Monday, February 9, 2015

चिल्लर


आज सकाळी कामावर निघायला उशीर झाला अन घाईत निघाल्याने खिशात पैसे घेण्याचे विसरून गेलो. उशीर झाल्याने नेहमीची ७.१५ ची ट्रेन आज मिस झाली. स्टेशनला पोहोचल्यावर खिशात पैसे न घेतल्याची जाणीव झाली. नशिबाने ट्रेनचा पास माझ्या नेहमीच्या बॅंगमध्ये असल्याने तशी जास्त धास्ती नव्हती परंतु जोगेश्वरी स्टेशन वरून ऑफिसला जाण्यासाठी शेअर रिक्षाचे ९ रुपये हाती असणे गरजेचे होते. नेहमीची ट्रेन मिस झाल्याने आजूबाजूच्या गर्दीत १०-२० रुपये कुणाकडून उसने घेण्यासारखे कुणी हक्काचे नव्हते. मी सहज म्हणून बॅंगच्या एका खिशात हातात हात घातला अन त्यात काही चिल्लर मला दिसली. मी खिशात हात घालून चिल्लर वर काढली तर त्यात एक ५ रुपयाचे नाणे अन बाकी १ रुपयाची चिल्लर मला दिसली. ५ रुपयाचे नाणे पाहून मला खूप हायसे वाटले.

जोगेश्वरी स्टेशनला ट्रेन मधून उतरून मी ब्रिजवर चढलो. रिक्षात बसण्यापूर्वी चिल्लर मोजावी म्हणून ब्रिजवर चालता चालता मी ती चिल्लर बॅंगमधून बाहेर काढायला गेलो अन दुर्दैव माझे की ५ रुपयाचे नाणे अन बाकी २-३ कॉईन माझ्या हातातून खाली निसटले. मला काही कळायच्या आत हातातील ५ रुपयाचे नाणे घरंगळत ब्रिजच्या खाली असलेल्या केबिनच्या छतावर जाऊन पडले. दुष्काळात तेरावा महिना जे काही सांगतात तसे माझ्या बाबतीत त्या क्षणाला घडत होते. जोगेश्वरी पूर्वेला स्टेशन जवळ ATM नसल्याने आज पायी जावे लागेल कि काय असे क्षणभर माझ्या मनात आले. मी हातात उरलेले कॉईन मोजू लागलो अन सुखद धक्का बसला. २ रुपयांची ३ अन १ रुपयांची ४ नाणी असे एकूण १० रुपये माझ्या मुठीत होते. मला क्षणभर 'दुनिया मुठ्ठी में' वाटू लागले. बागच्या खिशात अनेक दिवस अडगळीत पडलेली चिल्लर आज कामी आली होती. ज्या ५ रुपयाच्या नाण्यावर विश्वास ठेऊन मी विरारहून निघालो होतो त्त्यानेही ऐन वेळेला दगा दिला होता.

आयुष्याचं पण असंच असते नाही? मोठ्या नोटासारखी भासणारी श्रीमंत, प्रतिष्टीत, वलयांकित माणसे आपल्याला हवीहविसी वाटतात. त्यांच्या सहवासात आपला उद्धार होईल असे मनोमन वाटते. सुंदर, चकाचक दिसणारी, उंची वस्त्रे परिधान करणारी ही मोठी माणसे संकटात आपल्याकरिता पटकन धावून येतील असे वाटते. दुसऱ्या बाजूने विचार करता पैशाने गरीब, चर्चेत नसलेली, बिनचेहऱ्याची माणसे आपल्या आयुष्यात असूनही तशी आपल्या खिजगणतीतही नसतात. आपल्या दृष्टीने ती चिल्लर असल्याने त्यांच्या असण्याची, त्यांच्या जगण्याची आपण योग्य ती दखल घेत नाही, त्यांना पुरेसा वेळ अन सन्मान देत नाहीत. पण वास्तव काय आहे? अडीअडचणीला कोण धावून येतात? मोठ्या नोटासारखी भासणारी श्रीमंत, प्रतिष्टीत, वलयांकित माणसे कि पैशाने गरीब, चर्चेत नसलेली, बिनचेहऱ्याची चिल्लर माणसे? वर नमूद केलेल्या एका घटनेने एक शाश्वत वास्तव पुन्हा अधोरेखित केलं होत अन ते म्हणजे नाती अन मैत्री जोडताना श्रीमंत, प्रतिष्टीत, वलयांकित ह्या 'दिखाऊ' निकषावर न भाळता, निस्वार्थीपणे अडीअडचणीला धावुन येणारी चिल्लर पण 'टिकाऊ' बिनचेहऱ्याची माणसे आयुष्याच्या एका खिशात जपणे गरजेच आहे. छोटी असली तरीही तीच खरी नाती जपतात.

पुरस्कार

प्रसिद्ध साहित्यिक 'दुमा लुद्रिक' ह्यांना मानाचा 'शिमा कुरेल' पुरस्कार जाहीर !

१९७० च्या दशकात क्रांतिकारी लिखाण करून कुपारी साहित्यात खळबळ माजवणारे प्रसिद्ध साहित्यिक दुमा लुद्रिक ह्यांच्या 'तांबडा धान' ह्या कादंबरीला मानाचा 'शिमा कुरेल' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. १९७० च्या दशकात त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकाने कुपारी वाचकांना मोहीनी घातली होती. 'मोडलेलो मांडव' ही त्यांची कादंबरी बेधडक लिखाणामुळे त्या काळी भलतीच गाजली होती. 'मिन्गरसा दार', 'दापुड्सो हिंदाळो', 'माटुंगा गेलो ते', 'आडसळ' ही त्यांची प्रसिद्ध पुस्तके अजूनही लोकांच्या स्मरणात आहेत. 'माटुंगा गेलो ते' ह्या पुस्तकातील 'पेद्रू अण्णा' ह्या पात्रामुळे त्या काळी वाद निर्माण होऊन वसई सेशन कोर्टाने त्या पुस्तकावर बंदी आणली होती, जी पुढे मुंबई हायकोर्टाने मागे घेतली. १९८० साली त्यांनी लिहिलेल्या 'फरसुल्या' ह्या कविता संग्रहाला महाराष्ट्र शासनाचा साहित्यभूषण पुरस्कार लाभला होता. ह्या दीर्घकविता संग्रहात त्यांनी अठवरा राहिलेल्या फरसुल्या ह्या व्यक्तीरेखेचे करुण चित्रण केले होते. त्याचप्रमाणे त्यांनी अलीकडे लिहिलेल्या 'आय सो नवरो' ह्या नाटकावर दक्षिणेत मनिरत्नम ह्यांनी 'आय सो हसबंड' हा चित्रपट बनवण्याचे नुकताच घोषित केले आहे.

प्रवाहाविरुद्ध विचार मांडणी व वास्तव काळाला अभिप्रेत लेखन ह्या गुणांमुळे दुमा लुद्रिक ह्यांनी कुपारी साहित्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. आगामी काळात मौज प्रकाशन तर्फे त्यांचा 'हिपना तापला' अन 'तू बाबा डोखा' हे दोन पुस्तके प्रकाशित होणार आहेत.येत्या रविवारी सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अन विचारवंत 'अतू पिरेल' ह्यांच्या हस्ते ओलांडा येथे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. ह्यावेळी 'गावठी ताता' ह्या मनोरंजक नाटकाचे आयोजन केले आहे.

Monday, February 2, 2015

Naahi....!!


पानगळ

कधी काळी बहरलेली
झाडावरील पाने
आज शुष्क होऊन
खाली कोसळत असतात !!

पुन्हा बहरण्यासाठी की
एक जीवनाचे सत्य म्हणून
माहित नाही !!

ही अनामिक पानगळ
अन लांब गेलेल्या सावल्या
डोळ्यासमोर निष्पर्ण होते
एक फांदी न फांदी !!

बहरताना स्व:तात गुंतलेल्या फांद्या
आज विषण्ण, एकाकी
सांत्वन करायला फांदीवर
एक चिटपाखरू नाही !!

डोळ्यादेखत होते
ही जीवघेणी पानगळ
वावटळीत सापडलेली पाने
अंगणभर विखुरतात
मनही विखुरते पानांनसोबत !!

विखुरलेल्या पानांचा सडा
एकत्र केला जातो कोपरयात
अन लावली जाते
हलकेच काडेपेटी
फांदीच्या डोळ्यादेखत !!

मी स्तब्ध, मुकाटपणे
पाहतो नवी पानगळ
फांद्यांचे हुंदके
ऐकू येत नाहीत !!

सरांचा वाढदिवस अन मुलांचे व्यवस्थापन !!

चौथीची मुलं म्हणजे अवघ्या ८-९ वर्षाचे वय. आपल्या भाषेत लहान मुलं. पण आपल्याला जितकी ही मुलं लहान वाटतात त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त ही मुलं हुशार अन चौकस आहेत, असे नुकत्याच आलेल्या माझ्या अनुभवावरून सांगावेसे वाटते. अन हा अनुभव आहे सरांच्या वाढदिवसाचा. घोसाळी गावातील फ्रान्सीस सर नंदाखाल शाळेतील चौथीच्या मुलांचे स्कॉलरशिपचे क्लासेस घेतात. ते मुलांमध्ये इतके प्रिय आहेत कि मुलाना शाळेतून घरी आल्या आल्या स्कॉलरशिपच्या क्लासचे वेध लागतात. माझी मुलगी स्कॉलरशिपच्या क्लासला त्यांच्याकडे जाते. फ्रान्सिस सरांनी मुलांवर अशी काय जादू केली आहे की सर्व मुलांचा उत्साह जो क्लासच्या पहिल्या दिवशी होता, तो अजूनही टिकून आहे.

एक आठवड्या अगोदर माझी ९ वर्षाची मुलगी माझ्या कडे आली अन म्हणाली कि मला तुमची हेल्प पाहिजे. तिला विचारल्यावर मला कळाले कि त्यांच्या अतिप्रिय फ्रान्सिस सरांचा ३१ जानेवारीला वाढदिवस असून मुलांनी त्यांना काहीही कल्पना न देता शाळेच्या दिवशी म्हणजे ३० जानेवारीला क्लासच्या वेळेत वर्गात वाढदिवस साजरा करून सरांना सरप्राइज देण्याचे ठरवले आहे. मी तिला खर्चाचे विचारले तेव्हा असे समजले कि प्रत्येक मुलांनी प्रत्येकी ५० रुपये कंट्रीब्युशन काढून जमलेल्या पैशातून केक, कोल्ड ड्रिंक आणि सरांना गिफ्ट आणण्याचे ठरवले आहे. केक आणण्याची जबाबदारी एकीने, कोल्ड ड्रिंकची जबाबदारी दुसरीने अन गिफ्टची जबाबदारी माझ्या मुलीने असे कामांचे वाटपही झाल्याचे तिने मला सांगितले. माझ्या मुलीने सरांच्या गिफ्टची जबाबदारी घेतल्याने अप्रत्यक्षरीत्या ती जबाबदारी माझ्याकडे आली होती. तिची फिरकी घ्यावी म्हणून मी तिला माझ्याकडे पैसे दिल्याशिवाय मी गिफ्ट विकत आणणार नाही अशी गुगली टाकली तर माझ्या लेकीने तिच्याकडे जमा झालेले ७०० रुपये आणून दाखवून मला क्लीन बोल्ड केले. माझ्या लेकीकडे 'खजिनदाराची अतिरिक्त जबाबदारी' आल्याचे तेव्हा माझ्या ध्यानात आले. सरांना गिफ्ट म्हणून एक फ्लॉवर पॉट व त्यात ठेवण्यासाठी फुले अन एक शर्टचे कापड देण्याचे त्या मुलांमध्ये ठरल्याचे तिने दुसऱ्या दिवशी मला सांगितले. सरांच्या वाढदिवसाला १ आठवड्याचा अवधी असल्याने आपण २-३ दिवसांनी बोळींज नाक्यावर जाऊन गिफ्ट खरेदी करू असे मी तिला आश्वासन दिले अन तिचा रोजचा तगादा मिटवला.

दुसऱ्या दिवशी कामावरून आल्यानंतर माझ्या लेकीने मला नाराजीच्या सुरात एक वाईट बातमी सांगितली. आयोजन कमिटीत बेबनाव होऊन फुट पडली होती अन फुटलेल्या ग्रुपला वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करायचा होता. मला त्या वेळेला विधानसभा निवडणुकीची आठवण आली. ह्या कोवळ्या मुलांमध्ये सुद्धा 'राजकारण' शिरले नसेल ना अशी मला शंका आली. आता २ केक, २ गिफ्ट वर्गात येणार असे चित्र माझ्या डोळ्यासमोर तेव्हा उभे राहिले. तुम्ही एकत्र येवून वाढदिवस साजरा केला तर तो मोठा अन चांगला होईल असे मी तिला सुचविले अन विषय सोडून दिला. नंतर ठरल्या प्रमाणे दुसऱ्या दिवशी कामावरून आल्यावर मी माझ्या मुलीला बोळींज नाक्यावर नेऊन सरांसाठी गिफ्ट म्हणून एक फ्लॉवर पॉट, त्यात ठेवण्यासाठी फुले अन एक शर्टचे कापड खरेदी केले अन व्यवस्थित बॉक्स मध्ये सुंदर वेष्टनात टाकून तिच्या हातात दिले. सरांना कोणता रंग चांगला दिसेल हे मुलांनी अगोदरच ठरवल्याने शर्टपीस घेताना निळ्या रंगाच्या कापडावर शिक्कामोर्तब करण्यास मला जास्त वेळ लागला नाही.

शुक्रवारी सरांचा वाढदिवस साजरा करावयाचा होता. क्लासची नेहमीची वेळ ३.३० ची परंतु त्या दिवशी माझी मुलगी अन इतर ४-५ मुली ह्या घरून लवकर क्लासला गेल्या अन त्यांनी क्लासमधील फळा शुभेच्छांनी रंगवून टाकला. ठरल्याप्रमाणे केक, कॉल्डड्रिंक, गिफ्ट ह्या सर्व वस्तू वर्गात पोहचल्या होत्या. सरांना सरप्राइज देण्याचे ठरले असल्याने ही योजना सरांना कळणार नाही ह्याची काळजी मुलांनी घेतली होती. आनंदाची गोष्ट म्हणजे दोन गटात बर्यापैकी समेट झाला होता. परंतु केकची ऑर्डर रिपीट झाल्याने वर्गात २ केक आणले गेले होते. ३.३० वाजता सरांनी वर्गात प्रवेश करताच सर्व मुलांनी उभे राहून जोरात 'Happy Birthday to you ' ह्या गीताने वर्ग डोक्यावर घेऊन सरांना शुभेच्छा दिल्या. सरांनी केक कापून मुलांसोबत वाढदिवस साजरा केला. दोन गटात समेट झाल्याने फंड वाढला होता. बर्थडे केक व्यतिरिक्त स्लाइज केक, कॉल्डड्रिंक, चोकलेट्स असा भरगच्च मेनू पार्टीकरिता तयार होता. मुलांनी सरांच्या भोवती एकाच गर्दी केली होती. जो तो सरांना वीश करण्यासाठी व गिफ्ट बॉक्समध्ये काय गिफ्ट आहे हे पाहण्यासाठी धावपळ करीत होता. आज क्लास असून धमाल होती. सर्व मुले सरांचा बर्थडे एन्जॉय करीत होती. लहान वाटणाऱ्या मुलांनी उत्तम टीम वर्क करून आपल्या प्रिय सरांचा वाढदिवस अविस्मरणीय असा साजरा केला होता. दुसऱ्या दिवशी सरांनी मुलांना वर्गात केक अन चॉकलेट्स वाटून मुलांना ट्रीट दिली अन मुलांना खुश केले.

सरांच्या सन्मानार्थ आयोजित वाढदिवसाच्या पार्टीमधून आपल्या ८-९ वर्षाच्या मुलांनी अतिशय चांगल्या प्रकारे सरांविषयी आदर, सांघिक भावना, निर्णय प्रक्रिया, उत्तम नियोजन अन आयोजन, निधी उभारणी, निधीचा विनियोग, जबाबदारीचे वाटप, पालकांचे सहकार्य, योजनेची गुप्तता, मतभेदानंतर समेट, वेळेचे नियोजन अशा अनेक व्यवस्थापनातील नेतृत्वगुणांचा आविष्कार दाखवून दिला होता. हीच मुले आपल्या समाजाची भविष्य आहेत, अशा मुलांना योग्य मार्गदर्शन अन दिशा दिल्यास येणाऱ्या काळात आपले अस्तित्व पुसले न जाऊन अधिक ठळकपणे पुढे येईल ह्याची मला खात्री वाटते.