Wednesday, August 12, 2015

न सांगता निघून गेलेले !!

न सांगता निघून गेलेले !!
                                           सचिन मेंडिस

मुलं वाट पाहत होती, पप्पा हॉस्पिटल मधून बरे होऊन घरी परत येण्याची. पण पप्पा न सांगता, मुलांना न भेटता निघून गेले. पप्पा ठीक आहेत, लवकरच घरी परत येतील अशा भाबड्या आशेने पप्पाच्या येण्याची आतुरतेने वाट पाहणारी ती निरागस बालके, पप्पाच्या वाटेवर डोळे लावून बसली होती. पण पप्पा काही आले नाही. पप्पाच्या जाण्याची बातमी आली. बातमी पण सरळ आली नाही, आढेवेढे घेत. घरी जमलेली नातलगांची गर्दी अन पाठून आलेला आईचा काळीज चिरणारा हंबरडा. कुणी म्हणाले पप्पा सिरियस आहेत, कुणी म्हणाले ऑपेरेशन सुरु आहे पण तो क्षणभराचा आधार. वसंताच्या चाहुलीने वृक्षाने पालवीची तयारी करावी अन दुर्दैवाने वृक्षाने पेट घ्यावा असा सगळा प्रकार. मोठ्या काळोखाची सुरुवात म्हणा.

आपल्याला हवीहवीशी वाटणारी, आपल्यात वावरणारी, आपली माणसे अशी न सांगता का निघून जातात? कोणतीही चाहूल लावून न देता. एक प्रचंड पोकळी निर्माण करून, तीही कधीही भरून न निघणारी. अन ती निरागस बालके, त्यांची कशी समजूत घालावी? त्यांच्या निष्पाप प्रश्नांची उत्तरे कशी शोधावी? गेल्या २-३ वर्षात अशा अनेक व्यक्ती न सांगता मनाला चटका लावून निघून गेल्या. आईच्या मायेला पारखी झालेली इवलीशी पाखरे पाहिली कि मन पिळवटून निघते. ज्या घरट्यात आई नाही, त्या घरट्यात पिलांची चिवचिव कोण ऐकत असेल? कि नियतीने अकाली लादलेल्या अनाथपणामुळे हरवली असेल त्यांची चिवचिव? जेव्हा १२-१३ वर्षाची छकुली ख्रिस्ताच्या समोर हात जोडून 'माझी आई कधी परत येणार'? असा प्रश्न ख्रिस्तासमोर मांडत असेल तेव्हा ख्रिस्त काय उत्तर देत असेल तिला? कि तोही निरुत्तर होत असेल आपल्यासारखा? अन देवाघरी गेलेली ती तरुण आई, देवराज्यातून आपल्या मुलांचे अश्रू पाहताना किती व्याकूळ होत असेल? किती तुटत असेल आतून.

न सांगता निघून गेलेल्या त्या व्यक्तीचे, मृत शरीर चर्चला नेण्यासाठी घरून उचलताना होणाऱ्या त्या आर्त किंकाळ्या अन ते हंबरडे. किती वेदना किती यातना त्या क्षणात. आयुष्य किती क्षणभंगुर आहे ह्याची जाणीव करून देणाऱ्या. अन प्रेतयात्रेबरोबर चालताना कानी पडणारे 'माती असशी मातीस मिळशी' हे गीत, किती त्रासदायक. संपूर्ण समाजाला रडू आणणारे. क्षणभर काळाला थांबवणारे. अलीकडेच निघून गेलेल्या त्या तरुणाची विधवा पत्नी जेव्हा घरच्यांना ओक्साबोक्शी रडून सांगते कि 'मला माझ्या नवऱ्याची खित आली आहे' तेव्हा त्या खितीला कोणते उत्तर असेल? कि तिलाही माहिती असेल कि फक्त खित परत परत येणार पण तो? तो परत येणार नाही. एक अंधारलेल काटेरी सत्य. काळजात खुपणार, डोळ्यांच्या पापण्या सदोदित ओल्या ठेवणार.

आपण कितीही म्हणो 'जो आवडतो देवाला, तोचि आवडे देवाला'. पण हे बोल अन समजुती क्षणभराच्या, वरवर फुंकर मारण्यासाठी. काळजाच्या वेदना, हृदयाच्या जखमा फक्त काळावर सोडून द्यायच्या. म्हणतात कि देवाच्या योजना ह्या मानवाच्या योजनेपेक्षा वेगळ्या असतात. पण अकाली निघून जाणाऱ्या व्यक्तींकरिता देवाच्या योजना मानवांच्या योजनेशी मिळत्याजुळत्या का नसाव्या? निदान मायेचे छत्र हरवलेल्या त्या चिमुरड्यांसाठी तरी.

No comments: