Wednesday, February 19, 2014

डोळस आंधळे !

डोळस आंधळे !!

मागच्या आठवड्याची गोष्ट. जोगेश्वरी स्टेशनला जिन्यावरून खाली उतरत होतो इतक्यात एक आंधळा व्यक्ती प्लेटफॉर्म कडे जाताना दिसली. हलकेच त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला जाण्याचे ठिकाण विचारले. त्याला चर्चगेट स्लो पकडून लोअर परळला उतरायचे होते व तिथून कॉलेज गाठायचे होते. आम्ही निश्चित जागी पोहचलो. मलाही अंधेरी डाऊन जायचे होते अन गाडीला वेळ होता म्हणून मी त्याची चौकशी सुरु केली. तो जन्माने आंधळा नव्हता पण एका अपघाताने त्याचे डोळे निकामी झाले होते. आता सध्या तो अंधांच्या कॉलेज मध्ये जात होता.

इतक्यात गाडी आली अन मी त्याला म्हटले 'तुझी चर्चगेट गाडी आली', तर तो उत्तरला 'हि चर्चगेट फास्ट आहे, मला स्लो पकडायची आहे'. मी आश्चर्याने त्याला विचारले 'तुला कसे ठाऊक?'. तर तो हसत म्हणाला 'Anouncement झाली ना आता'. खर सांगितलं तर मी काही ती ऐकली नव्हती, कारण माझे डोळे Indicator पाहू शकत होते. मी त्याला म्हटलं कमाल आहे बुवा तुमची. तर तो म्हणाला, 'दादा आता आमचे कान आणि नाक हेच आमचे डोळे'. आम्ही वासावरून अन आवाजावरून सर्व गोष्टीचा अंदाज घेतो. रस्त्यावर कितीही रहदारी असली तरी वाहनांच्या आवाजाने आम्हाला रस्ता पार कसा करावा ते कळते. मी स्तब्ध झालो. इतक्यात गाडी आली अन मी त्याला म्हटले 'तुझी चर्चगेट गाडी आली', तर तो उत्तरला 'हि चर्चगेट फास्ट आहे,'anouncement झाली ना आता'. मी Indicator बघितले अन माझी मलाच लाज वाटली. मी आंधळ्या व्यक्तीला मदत करायला निघालो होतो पण मी किती अपंग आहे याची जाणीव मला होऊ लागली होती.

शेवटी मी त्याला विचारले 'भाऊ, कधी अपघात होण्याची भीती नाही का वाटत?'. तर तो ताबडतोब बोलला 'दादा, आजपर्यंत रेल्वे अपघातात कधी आंधळा मेल्याचं ऐकलं आहे?, मरतात ते सगळे डोळे असून आंधळे बनलेले लोक'. मला थोबाडीत बसल्यासारखे झाले. त्याच्या हातातील काठीची जागा चुकीची वाटू लागली. त्याने मला बाय करून नुकताच आलेल्या चर्चगेट स्लो मध्ये बसून तो निघून गेला, मी सुन्न झालो. मी स्टेशन वर नजर टाकली. कान असलेल बहिरे अन डोळे असलेले आंधळे मला स्टेशन वर सर्वत्र दिसू लागले अन मला त्या आंधळ्या व्यक्तीच्या ताकतीची अन आपल्या अपंगत्वाची जाणीव झाली.

सचिन मेंडीस

No comments: