Wednesday, February 19, 2014

sugandhit Athvani

सुगंध अन संगीत ह्या मानवी मनाला वेड लावणाऱ्या गोष्टी. चांगला सुगंध अन चांगले संगीत मन प्रफ़ुलित करते. प्रत्येक व्यक्तीच्या भूतकाळाशी, सरून गेलेल्या आठवणीशी सुगंधाचे व संगीताचे एक अनामिक नाते असते. एक विशिष्ट संगीत किव्हा एका विशिष्ट गोष्टीचा सुगंध थेट मनाला भूतकाळच्या प्रसंगाकडे घेऊन जातो अन काळाच्या वाऱ्यासंगे विझून गेलेल्या आठवणीच्या समयी उजळून निघतात.

गावातली गावठी बदामे, लालबुंद झालेली. कधीतरी हातात घेऊन हुंगून पहा. कोणती आठवण देतात? शाळेत असताना घोसाळी गावातील मित्राने पिशवी भरून आणलेली बदामे. पावसाळ्यात चिंब भिजलेली, त्याचा वर्गभर पसरलेला गंध. आठवतो का? मग त्या बदामाशी जोडलेल्या आठवणी. तिच्यासाठी राखून ठेवलेली मोठी टपोरी बदामे, बदामाच्या रसाने लाल झालेला शर्टचा वरचा खिसा अन नंतर घरी जाऊन दाराच्या फटीमध्ये बदामाची बी ठेवून त्यातून काढलेला बदामाचा पांढरा गर. आठवले असेल ना?  एका बदामाच्या वासाचा सुगंध किती आठवणी फुलवतो, मनाला झुलवतो! कधी घेऊन बघा नवीन वही किव्हा पुस्तकाचा गंध...काय आठवते? अख्खी शाळा उभी राहते त्या गंधात. रातराणी तर माझी प्रेयसी आहे, तिचा सुगंध मादक वाटतो. शाळा संपून कॉलेज मध्ये प्रवेश घेत असताना मुलीविषयी वाटणारं सुप्त आकर्षण अन चांदण्या रात्रीच्या सोबतीला त्या गोड विचारात वातावरण मोहरून टाकणारी फुललेली रातराणी. कधी रातराणीचा सुगंध आला तर थेट तिचीच आठवण निघते. ते अल्लड दिवस, ती हुरहूर सगळ कसं डोळ्यासमोर गंधाळते. क्षणभर ती हसल्याचा भास होतो.

जसं सुगंधाच तसंच संगीताच. संगीत म्हणजे गाणी, विशेष करून जुनी गाणी. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एखादे गाणी ओठी रुळते अन ते थेट त्या काळाशी विणले जाते. 'सून सायबा सून, प्यार कि धून'  हे गाणे अजूनही कधी कानी आले, कि मी थेट बालपणीच्या काळात लग्नाच्या शुक्रवारच्या दिवसात पोहचतो. मांडवाच्या दिवसाआधी भोंगा लावून मोठ्या सीडीवर हे गाणे वाजवले जाई अन मग हक्काचे 'तोहफा तोहफा लाया लाया' हे गाणे धाकट्या भावासारखे पाठी वाजे. हि गाणी आजही ऐकली कि डोळ्यासमोर हरवलेला गाव सापडतो. ती पताके, नारळाच्या पात्यापसून बनवलेले डेकोरेशन, भेरलीच्या झाडाच्या लांब दोऱ्या अन मांडवाला लावलेले झिरो बल्ब डोळ्यासमोर चमकतात. १९९४ साली माझ्या दहावीच्या सेंड- ऑफ च्या वेळी आम्ही LD रिसोर्तला गेलो होतो अन त्या वेळी तिथे 'डर' चित्रपटातील 'जादू तेरी नजर, खुशबू तेरा बदन' हे गाणे वाजवले जात होते. आज कधी FM वर हे गाणे कानी पडले कि दहावीच्या सेंड- ऑफची अन न मिळालेल्या किरण ची प्रकर्षाने जाणीव होते. देवळातील गाणी तर खूप मन प्रसन्न करतात. ते निरागस दिवस अन तेव्हा आपला वाटणारा देव ह्याच्याशी संवाद घडवून आणतात. 'रूपवंत फुले' हे गीत आजही ऐकले कि मावलीच्या सणाच्या दिवसात, तिच्या चरणी वाहण्यासाठी शेतीवाडीतून गोळा केलेली फुले मनात फुलतात. तो इवलासा रुमाल, त्यात गच्चुन दाबलेली गोंडाळे अन अबोलीची फुले सरकन आठवणीच्या रुमालातून हृदयात डोकावतात.    

प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या भूतकाळाशी, सरून गेलेल्या आठवणीशी सुगंधाचे व संगीताचे एक अनामिक नाते असते. एक विशिष्ट संगीत किव्हा एका विशिष्ट गोष्टीचा सुगंध थेट मनाला भूतकाळच्या प्रसंगाकडे घेऊन जातो अन आपल्या बाबतीत हि ते खरे असेल. तुमच्या आठवणीतील फुले अन गाण्याच्या ओळी वेगळ्या असतील पण मनाला वाटणारा सुखद आनंद मात्र नक्कीच सारखा असेल. अजून बऱ्याच गोष्टीचा उळेक्ख करता येईल पण तूर्तास आज इतकंच. एक छान कल्पना डोक्यात फुललीय...येत्या शनिवारी रात्रीच्या प्रहरी जेव्हा जेवल्यानंतर पायपीट होईल, तेव्हा गावातील वेशीवर असलेल्या रातराणीच्या फुलाला हुंगत मोबाईलवर 'जादू तेरी नजर, खुशबू तेरा बदन' हे गाणे ऐकायचं पुन्हा पुन्हा अन तिचा  चेहरा पुन्हा आठवायचा. कशी छान हसेल ती, पूर्वीसारखी..!!

सचिन मेंडीस  

No comments: