समविचारी पॅनलच्या माध्यमातून आमदार ठाकूर यांचा बँकेच्या सत्तेत प्रवेश झाला. बॅसिन कॅथॉलिक बँकेचा वसईच्या विकासात महत्त्वाचा सहभाग आहे. त्यामुळे ठेवीदारांचे नुकसान होऊ नये, यासाठीच विवेक पंडितांशी हातमिळवणी केली. बँकेत युती झाली म्हणून राजकीय युती होईलच, असा अर्थ काढला जाऊ नये, असे स्पष्टीकरण आमदार हितेंद ठाकूर यांनी दिले आहे. तर विवेक पंडित यांनीही परस्परांचे राजकीय मते वेगळी असली तरी वसईत सहकाराचे युग सुरू झाल्याचे स्पष्ट केले आहे.
कॅथॉलिक बँकेच्या चेअरमन व व्हाइस चेअरमनपदासाठी बुधवारी झालेल्या बैठकीत परस्परांचे कट्टर राजकीय वैरी समजले जाणारे हे दोन्ही नेते एकत्र आले आणि त्यांच्या पाठिंब्याने सहकार, समविचारी आणि अपक्षांची युती झाली व बँकेच्या इतिहासात प्रथमच एका महिलेची चेअरमनपदी निवड झाली. हितेंद ठाकूर आणि विवेक पंडित यांच्या एकत्र येण्याने वसईचे राजकारण ढवळून निघाले असले तरी उभय नेत्यांनी सावध विधाने करत पुढील राजकीय वाटचालीत ही युती कायम राहीलच याची स्पष्ट ग्वाहीही दिलेली नाही. कॅथॉलिक बँकेवर कब्जा मिळवण्यासाठी काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली होती. मात्र मतदारांनी कोणालाच स्पष्ट बहुमत न देता वसई विकास मंडळ पुरस्कृत समविचारी आणि अपक्षांच्या हाती सत्तेची चावी दिली. चेअरपनपदासाठी पंडित यांनी डॉमनिका डाबरे यांच्या नावाचा आग्रह धरला. डाबरे काँग्रेसच्या असल्या तरी त्या पंडितांच्या समर्थक मानल्या जातात. ठाकूर आणि पंडित यांच्या एकत्र येण्याने ठाणे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत आहेत. ठाणे जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण २४ जागा आहेत. पंडित सध्या कोणत्याच राजकीय पक्षात नाहीत तर ठाकूर यांनी बहुजन विकास आघाडीची स्थापना केली आहे. बँकेच्या निमित्ताने एकत्र आलेले हे दोन्ही नेते पुढील वषीर् होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एकत्र आल्यास राजकीयदृष्ट्या ते मोठे पाऊल असेल, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. उभय नेत्यांनीही यावर सावध पवित्रा घेतला आहे. बँकेच्या ठेवीदारांच्या हितासाठी आपण पुढे आलो असे सांगतानाच पंडितांशी राजकीय मतभेद असले तरी वसईच्या विकासासाठी त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा असल्याचे आमदार ठाकूर यांनी स्पष्ट करतानाच युती होईलच, असे नाही असेही स्पष्ट केले आहे. तर विवेक पंडित यांनी विरोधाच्या ठिकाणी विरोध केला जाईल असे सांगतानाच निवडणुकीच्या राजकारणात युती होईल की नाही हे माहीत नसल्याचे स्पष्ट करतानाच वसईत सहकाराचे युग सुरू झाल्याचे सूचक संकेत दिले आहेत.
No comments:
Post a Comment