्याच्या आईशी. सांगावं आभाळाला आपलं दुखणं-खुपणं. चुका कबूल कराव्या. मन हलकं करावं. मागावं त्याच्याकडुन आपलं अडलेलं मागणं. आभाळाची ओंजळ भरलेलीचं असते. आपल्याला देण्यासाठी. आपण मात्र दुरावलेले असतो, आभाळमायेपासून. खरचं तुटलीयं का आपली नाळ आभाळापासून?
चंद्र ढगाआडून बाहेर आलायं. चांदण्याचा सडा अंगणी सजलाय, तोही न मागता. चंद्र खुणावतोयं आपल्याला. आभाळाबरोबर तुटलेली नाळ जोडण्यासाठी, तो साद घालतोयं. आभाळ वाट पाहतेयं आपली. त्याच्या ओंजळीतून आपली ओंजळ आभाळमायेने भरण्यासाठी. गरज आहे एका नजरेची, आभाळाकडे लागलेली.

सचिन मेंडिस

No comments: