Wednesday, February 19, 2014

खरचं आपण लग्न सोहळे एन्जोय करतो का?


खरचं आपण लग्न सोहळे एन्जोय करतो का?

थंडीचे तीन महिने म्हणजे आपले कुपारी लोकांच्या लग्नाचा हंगाम. विरार गाडीत जशी चेपून गर्दी असते तशी सर्व लग्ने ह्या ३ महिन्यात चेपून भरलेली असतात. त्यातल्या त्यात नोवेंबर मध्ये पावसाने एक दोघांना दगा दिल्याने बरीच मंडळी त्या महिन्यावर भरवसा ठेवत नाही. मग साहजिकच डिसेंबर अन जानेवारी मध्ये खच्चून लग्ने पुढ्यात येतात. घरात शोकेस मध्ये आमंत्रण पत्रिकेचा नुसता सडा पडलेला असतो. लहानपणी आमंत्रण पत्रिकेची वाट पाहणारे मन आजकाल ह्या पत्रिकेचा धसका घेते.

एकाच वेळेला ३-४ लग्ने, एक आगाशीला दुसरे उमराळे अन तिसरे निर्मळ म्हणजे तारेवरची कसरत. गाडी उचलायची अन तिन्ही ठिकाणी विजीट करायची. नक्की म्हणजे काय करतो आपण तर पहिले आहेराच्या रांगेत उभे राहयचे अन १० सेकंदाकरिता आपले तोंड वधू-वरांना दाखवायचे अन मग जेवणाच्या रांगेत प्रस्थान करायचे. तिकडे तास भर मेहनत करून मग दुसर्या ठिकाणी पळायचे. जीवाचे हाल नुसते. जो काही आनंद जुन्या काळात मिळायचा त्याचा लवलेश हि कुठे नाही. तसेच जेवणातले वेगळे वेगळे मसाले खाऊन शरीराची होणारी हानी तर वेगळीच.

मग मन विचार करते, खरचं आपण लग्न सोहळे एन्जोय करतो का? रविवारचा सुट्टीचा म्हणजे आरामाचा दिवस अशा पळापळी मध्ये निघून जातो अन सोमवार आ वासून पुढे येतो.
काही ठिकाणी एकत्र कार्यक्रम केल्याने वरील गोष्टी बर्याच प्रकारे टाळता आल्या, ते कौतुकास्पद आहे पण त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. सगळेच सोहळे असे 'Common Reception' अपेक्षित करणे, हे काल्पनिक ठरेल.

तूर्तास गाडी उचला अन पळा एकीकडून दुसरीकडे !

No comments: