Thursday, January 22, 2015

मूर्तीपूजा करू नकोस !!

मूर्तीपूजा करू नकोस !!
-------------------------------- सचिन मेंडिस

काल फेसबुक चाळत असताना आदरणीय फादर Francis D'Britto ह्यांची खालील पोस्ट वाचनात आली.

"समाजात मूर्तीपूजा वाढत चालली आहे का? जो उठतो तो स्व:ताचे, आपल्या बायकोचे फोटो पोस्ट करीत आहे. काही फोटो इतके रोमांटिक असतात कि ते केवळ दोघांच्याच नजरेसाठी असतात. तुम्हाला काय वाटते?"

फादरांनी इथे २ मुद्दे उपस्थित केलेले आहेत.

१) समाजात मूर्तीपूजा वाढत चालली आहे का? जो उठतो तो स्वताचे, आपल्या बायकोचे फोटो पोस्ट करीत आहे.

२) काही फोटो इतके रोमांटिक असतात, कि ते केवळ दोघांच्याच नजरेसाठी असतात.

ह्यातील दुसऱ्या मुद्द्यावर आक्षेप घेता येऊ शकतो तरीही 'रोमांटिक' हि संकल्पना हि व्यक्तीसापेक्ष असल्याने प्रत्येकाच्या नजरेतून त्याची व्याख्या अन भावार्थ हे वेगळे असू शकतात. 'रोमांटिक' अन 'अश्लील' ह्यात अस्पष्टता जरी असली तरी मुलभूत फरक नक्कीच आहे. फेसबुकवर काही अपवाद वगळले तर फोटो अपलोड करणाऱ्या व्यक्ती ते तारतम्य पाळतात, असे मला वाटते. बाकी फेक अकौंटवरून पोस्ट होत असलेल्या वादग्रस्त फोटोवर चर्चा करणे अयोग्य ठरेल.

आता सविस्तरपणे पहिल्या मुद्द्याविषयी,

समाजात मूर्तीपूजा वाढत चालली आहे का? हा प्रश्न खरे तर धर्मगुरुकडून अपेक्षित नव्हता. खरतरं समाजात फार पूर्वीपासून मूर्तीपूजा चालत आलेली असून धर्मव्यवस्थेने अप्रत्यक्षपणे ह्या मूर्तीपूजेला व्यासपीठ अन धार्मिक अधिष्टान प्राप्त करून दिले आहे. आजपर्यंत चर्च व्यवस्थेत कोणत्याही धर्मगुरूंनी पुढाकार घेऊन 'मूर्तीपूजा' म्हणजे काय? आणि 'एकाच देवाला भज, मूर्तीपूजा करू नकोस' ह्या पहिल्या आज्ञेतील परमेश्वराला 'नको असलेली' मूर्तीपूजा कोणती ह्याचा स्पष्ट उल्लेख अन निराकरण केलेले नाही. आज प्रत्येक धर्मात 'मूर्तीपूजा' हा आराधनेचा मुख्य पाया बनलेला आहे अन दुर्दैवाने ज्या ख्रिस्ती श्रद्धेत परमोच्च असलेल्या दहा आज्ञेत 'मूर्तीपूजा करू नकोस' असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे, त्या चर्च व्यवस्थेत सुद्धा उघडपणे मूर्तीपूजा केली जाते अन ती थांबविण्याऐवजी मूर्तीभोवती गर्दी जमविण्यासाठी कार्यक्रम आखले जातात.

दुसरा मुद्दा म्हणजे फादरांनी चर्चेत घेतलेली फेसबुकवरील 'फोटो अपलोड मूर्तीपूजा'. मुळात फेसबुक हे मुक्त व्यासपीठ आहे. आपल्या जीवनात घडणारया गोष्टी लोकांना सांगणे अन दुसरयांच्या आयुष्यात काय चालले आहे ह्यांचा कानोसा घेणे हा फेसबुकच्या यशाचा फोर्मूला आहे. दुसऱ्याच्या खाजगी जीवनाबद्दल असलेली कुतुहुलता अन आपली 'सुवार्ता' लोकांपार्यात पोहचवून त्यातून मिरवण्याची हौस हे मानवी स्वभावाचे भाग आहेत. वरकरणी हे सर्व प्रकार उथळ जरी वाटत असले, तरी बदलत्या परिस्थितीत अप्रत्यक्षपणे हे सोशल जीवनाचे भाग बनले आहेत. आज देशविदेशातील अनेक विद्वान, बुद्धिमान, पुरस्कारविजेत्या मोठ्या महनीय व्यक्तीनी 'सोशल मिडिया'ला आपले केले आहे. लोकांनी निवडून दिलेले लोकशाही सरकार देखील ह्या बाबतीत मागे नाही.

फादर फ्रान्सीस दिब्रिटो ह्यांच्या पोस्टला प्रतिक्रिया देताना अनेक व्यक्तींनी 'सुवार्ता' मासिकाचा उल्लेख केलेला आहे. अनेकांच्या मते आज सुवार्ताचा आर्थिक कणा हा ह्या मासिकामध्ये ५०% पानात छापल्या जाणारया जाहिरातीवर अवलंबून आहे. ज्यातील बहुतेक पाने ही फोटोंनी भरलेली असतात. स्पष्ट सांगितले तर फोटो जाहिरात देऊन आपले सुख अन दुक्ख जगाला सांगण्याचा फेसबुकी प्रकार सुवार्ताद्वारे आज अनेक वर्ष चालू आहे. 'सुवार्ता'सारख्या दर्जेद्दार मासिकात ५०% पाने जाहिरातीसाठी देणे हा खरे तर चर्चेचा स्वतंत्र विषय आहे पण फादरांनी मांडलेल्या मुद्द्याला सुवार्ता मासिक अगदी जवळून निगडीत असल्याने त्याचा उल्लेख टाळणे, हे सुवार्तावर अन्याय केल्यासारखे होईल. मागच्या महिन्यात सकाळ ह्या वृत्तपत्रात वसईतील लेखक स्टॅन्ली गोन्साल्वीस ह्यांनी जुने गोवे येथे पार पडलेल्या सेंट फ्रान्सिस झेवियर ह्यांच्या शवदर्शनावर 'शवदर्शन कि प्रदर्शन' असा ख्रिस्ती धार्मिक व्यवस्थेला प्रश्न विचारणारा व शवदर्शन कसे चुकीचे व मूर्तीपूजेला प्रोत्साहन देणारे आहे, असा उहापोह करणारा लेख लिहला होता. त्यावर विरोधी प्रतिक्रिया उमटल्याचे ऐकिवात नाही.

अलीकडे 'पिके' सारख्या चित्रपटाने 'मूर्तीपूजा' ह्या विषयावर मार्मिक भाष्य करून भोळ्या भाबड्या लोकांच्या श्रद्धेला हात घालून आर्थिक प्राप्ती करणाऱ्या धार्मिक व्यवस्थेवर ताशेरे ओढले होते. लोकांनाही हा विषय भावल्याने त्याला प्रचंड प्रतिसाद दिला होता. आज खरे पाहिले तर धर्मव्यवस्थेतून मूर्तीपूजा दूर करून लोकांना 'धर्मशास्त्रातून नितीशास्त्राकडे' नेण्याची गरज आहे. आजच्या युगात मोठी महागडी मंदिरे, देवांच्या मुर्त्यांची स्थापना, मूर्त्यांना नैवद्य, देवांची मिरवणूक, मूर्त्यांच्या दर्शनासाठी २४ तास रांगा व रांगेतून मुक्तीसाठी वशिलेबाजी ह्या सर्व भौतिक पुजेअर्चेवर मुक्तपणे चर्चा घडवून आणण्याची गरज आहे. 'पिके'च्या निम्मिताने ती जरी घराघरात सुरु झाली असली तरी ती चित्रपटापुरता सीमित न राहता 'विषयावर' झाली पाहिजे. आजकाल प्रवाहाविरुद्ध लिहिणे अन तेही धार्मिक विषयावर लिहिणे हे 'धर्माविरुद्ध' समजले जाते. सहसा अशा विचाराला जाहीरपणे समर्थन करण्याच्या फंदात कुणी पडत नाही. अशा विषयावरचे विचार मनात दाबून ठेवून घुसमट वाढवण्यापेक्षा व्यक्त केले तर हलके वाटते. फादरांच्या पोस्टने ही संधी दिली म्हणून बरे वाटले, त्यांनी माडलेली चर्चा थोडी पुढे नेऊन नव्या पिढीचे मुर्तीपुजेबद्दल असलेले एकूणच मत चर्चेत घेण्याचा हा एक प्रयत्न आहे.

No comments: